महिलांची सक्षमतेकडे वाटचाल

2015-10-15 13:57:58
     267 Views

पूर्वी ‘चूल आणि मूल’ एवढंच कार्यक्षेत्र असलेल्या महिला आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. सावित्रीबाई फुलेंचा आदर्श पूढे ठेवून आणि त्यांची प्रेरणा घेऊन अनेक महिला आज यशाची शिखरे गाठत आहेत. ग्रामीण भागातील महिलासुद्धा याला अपवाद नाहीत. अनेक क्षेत्रात ग्रामीण महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.

गोंदिया जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) ग्रामीण महिलांना गावपातळीवर संघटीत करुन त्यांना बचतगटाच्या माध्यमातून आर्थिक बचतीची सवय लावली आहे. माविमचे योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षणामुळे अनेक महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी उद्योग व व्यवसायाची कास धरली आहे. महिलांची संघटनात्मक बांधणी करुन त्यांचा सामाजिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

महिला आर्थिक विकास महामंडळाने अर्जुनी/मोरगांव तालुका वगळता उर्वरित सात तालुक्यातील ४१६ गावांमध्ये ३८८४ महिला बचतगटांची स्थापना केली असून या माध्यमातून ४६ हजार ४७२ महिलांना संघटीत करण्यात आले आहे. या महिलांनी पदरमोड करुन पै-पै जमवून तब्बल ८ कोटी ५८ लक्ष ४० हजार रुपयांची बचत केली आहे. बचतीची सवय आणि अंतर्गत पैशाचे आदान-प्रदान बघता बँकांनी छोट्या विविध प्रकारच्या उद्योग-व्यवसायासाठी तब्बल ४१ कोटी ७५ लक्ष ३१ हजार ५०० रुपये कर्ज स्वरुपात बचतगटांना उपलब्ध करुन दिले आहेत. उद्योग/व्यवसाय करण्यास बचतगट सक्षम असल्याचा विश्वास मोठ्या प्रमाणात कर्ज देऊन बँकांनी दाखविला आहे.

सात तालुक्यात विशेष घटक योजना-१७७, सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना-३५०, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक-११०, स्वयंसिद्धा योजना-४०, तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम-६९३, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान-२११३ असे एकूण ३८८४ महिलांचे बचतगट माविमकडून कार्यरत आहे.

उद्योग-व्यवसायासाठी ३१६० बचतगटांनी सन २००२ पासून सप्टेंबर २०१५ पर्यंत ४२ कोटी ७५ लक्ष ३१ हजार ५०० रुपयांचे बँक कर्ज घेतले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान माविमच्या माध्यमातून तिरोडा आणि सालेकसा तालुक्यात राबविण्यात येत असून या तालुक्यातील ११३९ बचतगटांना प्रती बचतगट १५ हजार रुपये याप्रमाणे १ कोटी ७० लक्ष ८५ हजार रुपये फिरता निधी वाटप केला आहे. या दोन्ही तालुक्यात ४५ ग्रामसंस्थेअंतर्गत २४४ बचतगट सक्षमपणे काम करीत आहेत. जिल्ह्यातील ५७१ महिला बचतगटांना आयसीआयसीआय बँकेने सन २०१५-१६ या वर्षात सप्टेंबर २०१५ अखेर ५ कोटी ३७ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. तसेच जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकानी सप्टेंबर अखेर १२७ गटांना ८२ लक्ष ९५ हजार रुपये कर्ज स्वरुपात उपलब्ध करुन दिले असल्याची माहिती माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी दिली.

बचतगटातील महिलांच्या उत्पन्न वाढीसाठी सुक्ष्म उपजिविका आराखडा तयार करण्यात आला आहे. बचतगटाच्या माध्यमातून शेळीपालन प्रकल्प, दुग्ध व्यवसाय, सामुहिक शेती, लाख उत्पादन, स्वस्त धान्य दुकान चालविणे, अंगणवाड्यांना आहार पुरवठा करणे, लाकडी नक्षीदार वस्तू तयार करणे, कुक्कूटपालन यासह अन्य उद्योग व्यवसाय जिल्ह्यातील बचतगटातील महिला करीत आहेत. बचतगटामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या नेतृत्व विकासाला चालना मिळाली आहे. बचतगटातून अनेक महिला आज जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी आहेत. माविमच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमातून व स्पर्धेतून त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळत आहे.

-विवेक खडसे
जिल्हा माहिती अधिकारी, गोंदिया
comments