महिला तक्रार निवारण समितीच्या प्रशिक्षणामुळे त्यांच्या कामाला दिशा मिळेल - विजया रहाटकर

2017-06-10 12:53:35
     1172 Views

औरंगाबाद, दि.८--कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या आजच्या कार्यशाळेमुळे समिती सक्षम होवून तिच्या कामाला दिशा मिळेल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज येथे व्यक्त केला.
येथील विभागीय आयुक्त कार्यालय आणि राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने संत तुकाराम नाट्यगृहात आयोजित मराठवाडास्तरावरील कार्यशाळेच्या उद्घाटन संमारभात श्रीमती रहाटकर बोलत होत्या. व्यासपीठावर विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, औरंगाबाद विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, नांदेड विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, पोलीस आयुक्त यशस्वी यादव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे आर्दड यांची प्रमुख उपस्थिती होती.
महिला व पुरुषांना समान हक्क देणारा हा कायदा आहे. समाजात जेव्हा भान राहात नाही, तेव्हा मात्र हा कायदा उपयोगी पडतो. कोणत्याही आस्थापनांच्या ठिकाणी कामावर असलेल्या महिलांना जेव्हा त्रास होतो. तेव्हा तिला कोठे जावे हे कळत नाही, तेव्हा हा कायदा उपयोगी होतो. असे सांगून श्रीमती रहाटकर म्हणाल्या की, कायद्याला चौकट आहे. कोणी काय करावे हे स्पष्ट सांगितले आहे. तक्रार निवारण समितीला न्यायिक अधिकार प्राप्त झाले आहेत. आजची कार्यशाळा ही ऐतिहासिक कामगिरी आहे. लोकांमध्ये या कायद्याविषयी गैरसमज आहेत. आता पुरुषांचे काही खरे नाही, असे म्हणने चुकीचे असून कार्यालयामध्ये एका महिलेने पुरुषाबद्दल तक्रार केली असेल आणि ती चुकीची असेल तर तिला शिक्षा करण्याची तरतूद या कायदात आहे. २०१३ चा हा अधिनियम महिलाबरोबरच पुरुषांनाही संरक्षण देतो, असेही त्या म्हणाल्या.
या कायदातंर्गत तक्रार निवारण समितीने दिलेल्या न्याय निवाड्यावर कार्यालयीन विभाग प्रमुखांनी सकारात्मक अंमलबजावणी करावी, असे या कायद्यात स्पष्ट केले आहे. राज्य आयोगाने गेल्या वर्षभरात या कायद्याची माहिती व्हावी म्हणून जवळपास ४५० ठिकाणी कार्यक्रम घेवून जनजागृती केली. या अयोगाचा तेजिस्विनी हा ॲप आहे. त्यावर देखील आयोगाची माहिती मिळेल व तक्रार नोंदविता येईल. काही दिवसातच राज्य महिला आयोग हेल्पलाईन सुरु करणार आहे. या हेल्पलाईनद्वारे महिलांना समुपदेशन केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. आयोगाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकांची व भित्तीपत्रकांची माहिती दिली.
विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी आपल्या तपशिलवार भाषणात महिलांची सुरक्षा, आदर व सन्मान करणे ही भारतीय संस्कृतीची देण आहे. या मराठवाड्यात तक्रार निवारण समितीतील अध्यक्ष, सदस्य मिळून २१६१ एवढी संख्या आहे. त्यांना या कार्यशाळेचा लाभ देण्यात येत आहे. मराठवाड्यात यासाठी १५९ नोडल ऑफीसर नेमण्यात आले आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या प्रेरणेने मराठवाड्यात एक झंजावात निर्माण झाला आहे. माहिती अधिकार कायदा, शिक्षणाचा हक्क कायदा, सेवा हमी कायदा यानंतर आता महिला लैंगिक छळापासून संरक्षण कायदा २०१३ हा कार्यान्वित झाल्याने उत्कृष्ट सामाजिक वातावरण निर्मिती झाली आहे. ही एक भाग्यकारी घटनाच म्हणावी लागेल. आता या पुढे विभागीय व जिल्हास्तरावरील अधिकारी आपापल्या मासिक बैठकीत महिला लैंगिक छळ कायद्याचा आढावा घेतील, असे ही त्यांनी सांगितले.
यानिमित्त पोलीस आयुक्त यशस्वी यादव, विशेष पोलीस महानिरीक्षक मिलींद भारंबे, चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनीही या कायद्याप्रती तपशिलवार विचार व्यक्त केले. विभागीय उपआयुक्त वर्षा ठाकूर-घुगे यांनी आपल्या प्रास्ताविकात एकूण लोकसंख्येच्या ४८ टक्के स्त्रिया असल्याचे सांगून १४ टक्के महिला नोकरीदार असल्याचे असे सांगितले.
प्रारंभी श्रीमती रहाटकर यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले. ‘सक्षमा’ या माहिती पुस्तिकेचे व चार भिंतीपत्रकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. पोलिसांची महिलांसाठी मदतीची भूमिका, स्टॉप सेक्श्युअल हरॅस्मेंट, महिला आयोग सदैव आपल्या पाठीशी, महिला संरक्षण कायदा २००५ ही ती भिंत्तीपत्रके आहेत. उद्घाटन कार्यक्रमानंतर विशाल केडीया, ॲड. अर्चना गोंधळेकर, श्रीमती मंगला खिवंसरा, डॉ. मोनाली देशपांडे, श्रीमती स्मिता अवचार, श्रीमती रश्मी बोरीकर यांनी महिलांचा लैंगिक छळ अधिनियम २०१३ या कायद्याची तपशिलवार माहिती सांगितली.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी महेंद्र हरपाळकर, प्रल्हाद कचरे, सरिता सूत्रावे, मंजूषा मुथा, शशिकांत हदगल, विजय राऊत, रमेश मुंडलोड, सुवर्णा पवार, रिता मेत्रेवार, महिला बाल कल्याण उपसंचालक श्रीमती लोंढे आदींनी परिश्रम घेतले. संचालन श्रीमती निता पानसरे यांनी सूत्रसंचालन केले.
comments