नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत करण्याची शासनाची भूमिका- पंकजा मुंडे

2017-03-18 14:10:57
     1588 Views

गारपीटग्रस्त भागाची केली पाहणी

बीड : बीड जिल्ह्यातील काही भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश देत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.

परळी आणि केज तालुक्यातील गारपीट आणि अवकाळी पावसामुळे बाधित भागाचा दौरा करुन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेवून नुकसानीची माहिती घेतली. परळी तालुक्यातील हिवरा, गोवर्धन, खारी तांडा, पिंपरी ब्रु, आदि गावांना बुधवारी झालेल्या गारपिटीचा व वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. या गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले. शाळा इमारत, विजेचे खांब आणि झाडे तसेच काही घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

श्रीमती मुंडे यांनी या भागाची पाहणी करुन शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले. घराची पत्रे उडाल्याने बेघर झालेल्या कुटूंबाला खावटीतून तत्काळ मदत देण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी सविस्तर आढावा घेतला. काही शाळाच्या इमारतीचे नुकसान झाल्याची बाब लक्षात आणून देत पालकमंत्री मुंडे यांनी शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव तत्काळ तयार करुन शासनास पाठविण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांना दिले. महावितरणने विजेची व्यवस्था खंडीत झाली असल्यास तत्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देशही देण्यात आले.

नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने सुरु केले असले तरी ते अधिक वेगाने पूर्ण करुन अहवाल शासनाकडे पाठविण्याची सूचना करुन पालकमंत्री मुंडे यांनी विशेषत: कापसाच्या नुकसानीचे स्वतंत्र पंचनामे करुन अहवाल करण्याबाबत मार्गदर्शन केले. कृषी विभागाकडून यावेळी जिल्ह्यातील नुकसानीची प्राथमिक माहिती घेवून पालकमंत्री मुंडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पावसामुळे नादुरुस्त पुल व रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले.

कुटुंबियांना आर्थिक मदत

बुधवारी वीज पडून मृत्यू पावलेल्या परळी तालुक्यातील शेतकरी आश्रोबा किसन गायकवाड आणि शेतमजूर सुशिलाबाई तुळशीराम कुंभार यांच्या घरी जाऊन पालकमंत्री मुंडे यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी शासनाच्या वतीने त्यांना प्रत्येकी ४ लाख रुपयांचे धनादेश देवून दिलासा दिला. तसेच गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत लाभ देण्याची सूचना केली. नेहमी वीज पडण्याच्या घटना होत असल्यामुळे अशा गावांच्या परिसरात वीज प्रतिबंधक यंत्रणा स्थापित करण्याचे निर्देश देत यासाठी जिल्हा नियोजन आराखड्यातून तरतूद उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी घोषणाही श्रीमती मुंडे यांनी केली.

केज तालुक्यातील येवता येथील शुभम सटवा निर्मळ (वय १५ वर्षे) यांचेही वीज पडल्यामुळे बुधवारी निधन झाले होते. त्यांच्या घरी जावून श्रीमती मुंडे यांनी दोन लाख रुपयांचा धनादेश त्यांच्या कुटुंबियाकडे सुर्पुद केला.

या दौऱ्यात पालकमंत्री मुंडे यांच्यासमवेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, सहायक जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश भताने, अप्पर जिल्हाधिकारी राम गगरानी आदी उपस्थित होते.
comments