विभागीय क्रीडा संकुलाच्या वापरासाठी स्मार्ट कार्ड

17/09/2012 4 : 24
     257 Views

औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलाचे व्यवस्थापन सक्षम करण्यासाठी येथील सुविधांच्या वापर करणाऱ्या खेळाडूंना स्मार्ट कार्ड देण्यात येणार असून क्रीडा संकुलाच्या व्यवस्थापनासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सांगितले.

विभागीय क्रीडा संकूल कार्यकारी समितीची बैठक शनिवारी औरंगाबाद येथे श्री.जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हाधिकारी कुणालकुमार, पोलीस आयुक्त संजयकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे, क्रीडा प्रतिनिधी सुधीर जोशी, अरविंद तेलंग, तसेच सार्वजनिक बांधकाम, महानगरपालिका, सिडको आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री.जयस्वाल म्हणाले, क्रीडा संकूल व्यवस्थापनासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात येईल. ही नियंत्रण समिती नियमितपणे खेळाडू, क्रीडाप्रेमी नागरिकांशी संवाद साधून प्रत्यक्ष संकुलाला भेट देऊन आढावा घेईल. संकुलाचा वापर करणाऱ्या संघटना, खेळाडू, प्रशिक्षक आदींच्या अडचणी सोडवण्याबरोबरच सुविधांचे व्यवस्थापन व्हावे आणि प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी ही समिती कार्य करेल. तसेच क्रीडा संकुलाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी विभागीय क्रीडा संकूल समितीचे कार्याध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कुणालकुमार यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घ्यावी अशी सूचनाही त्यांनी दिली.

औरंगाबाद येथील क्रीडा संकुलामध्ये वेगवेगळ्या क्रीडा सुविधा उपलब्ध झाल्याने त्यांचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सध्या सुमारे 1700 क्रीडाप्रेमी नागरिक, विद्यार्थी हे व्यायाम, खेळांचा सराव आणि क्रीडा स्पर्धा यासाठी या संकुलाचा उपयोग करीत आहेत. त्यांची सुरक्षितता आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी स्मार्ट कार्डचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून इनडोअर स्टेडियम, बॅडमिंटन हॉल, मुख्य क्रीडा संकुल आदी ठिकाणी स्मार्ट कार्ड वापरून प्रवेश करावा यासाठी मशीन बसवण्यात येणार आहेत. क्रीडा संकुलाचा विकास आणि अधिकाधिक खेळांसाठी सुविधा निर्माण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी एअर रायफल या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकतील असे खेळाडू औरंगाबादमध्ये असून त्यांना सरावासाठी इनडोअर फायरिंग रेंज असण्याची आवश्यकता प्रतिपादित केली. याबाबत समितीने तात्काळ निर्णय घेऊन सदर सुविधा उपलब्ध करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बहुउद्देशीय इनडोअर स्टेडियमचा वापर वेगवेगळ्या खेळांसाठी करणे, बास्केटबॉल क्रीडांगणाला संरक्षक जाळी उभारणे, स्केटींगसाठी नव्याने जागा विकसित करणे आदी महत्वाचे निर्णय यावेळी घेण्यात आले.

विभागीय क्रीडा संकुलाची उभारणी करताना पूर्वीच्या बंद पडलेल्या सूतगिरणीच्या दायित्वाची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने क्रीडा विभागामार्फत नऊ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला होता. त्यातील राज्य मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे सव्वा तीन कोटी रुपये देण्यात आले असून सूतगिरणीच्या कर्मचाऱ्यांच्या थकित वेतनासाठी अजून चार कोटी रुपये आवश्यक असल्याने त्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

बांधा-वापरा-हस्तांतरित करा या तत्वावर व्यावसायिक वापरासाठी काही जागा विकसित करण्यात येत असून त्याच धर्तीवर अजून पाच एकर जागा विकसित केली जाऊ शकते, त्यासाठी कार्यवाही करण्यात यावी, असेही यावेळी ठरविण्यात आले.
comments