माध्यमातील भाषेचा विचार


माध्यमातील भाषेचा विचार गंभीरपणे करायला हवा असे मला वाटते. मराठीतील एका आघाडीच्या वृत्तपत्रात पहिल्याच पानावर येतो आहे खराखुरा हॅडसेट ! या शिर्षकाची बातमी प्रसिद्ध झाली. तिच्यातील हे वाक्य पाहा. ’ अमेरिकेतील एमआयटी मध्ये त्याचे पहिले सादरीकरण अगदी अलिकडेच सादर झाले’ या वाक्यातला दोष अगदी सहज लक्षात येण्यासारखा आहे. ’ सादर करणे’ म्हणजेच ’ सादरी करण’ वेगवेगळ्या रुपातला एकच शब्द आहे तो. ’ सादर झाले’ हे वास्तविक ’ सादरकरणे’ चे भूतकाळी रुप. त्यामुळे ’ ः.पहिले सादरीकरण झाले’ किंवा असे उपकरण प्रथमच सादर करण्यात आले, ही रचना मराठी लेखनरचनेला अधिक अनुकूल, प्रवाही झाली असती आणि क्रियादर्शक शब्दाचा नामरुपासाठी पुन:वापरकरण्याची आपत्ती टाळताआली असती. इंग्रजीत ’ प्रेझेंटेशन’ (म्हणजे आपले सादरीकरण) या नामरुपाचा उपयोग ’ गिव्ह’ या क्रियापदा सोबत केला जातो. त्यामुळे ’ सादरीकरण केले’ असे म्हणणेही चालून गेले असते.ह्याच वृत्तात ’ टॅटू’ असा शब्द पुढे पुनरावृत्त होताना ’ ट्यॅटू’ असा होतो. ही आणखी एक, एकसंघ लेखात शब्दाच्या एकरुप वापराला बाधा आणणारा दोष.

त्याच दैनिकातील आणखी एक बातमी पाहा. शब्द साहचर्या संबंधी (सिंटॅक्स संबंधी) दोष दाखवणारी. ’ आठवले यांनी मायावतींचे आव्हान राज्यात आपलाच पक्ष पेलू शकतो, असे छाती ठोकपणे सांगितले आहे’ . ’ छाती ठोकपणे सांगितले आहे ’ या वाक्याला कर्ता ’ आठवले यांनी’ हा आहे आणि तो त्या शब्दसंहितेच्या पूर्वी येणे जास्त संयुक्तिक, आशयाला नेमके येणे स्पष्ट करणारे आहे. म्हणजे हेच वाक्य पुढील प्रमाणे असते, तर हा दोष टळला असता. ’ मायावतींचे आव्हान..... असे आठवले यांनी छाती ठोकपणे सांगितले आहे’ यात आणखीही एका शब्दात दोष आहे. हा दोष अनेकांच्या लेखनात सहजपणे येतो. शब्द प्रत्ययांच्या नेमक्या वापराविषयी अज्ञान हे बहुधा त्याचे कारण असावे. ’ नी’ व ’ ने’ हे तृतीया विभक्तीचे प्रत्यय. ’ ने’ हा एकवचनी, ’ नी’ हा आदरार्थी व अनेक वचनी अशा दोन्ही नामरुपांपुढे लावला जातो. म्हणून येथे ’ त्यांनी’ असे शिरोबिंदुरहित रुप वापरण्याने हा दोष टळला असतो.

दुसऱ्या एका अव्वल स्थानावरच्या वृत्तपत्रातील एका बातमीच्या शीर्षकातील चुकीच्या शब्दांकडे लक्ष वेधून हा लेख संपवतो.

उपरोक्त बातमीचे शीर्षक असे आहे :- ’ अनिष्ठ रुढी थाबवण्याचे वारकरी संप्रदायाने पुढे यावे’
’ अनिष्ठ’ शब्द चुकीचा. तो ’ अनिष्ट’ असा हवा. ’ थांबवण्याचे’ या शब्दात ’ चे’ हा प्रत्यय चुकीचा. तेथे ’ साठी’ हे अव्यय हवे. ’ थांबवण्याचे’ या शब्दाचा अन्वय पुढील वाक्याशी राहत नाही, हे सहजच लक्षात येते. (मात्र या शीर्षकातील शब्द साहचर्याचे मजेशीर उदाहरण नजरेला आणून देण्या सारखे आहे. शीर्षकाच्या उपरोक्त दोन ओळींच्या उजव्या बाजूला लाल रंगाच्या अक्षरात, चौकटीत एक छोटे उपशीर्षकही आहे. ’ स्वामी नरेंद्रानंद सरस्वती महाराजांचे आवाहन’ मुख्य शीर्षकातील पहिल्या ओळीची सार्थ पूर्तता या उपशीर्षकाने होते हे खरेच. पण त्याची मांडणी मात्र मुख्य शीर्षकाशी फटकून राहाते’ . स्वाभविकच, मुख्य शीर्षक दोषास्पद ठरते.)

वर्तमानपत्रांना काळ-काम-वेगाचे गणित साधायचे असते हे समर्थन मानायचे का ? की भाषेचे अज्ञान झाकण्याचा तो पडदा, म्हणायचे ?

जयवंत वसंत चुनेकर
comments
Leave a reply

आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.

Your E-mail ID not be published. Required *. मराठी/इंग्रजी साठी [CTRL + G] बटन वापरा

anti spam
(Maximum characters: 500)
characters left.

Required fields are marked (*)