घराबाहेर पडलेल्या स्त्रीला सन्मान मिळावा - शोभा खैरमोडे

2017-03-09 13:45:15
     1171 Views

बीड / प्रतिनिधी
आज स्त्री घराबाहेर पडलीय. आपल्या हक्कांसाठी जागृत झालीय. प्रसंगी यासाठी लढायचीही तिची तयारी आहे. शिकून ती शहाणी होऊ लागलीय. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ती सर्व क्षेत्रात वावरू लागलीय. आर्थिकदृष्ट्याही ती स्वतंत्र झालीय. आजची स्त्री स्वतंत्र आहे असे एका बाजूने दिसते तर दिल्ली, मुंबई आणि इतर ठिकाणी घडणार्‍या स्त्रीवरील अत्याचाराच्या कहाण्या वाचल्या, पाहिल्या म्हणजे आज स्त्री सुरक्षित नाही हे प्रकर्षाने जाणवते. म्हणुन घराबाहेर पडलेल्या स्त्रीला मावतेच्या दृष्टीने सन्मान मिळावा. असे प्रतिपादन शोभा खैरमोडे यांनी केले.
वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने आयोजित जागतीक महिला दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात खैरमोडे बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विठ्ठल एडके उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर कै. अण्णासाहेब पाटील सेवाभावी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब केदार, प्रति गर्जे, सोनाली शहाणे, सुकेशनी नाईकवाडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातील मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी शोभा खैरमोडे म्हणाल्या, आज कुटुंबातील मुलगा व मुलगी या दोघांना वागवताना तरी आई-बाबांकडून त्यांना समान वागणूक, समान दर्जा मिळतो का? खरं म्हणजे ही सुरुवात घरातूनच व्हायला पाहिजे. वडलांनी जर स्त्री म्हणून आईचा योग्य मान राखला, तिला आदराने वागवले तर मुलगा ते बघतच मोठा होतो. त्याला स्त्रीचा आदर करावा म्हणून वेगळं सांगावं लागत नाही. आईने आपल्या मुलांत मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता सारखी वागणूक दिली, दोघांनाही घरातली कामे करायला लावली तर मुलगा म्हणून आपल्याला काही विशिष्ट सवलती मिळतात किंवा मिळाव्यात असं मुलाला वाटणार नाही व मुलगी म्हणून आपणच घरात राबावं किंवा फक्त आपल्या वागण्यावरच निर्बंध घातले जातात ही उणेपणाची भावना मुलीत निर्माण होणार नाही. स्त्री आणि पुरुष ही निसर्गानेच निर्मिलेली दोन रूपं असून त्यांच्या शरीररचनेत जरी फरक असला तरी माणूस म्हणून दोघांनाही समान दर्जा आहे, हे लहानपणापासूनच मुलांच्या मनावर बिंबवले पाहिजे. असेही स्पष्ट केले. यावेळी सुकेशणी नाईकवाडे, प्रिती गर्जे, सोनाली शहाणे यांनी महिलांचे अधिकारी आणि सामाजिक न्याय या विषयावर मते मांडली.
यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक कु. रितु जोशी यांनी केले. सुत्रसंचलन कु. अश्विनी वाघमाने यांनी तर आभार कु. उन्नती चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. बप्पासाहेब हावळे, प्रा. छाया गडगे प्रा. वैजिनाथ शिंदे, प्रा. सुहास गाढवे, प्रा. अफ्रोज सय्यद, प्रा. सुरेश कसबे, सुधिर केंगार, संतोष मोरे, प्रविण पवार, जयदत्त गिरी आदीसह व्याख्यानास विविध महाविद्यालयातील विद्यार्थि, शिक्षक-शिक्षकेतर सेवक मोठया संख्येने उपस्थित होते.
comments