विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा समतोल राखून समृद्धीच्या दिशेने वाटचाल करावी - डॉ. चंदा अवढाळ

2017-03-09 13:40:00
     1157 Views

बीड / प्रतिनिधी
आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असताना आपण पर्यावरणाच्या र्‍हासाकडे डोळेझाक करुन चालणार नाही. निसर्गावर अन्याय करतो हे आपण त्सुनामी, सागरी वादळे, भूकंप, ढग फूटी, महापूर, दुष्काळ अशा अनेक नैसर्गिक प्रकोपाद्वारे जानवत आहे. हे सर्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा समतोल राखू आणि खर्या अर्थाने समृद्धीच्या दिशेने वाटचाल करावी. असे प्रतिपादन प्रा. डॉ. चंदा आवढाळ यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या विद्यार्थी कल्याण विभाग आणि वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने एक दिवसीय पर्यावरण संरक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. डॉ. चंदा आवढाळ बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विठ्ठल एडके उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर कै. अण्णासाहेब पाटील सेवाभावी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब केदार, प्रिती गर्जे, सोनाली शहाणे, सुकेशनी नाईकवाडे उपस्थित होते.
यावेळी प्रा. डॉ. चंदा आवढाळ म्हणाल्या, आपल्या हाती असलेले कार्य आपल्या घरुनच सुरुवात करुया. पुन्हा पुन्हा वापरात येऊ शकणार्या वस्तू जसे पेपर, काचेच्या वस्तू, अल्युमिनियम, मोटरऑईल अशांची पनुर्निर्मिती करुया. हातांनी जे काम करु शकतो ते काम इलेक्ट्रीक उपकरणाशिवाय करुया. शक्य असल्यास गरम पाण्याऐवजी थंड पाण्याचा वापर करुया या. प्लॅस्टीक पिशव्यांऐवजी परत परत वापरता येणार्या कागदी पिशव्या वापरु या. अन्न आणि भाजीपाला प्लॅस्टीकमध्ये न ठेवता अल्युमिनियम पापुद्र्यात ठेवूया. पाण्याचा गैरवापर करणे थांबवूया. घरातील रुम हिटरचा वापर न करता स्वेटर घालून इलेक्ट्रीक ऊर्जेचा वापर टाळूया. गरज नसल्यास घरातील टी.व्ही., बल्ब तसेच अन्य इलेक्ट्रीक उपकरणाचा वापर थांबवूया. घरातून बाहेर पडताना पाण्याचा हिटर, पंखा, विजेचा दिवा बंद करुया. अशा छोट्या- छोट्या गोष्टीतुन पर्यावरण संरक्षण होऊ शकते.
दुसर्‍या सत्रात शाश्वत शेतीसाठी पर्यावरण संरक्षण या विषयावर बोलताना प्राचार्य गणेश पोकळे म्हणाले, शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर जगभर वाढला. त्यामुळे त्याचा परिणाम सुपीक मातीवर झाला. कीडनाशकांचे वापराने त्यांचे अंश भाजीपाल्यामध्ये, जनावरांचे चार्‍यावर राहून तेच पुढे मानवाचे अन्नाद्वारे आहारात येऊन शारीरिक प्रश्न निर्माण करू लागले. तणनाशकांचे वापराने पाणी दूषित होऊ लागले. सर्व क्षेत्रांतील संशोधन आणि अधिक उत्पादनासाठी शासनाचे धोरण यामुळे सर्व जगभर नवीन प्रश्न आणि नवीन समस्या निर्माण झाल्या. एकात्मिक शेती संकल्पनेवर भर देऊन पाळीव प्राणी उत्पादन आणि शेती उत्पादन यांचा एकत्रित विचार केला आहे. त्या त्या भागानुसार त्यांचा अवलंब करण्याचे ठरवले. त्यातून मानवासाठी अन्न आणि कापडासाठी धाग्याची गरज भागेल. तसेच पर्यावरणात सुधारणा होईल. कृषी क्षेत्राची आर्थिक भरभराट व्हावी या उद्देशाने नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण आणि संवर्धन महत्त्वाचे आहे. असेही स्पष्ट केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक कु. रितु जोशी यांनी केले. सुत्रसंचलन कु. अश्विनी वाघमाने यांनी तर आभार कु. उन्नती चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. बप्पासाहेब हावळे, प्रा. छाया गडगे प्रा. वैजिनाथ शिंदे, प्रा. सुहास गाढवे, प्रा. अफ्रोज सय्यद, प्रा. सुरेश कसबे, सुधिर केंगार, संतोष मोरे, प्रविण पवार, जयदत्त गिरी आदीसह व्याख्यानास विविध महाविद्यालयातील विद्यार्थि, शिक्षक-शिक्षकेतर सेवक मोठया संख्येने उपस्थित होते.
comments