महत्त्व क्रीडा सप्ताहाचे प्रोत्साहन शासनाचे

14/12/2013 18 : 37
     1194 Views

जीवनात खेळाला खुप महत्व आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी व्यायात आणि खेळ अत्यंत महत्त्वाचे असून खेळामुळे शारिरीक, बौध्दीक क्षमता वाढण्याबरोरबच आरोग्यही चांगले राहते आणि मन उत्साही होते आणि माणसाची दैनंदिन कामाकाजातील कार्यक्षमताही वाढण्यास मदत होते हा सुज्ञ दृष्टीकोन समोर ठेऊन तसेच युवक आणि युवतींमध्ये खेळाबाबत आवड निर्माण होण्यासाठी दिनांक १२ ते १८ डिसेंबर या कालावधीत शासनाच्या क्रीडा विभागामार्फत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. क्रीडा सप्ताहानिमित्त शासनाच्या उपक्रमाविषयी थोडक्यात माहिती . . .
राष्ट्राच्या व राज्याच्या सांस्कृतिक जीवनामध्ये क्रीडा संस्कृतीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. राष्ट्राच्या प्रगतीमध्ये त्या राष्ट्राची व पर्यायाने राज्याची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी हा महत्वाचा मानदंड आहे. त्यामुळे वेगवेगळया राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पदके प्राप्त करणारे खेळाडू राज्याला लौकिक प्राप्त करुन देत असतात. क्रीडा संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. त्याबरोबरच विशेष दिन व सप्ताहाचे आयोजनही करते.
क्रीडा दिन :- मेजर ध्यानचंद यांनी हॉकी खेळाच्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा गौरव म्हणून २९ ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. यामध्ये विविध खेळांच्या स्पर्धा, गाव पातळी, तालुका पातळी आणि जिल्हास्तरावर अर्ध मॅरेथॉन, रोड रेस, हॉकी, कबड्डी, सायकलिंग, खो-खो इत्यादि खेळांच्या आयोजनाबरोबरच शाळांमधून प्रभातफेरी, सामुदायिक कवायतींचेही आयोजन करण्यात येते.
क्रीडा सप्ताह :- महाराष्ट्र शासनाच्यावतीने शाळा, महाविद्यालये व समाजात खेळाविषयी आवड निर्माण होण्यसाठी दरवर्षी १२ ते १८ डिसेंबर हा आठवडा क्रीडा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक व्यक्तीने दररोज एक तास तरी व्यायाम करावा. चांगल्या आरोग्यासाठी आणि मन उत्साही राहण्यासाठी शासनाने हा सप्ताह साजरा करण्याचे ठरविले आहे.
शाळेमध्ये दररोज एक ते दोन तास क्रीडा क्षेत्राविषयी वेगवेगळे उपक्रम राबवावेत किंवा वार्षिक स्नेहसंमेलनाच्या स्पर्धा व इतर उपक्रम या सप्ताहात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये कला व क्रीडा विषयी प्रोत्साहन निर्माण करण्याचा शासनाचा उद्देश आहे.
राष्ट्रीय युवा दिन व युवा सप्ताह :- केंद्र शासनाद्वारे जाहीर केल्यानुसार दरवर्षी स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी म्हणजे १२ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. तेथून पुढे १९ जानेवारीपर्यंत युवा सप्ताहाचे आयोजन संपुर्ण भारतामध्ये करण्यात येते.
१२ ते १९ जानेवारी दरम्यान दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त व्याख्यानांचे आयोजन, सामुदायिक गीतगायन, समाजसेवा दिन, युवकांचे राजकारणातील महत्त्व आणि युवा पिढी आणि देशाचे भवितव्य या विषयावर चित्रकला स्पर्धा, शारिरीक क्षमता दिन, शांततेसाठी युवा दिनानिमित्त गावपातळीवर क्रीडा स्पर्धा आणि वादविवाद स्पर्धांचे आदी कार्यक्रम घेण्यात येतात.
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या विद्यामाने प्रतीवर्षी जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने प्रत्येक शैक्षणिक वर्षात शालेय, महिला, पायका (ग्रामीण) व इतर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
शासनाच्यावतीने माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेमध्ये प्रविष्ट होणाऱ्या राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या नियमित खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे केवळ उत्तीर्ण होण्यासाठी २५ गुण देण्यात येतात. कारण खेळाडूचे खेळातील करियरचे वय व शैक्षणिक करियरचा काळ एकच असल्याने त्यांना दोन्ही आघाडीवर सारख्याच प्रमाणात लक्ष देता येणे शक्य नसते. त्यामुळे बऱ्याचदा शैक्षणिक प्राविण्यात त्यांची पिछेहाट होते. व त्यामुळे नोकरी व्यवससाच्या स्पर्धेत ते केवळ शैक्षणिक करियर करणाऱ्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करुन शकत नाहीत. खेळाच्या उमेदीचा काळ संपल्यानंतर अशा गुणवत्ताधारक खेळाडूंना नोकरीसाठी वणवण भटकावे लागते. त्यामुळे खेळाडू अथवा त्यांचे पालक खेळाकडे करियर म्हणून पाहत नाहीत व खेळास पूर्ण वेळ योगदान देण्यापासून ते परावृत्त होतात. म्हणून शासकीय व निमशासकीय कार्यालयामधील गट अ, ब, क, व ड संवर्गातील नामनिर्देश भरण्यात येणाऱ्या पदापैकी ५ टक्के पदे विशेष कामगिरी बजावणाऱ्या स्त्री व पुरुष खेळाडूंना आरक्षित करण्यात आली आहेत.
अशाप्रकारे क्रीडा संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी विविध योजनेतून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष सवलतीही देण्यात येतात. उदा. जिल्हा पातळीवरील जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उत्तम शिक्षकांकडून प्रशिक्षण, अत्याधुनिक खेळ, साहित्य, खेळानुसार कपडे याबाबींविषयी क्रीडा विभागाचे विशेष लक्ष असते.
राजू धोत्रे
प्र. जिल्हा माहिती अधिकारी,
बीड.
comments