प्रिय बाळास


जेवण करताना मनातल्या मनात सुविचारांची पुनरावृत्ती करण्यासंदर्भात आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. मन्या, सोन्या व गुण्याच्या मॅडम त्यांना याविषयी जे सांगून गेल्या ते आपण समजून घेणार आहोत. त्या मॅडम म्हणाल्या, बाळांनो, तुमच्या वयातील (पाचवी ते बारावीच्या वर्गात शिकत असणा-या) विद्याथ्र्यांनी तीन शब्द सतत लक्षात ठेवणे गरजेचे आहे. अभ्यास, आरोग्य व आनंद हे ते तीन महत्त्वपूर्ण शब्द आहेत. जेवण करताना जर याच तीन शब्दांचे स्मरण करीत राहिले तर त्याविषयीच्या भावना अन्नरसासोबत तना-मनात भिनतात. विचार आणि भावना, अन्नरसासारखे डोळ्यांनी दिसत नसले तरी त्यांचे अस्तित्व असते हे निश्चित आहे. याअगोदरच्या लेखात आपण जाणले आहे की, विचार व भावना या दोन्ही बाबी अतिशय सूक्ष्म आहेत. याउलट अन्न मात्र स्थूल पदार्थ आहे. म्हणून अन्न सेवन करताना कळत-नकळत निर्माण होणारे विचारभाव आपल्या अंतरंगात व कणाकणांत बिंबले जातात. हा स्थूल गाभा समजूनच जुन्या काळात सोवळ्यात स्वयंपाक करणे, मौनात जेवण करणे इत्यादी बाबी आचरणात आणल्या जात असत. अगदी स्तनपान करताना निर्माण झालेले आईचे भावविचार तिच्या बाळावर सूक्ष्म परिणाम करतात, हेसुध्दा आपल्या पूर्वजांना नीट माहीत होते. टी.व्ही. बघत-बघत किंवा मोबाईलशी खेळत-खेळत या घटना अतिशय दुर्दैवी व घातक आहेत. बालपणी आपल्या मनात भिनलेल्या बाबी मोठेपणी बदलायच्या म्हटले तर खूप प्रयत्न करावे लागतात. खूप कठीण साधना, उपासना किंवा तपस्या करावी लागते. शिवाय त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन देणारा मार्गदर्शक मिळणेही अत्यावश्यक आहे. असो..

मनातील विचारांना दिशा देण्याची किंवा मनाला सद्विचारी बनविण्यासाठी सोपी व सहज साधता येणारी पद्धत म्हणजेच जेवण करताना सुविचारांचे सतत स्मरण करीत राहणे होय. थोडक्यात बालपणी मनावर झालेले संस्कार खंबीर करण्याची किंवा बालमनावर कळत-नकळत झालेल्या अयोग्य संस्कारांना मिटवून नवीन संस्कार करण्याची ही एक प्रभावी पद्धत आहे. फक्त जेवताना मनाला सद्विचारांची सतत जाणीव करीत जाणे ही तनासोबत मनाचे पालनपोषण करणे आहे.

खरेतर बालपणी आपल्यावर कोणतीच विशिष्ट जबाबदारी नसते. ब-याच अंशी स्वातंत्र्य असते. आवर्जून बनविलेले वेळापत्रक अवलंबण्याचे बंधन नसते. जेव्हा शालेय जीवन सुरू होते तेव्हा मात्र वेळापत्रकाचे बंधन पडायला सुरुवात होते. विशेषत: प्राथमिक शिक्षण संपवून माध्यमिक गटामध्ये (इयत्ता पाचवीनंतर) प्रवेश केल्यानंतर वेळापत्रकाचा अवलंब करणे जवळजवळ अनिवार्य होऊन बसते. बालवयात झोप आली की झोपणे, जाग आली की झोपेतून उठणे, भूक लागली की खाणे, खेळावे वाटले की खेळत राहणे, रडू आले की रडणे, हसू आले की हसणे अशी स्वच्छंद दिनचर्या असते. पण शालेय जीवन सुरू झाल्यावर मात्र आपल्या मनाला नियोजनबध्द चौकटीत वागायला शिकवावे लागते. अशा दिनचर्येची मनाला जबरदस्ती वाटते व शिस्तीत राहण्यासाठी मनामध्ये विचार निर्माण होतो; परंतु मनामध्ये कोणत्याही प्रकारचा विरोधाभास निर्माण झाल्यास मनावर ताण पडतो हे आपण मागील लेखात जाणले आहे. विरोधी विचारांच्या घर्षणामुळे मनाची ताकद किंवा मनाचा उत्साह कमी होतो हेसुध्दा आपण जाणले आहे. म्हणजे मनामध्ये कसलाही विरोध निर्माण होऊ न देता मनाला शिस्त लावणे गरजेचे आहे. अर्थात मनाने बदल स्वीकारला तर पाहिजे पण नाराज न होता व आनंदाने!

