जननी शिशू संदेश वाहिनी

2016-06-10 10:26:46
     153 Views

राज्यातील गर्भवती माता, स्तनदा माता यांनी प्रसूतीपूर्व, प्रसूतीदरम्यान व प्रसूतीपश्चात कालावधीमध्ये आरोग्य सेवांचा लाभ वेळेवर घेणे आवश्यक आहे. गरोदर मातांची प्रसूती सुखरुप होण्यासाठी, प्रसूतीनंतर जन्मलेल्या बालकांना लसीकरण व इतर आरोग्य सेवा देण्यासाठी शासनामार्फत कोणकोणत्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत, याची माहिती लाभार्थींपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने अत्याधुनिक दळणवळणाच्या उपलब्ध साधनांचा उपयोग करुन समाजामध्ये जनजागृती करुन आरोग्य सेवांची मागणी वाढविण्यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्व गर्भवती मातांना दोन वर्षांच्या आतील बालकांच्या मातांना, आरोग्यसेविकांना व आशांना ध्वनी संदेश पाठविण्याची संकल्पना राज्यात राबविण्यात येणार आहे. एम.सी.टी.एस. प्रणालीमध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व गरोदर व स्तनदा माता, आरोग्यसेविका व आशा यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर ध्वनी संदेश हे दरमहा ठराविक अंतराने मातेच्या गरोदरपणाच्या टप्प्यानुसार व प्रसूतीपश्चात २ वर्षांपर्यंत देण्यात येणार आहेत.

उद्दिष्टे

गरोदर माता व दोन वर्षांच्या आतील बालकांच्या मातांना अत्याधुनिक दळणवळणाच्या उपलब्ध साधनांचा उपयोग करुन शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध आरोग्य सेवेविषयी माहिती देऊन सेवांचा लाभ घेण्यास त्यांना प्रवृत्त करणे.
आरोग्यसेविका व आशा कार्यकर्ती यांनी गरोदर माता व दोन वर्षांच्या आतील बालकांच्या मातांना द्यावयाच्या सेवांचा पाठपुरावा करणे.

सुविधेचा उपयोग

एम.सी.टी.एस. प्रणालीमध्ये नोंद झालेल्या ग्रामीण व शहरी भागातील गरोदर मातांसाठी त्यांना अपेक्षित असलेल्या सेवेच्या दिनांकाआधी प्रत्येक सेवा घेण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. त्यामुळे गरोदर माता वेळेवर आरोग्य संस्थेमध्ये सेवा घेण्यासाठी येतील.
गरोदर मातांना धोक्याच्या लक्षणाबद्दल माहिती देण्यात येईल, ज्यायोगे जोखमीच्या कारणांसाठी त्या त्वरित आरोग्य संस्थेमध्ये १०८ या रुग्णवाहिका सेवेचा उपयोग करुन दाखल होतील.
आरोग्य शिक्षणविषयक संदेश दिल्यामुळे प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात स्वत:ची व बालकाची काळजी घेण्यासाठी माता सक्षम होण्यास मदत होईल.

कार्यपद्धती

एम.सी.टी.एस. प्रणालीमधील प्रत्येक गरोदर मातेला तिने नोंदविलेल्या मोबाईल नंबरवर विनामूल्य संदेश देण्यात येतील.
हे संदेश किती वेळा व केव्हा द्यावयाचे याबाबतचे वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहे.
हा संदेश सर्वसाधारणपणे संध्याकाळी ७ ते ८ या लाभार्थ्यांच्या सोयीच्या वेळेदरम्यान पाठविण्यात येणार आहेत.
या सुविधेमार्फत दिलेल्या माहिती व्यतिरिक्त अतिरिक्त माहितीची लाभार्थ्याला आवश्यकता असल्यास एक टोल फ्री क्रमांक देण्यात आलेला आहे.
आरोग्यसेविका व आशा कार्यकर्ती यांना कोणत्या लाभार्थींना कोणत्या सेवा द्यावयाच्या आहेत याबाबत संदेश देण्यात येतील.

अशा पद्धतीने या वाहिनीचे कामकाज चालणार आहे. राज्यातील गर्भवती माता, स्तनदा माता यांनी प्रसूतीपूर्व, प्रसूतीदरम्यान व प्रसूतीपश्चात कालावधीमध्ये आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा.
comments