माध्यम कर्मीवरील भ्याड हल्ल्याचा निषेध

04/10/2012 14 : 39
     515 Views

लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून ज्या माध्यमांकडे पाहिले जाते. त्या संस्थेवर प्राणघातक भ्याड हल्ले करण्याचे प्रकार अलिकडे सर्रासपणे होत असल्याचे दिसत आहे. समाजमन सुदृढ ठेवण्यासाठी व लोकशाहीत इतर तीन स्तंभावर वचक ठेवण्याचे काम करणा-या या संस्थेवरील होणा-या भ्याड हल्ल्याचे प्रमाण पाहिल्यास भ्रष्टाचारास ,अनयमितता करणा-या अधिका-यास किंवा इतर प्रकारचे काळे धंदे करणा-यास आता प्रशासनातील पोलिस यंत्रणे ऐवजी या माध्यमकर्मींकडून केलेल्या लिखाणाची किंवा वार्तांकनाची जास्त भिती वाटत असल्याचेच दिसते आहे.
भ्रष्टाचार करणारा शासकीय अधिकारी असो किंवा व्यावसायिक असो त्यांना शासकीय स्तरावरील यंत्रणेला पैशाच्या बळावर हवे तसे वाकविण्याची सवय असल्याचे उघड होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणातून समोर येत आहे. उच्चपदस्य अधिकारी असो किंवा सर्वसाधारण शासकीय कर्मचारी असो त्याच्याकडून काम करवून घेण्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा काम करीतच असते. हे भ्रष्टाचारातील अनेक प्रकरणात खालच्या अधिका-यापासून ते उच्चपदस्थ अधिकारी यांची नांवे माध्यमातून उघड झाल्यानंतर लक्षात येतेच. याचे ताजे उदाहरण म्हणजे युपीए २ च्या काळातील टुजी स्पेक्ट्रम घोटाळा किंवा अलिकडेच बीड येथील तलाठी भरतीतील घोटाळा किंवा गौण खनीज उत्खनन घोटाळ्यावरून लक्षात येईलच परंतू या सर्वांमध्ये प्रशासनावर वचक ठेवणारी संस्था म्हणून कार्यरत असणा-या माध्यमकर्मींनी एखाद्यास अडचणी आणणारी महिती उघड केल्यास संबंधीत वार्ताहर प्रतिनिधी संपादक, उपसंपादक यांच्यावर प्राणघातक हल्ले करणे, त्यांना धमकीवजा फोन करणे किंवा कार्यालयावर हल्ला चढविणे असे अनेक प्रकारात वाढ होताना दिसत आहे. मुळातच लोकशाहीतील हा चौथा स्तंभ समाजासमोर सत्य मांडण्याचा कसोशीने प्रयत्न करीत असतो शासनाकडून किंवा इतर कोणत्याही घटकांकडून होणा-या समाजहिताच्या विरोधातील प्रकार उजेडात आणण्याचे काम तो प्रमाणिकपणे करीत असल्यामुळे अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्यात वाढ होतांना दिसत आहे.
देशातील जनतेचा विश्वास वरील तिन्ही संस्थेवरून उडाला असला तरी या चौथ्या संस्थेने आपले काम अद्यापपर्यंत तरी चोख बजावून तो कायम टिकविला असल्याचे लक्षात येतेच. म्हणून भारतातील जनता आपल्याला कोठे न्याय मिळाला नसला तरी या चौथ्या संस्थेकडून (माध्यम संस्थेकडून) नक्कीच न्याय मिळविण्यास मदत होईल अशी अपेक्षा बाळगून आहेत. लोशाहीमध्ये सर्व प्रश्नांवर मुक्त चर्चा होणे अपेक्षित असते. माध्यमांनीसुद्धा कोणाची भीड न बाळगता परखड लेखन व भाष्य करणे अभिप्रेत असते तसेच सरकार किंवा कोणीही चुकत असेल तर ते निदर्शनास आणून देण्याचे काम झालेच पाहिजे,तसेच होत असलेल्या चांगल्या कार्याला किंवा निर्णयाला तेवढ्याच ताकदीने पाठिंबा दिला पाहिजे. परंतू अलिकडच्या काळात भारतात पत्रकारावरील हल्ल्यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. पत्रकारांवर कितीही भ्याड प्रकारचे हल्ले झाले तरी या हल्लेखोरांना आपले ईस्पित साध्य करणे एवढे सोपे असणार नाही. कारण पत्रकारीतेचा आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर अशा अनेक हल्ल्यांचा सामना लोकमान्य टिळक,डॉ.बाबसाहेब आंबेडकर ,गोपाळ गणेश अगरकर,मुुकुंदराव पाटील यांच्यापासुन आत्ताच्या निखील वागळे,कुमार केतकर यांनाही करावा लागल्याचे दिसून येते.(परंतू टिळक,डॉ.आंबेडकर,आगरकर,पाटील यांच्यावर झालेले हल्ले व आत्ताचे पत्रकार वागळे,केतकर यांच्यावर झालेले हल्ले यांच्या कारणांचा अभ्यासदेखील व्हायला हवा ) हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे आलिकडेच बीड येथील दै.सुराज्यचे वृत्तसंपादक संजय मालाणी यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला हाही अशाच भ्याड हल्ल्यामध्ये मोडणारा ठरतो. संजय मालाणी हे मागील जवळपास दहा वर्षांवासून बीडमध्ये पत्रकारिता करीत आहेत. त्यांनी बीड जिल्ह्यातील अनेक प्रश्नांवर आपल्या पत्रकारितेतून आवाज उठविला आहे. तसेच सतत सत्याचा पाठपुरावा करण्यावर त्यांचा भर राहीला आहे. पत्रकारीता क्षेत्रात कार्य करू इच्छिणा-या अनेक नवोदित उदोयन्मुख पत्रकारांना ते सतत मार्गदर्श करीत असतात. त्यांच्यावर झालेल्या या हल्याचा परिणाम नव्याने पत्रकारिता क्षेत्रात येऊ इच्छिणा-या पत्रकारांच्या,भ्रष्टाचारा विरूद्ध किंवा अन्याया विरूद्ध उभे राहणा-या पत्रकारांवर विपरीत होऊ शकतो. त्यासाठी पत्रकारांवर हल्ला करणा-या हल्लेखोरांना वेळीच कडक शासन करणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलिस यंत्रणेने आपले काम चोखपणे बजावणे अपेक्षित आहे. तसेच या हल्ल्यांचा सर्व स्तरातून निषेध होणे तितकेच आवश्यक आहे.नाहीतर येणा-या काळात पत्रकारांकडून निर्भीड लेखनाची अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरेल.
लोकशाही व्यसस्था टिकवायची असेल आणि ती सुदृढ करावयाची असेल तर या व्यवस्थेतील चौथ्या खांबाच्या मजबूतीकरणासाठी प्रयत्न झालेच पाहिजेत. तरच माध्यमात काम करणारा प्रत्येक व्यक्ती निर्भीडपणे व निपक्षःपणे आपले कार्य करू शकेल. अन्यथा वचक नसणारी सरकारे,प्रशासन,भ्रष्टअधिकारी,व्यावसायिक,व्यापारी,संस्थाचालक या देशास नक्कीच रसातळाला पोहचविल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळे त्यावर आवश्यक वचक ठेवणा-या संस्थेवर म्हणजेच पत्रकारांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध करणे जरूरीच ठरते. प्रा.कैलास कांबळे k.kailas11@rediffmail.com
comments