बालगृहांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक निर्णय घेणार - महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे

2016-03-16 19:01:40
     186 Views

मुंबई : दि. १६ महिला व बाल विकास विभागांतर्गत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या व विधी संघर्षग्रस्त बालकांसाठी शासकीय व स्वयंसेवी अनूदानित संस्थाच्या विविध प्रश्नांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत दिली.
यासंदर्भात सदस्य बच्चू कडू आणि इतर सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देतांना ना. मुंडे म्हणाल्या की, संस्थाच्या अनुदानासह इतर समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात येतील.
बालगृहातील मुलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच त्यांचे आरोग्य, पोषण, शिक्षण, सुरक्षा याबाबींकडे लक्ष देण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अंतर्गत असलेल्या तरतूदीनुसार शासनस्तरावरुन स्वयंसेवी संस्थांच्या बालगृहांना वेळोवेळी मान्यता प्रदान केलेली आहे. बालगृहाबाबत सदरची बालगृहे विहित केलेल्या निकषानुसार सुरु आहेत किंवा कसे याबाबत पडताळणी करण्याबाबत शासनस्तरावर कार्यवाही करण्यात येते. यामध्ये नुकतीच तपासणी करुन ‘अ’ , ‘ ब’ , व ‘क’ असे ग्रेडेशन करण्यात आले असून क दर्जाचे बालगृह बंद करण्याचा विचार असून या ठिकाणचे बालके इतर ठिकाणी पाठविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
संस्थांच्या सन २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये रुपये ३२.५० कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे. प्रलंबित निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगून बालगृहाच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
comments