जर आपल्या मनाने हे नीट समजून घेतले की बदलणे हे त्याच्याच भल्यासाठी आहे तर मन आनंदाने बदलायला तयार होते. एकूण व्यक्तिमत्त्व विकासासाठी व जीवन यशस्वी बनविण्यासाठी मनामध्ये योग्य बदल होणे आवश्यक आहेत. म्हणजेच बालवयातील संस्कार कसेही असले तरी मोठेपणी जाणीवपूर्वक मनाला योग्य वळण देणे हा जीवन जगण्याचा अविभाज्य भाग आहे. हे सारे सविस्तरपणे मनाला समजल्यास मन कोणत्याही बाबीवर योग्य काय किंवा अयोग्य काय असा साधक-बाधक विचार करू लागते. अशावेळी आयुष्यातील सर्व प्रकारच्या घडामोडींना सामोरे जाण्यासाठी मन सहज तयार होते. उदाहरणार्थ आरोग्यसंपन्न राहण्यासाठी नियोजित वेळेत जेवण करणे आवश्यक आहे हे समजल्यामुळे जेवणाच्या ठराविक वेळा पाळणे मनाला सहज वाटू लागते. उदाहरणार्थ आपल्या बोलण्यातून आपले संस्कार उमटतात व त्याचा नातेसंबंधावर परिणाम होतो हे समजल्यामुळे मन विचारपूर्वक ( मनन - चिंतन करून) बोलण्यासाठी स्वत:हून कार्यरत होते.

उदाहरणार्थ आपल्या सहवासातील मित्रपरिवारावरून आपली सामाजिक प्रतिमा ठरते हे समजल्यानंतर चांगल्या व सद्गुणी मुलांसोबत मैत्री ठेवणे मनाला जमते. बाळांनो, थोडक्यात सांगायचे म्हटले तर आपण जबाबदार व सुजाण नागरिक बनण्याच्या मार्गावर सहजपणे वाटचाल करू लागतो. म्हणजे आपण आपल्या मनाशी प्रामाणिक मैत्री केली तर मनाच्या साह्याने आपली सर्वोत्कृष्ट प्रगती होऊ लागते. अर्थात, जगात आपल्याला कोणी मदत करो किंवा न करो, आपल्या मनाने जर आपली मदत केली तर सर्वकाही सुलभ होते. यासाठी फक्त आपल्या जीवनाचे लक्ष्य निश्चित असणे गरजेचे आहे. आपल्याला आपल्या जीवनातील कर्तव्ये, जबाबदा-या, आयुष्यभर जतन करावयाचे मूल्य आणि आयुष्य यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी जीवनप्रवासातील उद्दिष्टे यांची पुरेपूर जाणीव असणे अत्यावश्यक आहे.ज्याप्रमाणे नेमके कोणत्या गावाला जायचे हे निश्चित झाल्यावर त्या गावाकडे जाण्याचा योग्य मार्ग ठरविणे सोपे जाते, त्याप्रमाणेच आयुष्यात नेमके काय प्राप्त करायचे हे निश्चितपणे ठरविले की त्यासाठी आपली वर्तणूक कशी ठेवायची यावर विचार करणेही सोपे होते.
comments
Leave a reply

आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.

Your E-mail ID not be published. Required *. मराठी/इंग्रजी साठी [CTRL + G] बटन वापरा

anti spam
(Maximum characters: 500)
characters left.

Required fields are marked (*)