युवक आणि मल्टीमिडिया

23/10/2012 8 : 33
     2324 Views

बीड
तंत्रज्ञानाच्या युगात युवक वाचनापासून दूर जात आहेत असा आरोप केला जात आहे. मात्र आजचा युवक महिती तंत्रज्ञानाचा वापर करुन आपले ज्ञान समृद्ध करण्यासाठी मल्टीमिडियाचा वापर करत आहे. त्यामुळे केवळ पुस्तके वाचनातूनच ज्ञान मिळते हा गैरसमज दूर होत आहे.
आजचा युवक हा सोशल मीडियाचा वापर करत जागतीक खेड्यातील नागरिक बनून एखाद्या प्रश्नावर विकासाच्या मुद्यावर आपली भूमिका मांडत आहे. म्हणजेच सोशल मीडियाच्या माध्यमातून युवक आपला सहभाग नोंदवत आहेत. त्याचा परिणाम शासनाच्या निर्णयावर होत असतो. सोशल नेटवर्किंग वाईट नाही मात्र त्याचा वापर करणारे कसे आहेत यावरून त्याचे उपयुक्तता मूल्य ठरत असते. अलीकडे आण्णा हजारे यांच्या आंदोलनाला सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून सकारात्मक पाठिंब्याचा परिणाम दिसून आला. मात्र ईशान्येकडील राज्यातील दंगलीच्या वेळी मात्र सोशल नेटवर्किंगचा नकारात्मक वापर झालेला दिसतो. त्यामुळे सोशल नेटवर्किंग ही युवकांच्या हातातील दुधारी तलवार आहे.
आजच्या युवकाकडे अधुनिक व्हर्जनचे मोबाईल उपलब्ध आहेत. या मोबाईलवर इंटरनेट असल्याने युवकांना बातम्या, व्हीडीओ, ऑडिओ घर बसल्या वाचता, पाहता, ऐकता येतात त्याचप्रमाणे मोबाईलद्वारे चॅटिंग, एस.एम.एस.च्या माध्यमातून सतत संवाद साधत असतात. संवादाच्या माध्यमातून ज्ञान, माहिती, मनोरंजन अशा गोष्टी होतात. मात्र ज्ञान, माहिती, मनोरंजनाची सिमा ओलांडून अश्लील आणि सवंग मनोरंजनासाठी वापर होत असल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे युवकाकडे असलेल्या मल्टीमिडियाचा उपयोग कशासाठी केला जात आहे. याकडे पालकांचे लक्ष साफ दुर्लक्ष झालेले आपणास पाहायला मिळते.
युवकांनी मल्टीमिडियाचा वापर सवंग मनोरंजनासाठी न करता ज्ञानाचे क्षितीज विस्तारण्याकरीता करणे अपेक्षित आहे. चित्रपटांची गाणी डाऊनलोड करून ऐकत बसण्यापेक्षा अभ्यास करत असताना वाचलेला एखादा उतारा रेकॉर्डींग करून पुन्हा पुन्हा ऐकला तर अभ्यास परिणामकारक होऊ शकतो. तसेच पालकांनी देखील आपला पाल्य मल्टीमिडियाचा वापर कशासाठी करतो याकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे मुले सायबर गुन्हेगारीला बळी पडणार नाहीत तसेच त्यांच्यामध्ये नैराश्य निर्माण होणार नाही.
आजचा युवक मोबाईल, संगणकावर सतत फेसबुक, व्टिटर, ऑर्कूट सारख्या सोशल नेटवर्किंगवर सकाळी झोपेतून उठल्यापासून सायंकाळी झोपेपर्यंत सतत चॅटींग, सर्चिंग करत असतो. त्यामुळे आजच्या युवकांना संगणकाचे व्यसन जडले आहे. या व्यसनाचे दूष्परिणाम देखील आजच्या युवकाच्या आरोग्यावर होऊ लागले आहे. युवकांमध्ये कष्ट करण्याची जिद्द नष्ट होऊन ऐश आरामात जीवन जगण्यासाठी वाट्टेल ते करण्याची मानसिकता निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे आजचा युवक राष्ट्रप्रेमी, समाजिक जबाबदारी, कौटुंबीक जिव्हाळा यापासून दूर चाललेला दिसतो आहे. म्हणजे एका बाजूला युवक मल्टीमिडियाद्वारे जगतीक खेड्याचा नागरिक होऊ इच्छीत असला तरी स्थानिक पातळीचे संदर्भ विसरून चंगळवादाकडे वाटचाल करू लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शासनाला सामाजिक संस्थासाठी मल्टीमिडीया साक्षरता अभियान चालवावे लगणार आहे.
प्रा.विठ्ठल एडर्के
vbedake@gmail.com
comments