प्रसारमाध्यमातील स्त्रिया

2017-03-07 17:45:06
     1358 Views

समाजचिंतक चिंता व्यक्त करतात, त्याचा तरुण पिढीवर, लहान मुलांवर होणार्‍या परिणामांबद्दल तर फारच चिंता व्यक्त केल्या जाते. सतत भावनोत्तेजक दृश्य पाहून मुलांची हार्मोन्सची लेव्हल वाढते, त्यामुळे ते कायम उत्तेजित राहतात. यातून लैंगिक गुन्हे घडतात. हे टाळण्यासाठी मुलांना टीव्ही पाहू न देणे, (त्यासाठी त्यांना दुसर्‍या सृजनात्मक कामात गुंतविणे, कोडी सोडविणे, गणित सोडविणे ही पालकांची जबाबदारी आहे. कधी पालकांना काम असलीत तर मुलांना गुंतविण्यासाठी मुद्दाम टीव्ही लावून दिल्या जातो किंवा मोबाईल दिल्या जातो. ज्या गोष्टींपासून मुलांना दूर ठेवायचे त्याच गोष्टी पालक त्यांना करू देतात. टीव्हीऐवजी करावयाच्या कामांची यादी करून घरात लावायला पाहिजे.) त्यांच्या अतिरिक्त ऊर्जेचं चॅनलायझेशन करणे, भावनांचे सब्लिमेशन करणे ही पालकांची वाढलेली जबाबदारी आहे.
‘मुन्नी बदनाम हुयी’ , ‘शिलाकी जवानी’ , ‘हलकट जवानी’ , ‘तू चिज बडी है मस्त मस्त’ , ‘चिकनी चमेली’ , ‘जलेबी बाई’ , ‘मैं तंदुरी मुर्गी हू यार, ‘गटक मुझे अल्कोहोलसे’ ‘शांताबाई शांताबाई’ ही गाणी, त्यावरची नायिकेची अश्‍लील नृत्ये, त्यांचा वेशभूषा, या गाण्यांचे शब्द हे सगळं निमित्य, ओंगळ, किळसवाणे असूनही हे वाईट आहे हे न कळल्यामुळे (की कळून न वळल्यामुळे) लग्नात किंवा कुठल्याही समारंभात ही गाणी लावतात आणि त्यावर युवक-युवती तसलेच हावभाव करीत नाचतात. याबद्दल कुणालाच काही वाटत नाही, इतके सगळे संवेदनाहीन झालेत.
सगळ्यांच्या संवेदना इतक्या बोथट झाल्या की ही तरुण मंडळी जेव्हा लग्न करतील तेव्हा तो नवथरपणा, नात्यातील ती कोवळीक, तो निरागसपणा अनुभवू शकतील? आम्ही बहिणी आणि बाबा जेव्हा एकत्र टीव्ही पाहत असू, तेव्हा एखादं आक्षेपार्ह दृश्य आलं तर एकतर बाबा उठून जात किंवा आम्ही उठून जायचो, चॅनल बदलायचो. आता आमच्या सगळ्यांच्याच संवेदना इतक्या बोथट झाल्या की, आमच्या मुलांसोबत तसली दृश्य पाहताना आम्हाला काहीच वाटत नाही किंबहुना आमच्या बालमनावर विपरीत परिणाम होऊ नये, याची काळजी मुलंच घेतात. आमचे आईबाबा ठरवायचे मुलांना हा सिनेमा दाखवायच्या लायकीचा आहे की नाही. आता मुलं आधी सिनेमा बघून येतात आणि ठरवतात आईबाबांना पाठवायचं की नाही. यातली अतिशयोक्ती सोडली तरी समाज बदललाय् हे नक्की. (चांगला की वाईट हे प्रत्येकाचं परसेप्शन वेगळं असतं.) पूर्वी हिरॉईन, डान्सर (बिंदू, हेलन) व्हिलन, व्हॅम्प वेगळ्या असायच्या. आता हिरॉईनच सगळं असते, तीच झाडाभोवती, प्रियकराभोवती नाचते आणि हिरो हिरॉईनच्या घरासमोर सामूहिक पिटी करतो.
साधारणतः प्रसारमाध्यमातलं स्त्रीचित्रण दोन प्रकारचं असतं. एकदम सोशिक, सोज्वळ, सात्त्विक, पती-परमेश्‍वर मानणारी स्त्री किंवा एकदम बंडखोर, कटकारस्थान करणारी व्हॅम्प. विवाहबाह्य संबंधात गुंतलेली दारू-सिगरेट पिणारी पुरुषांना सतत आकर्षित करणारी, नाना लफडी करणारी. एकदम काळी किंवा पांढरी ग्रे एरिया कुठेच नाही. किचन पॉलिटिक्समध्ये गुंतलेली (ननंद, भावजय, सासू यांच्यावर मात करण्याच्या प्रयत्नात असलेली, नवर्‍याला मुठीत ठेवणारी, सुनेला नामोहरण करणारी, मुलापासून तोडणारी (मग ती मुलाचं लग्नच का करून देते? मुलगा आपल्यापासून दूर जायला नको असेल तर, असे प्रश्‍न विचारायचे नाहीत. फक्त बुद्धी गहाण ठेवून मालिका बघायच्या) नोकरांवर डाफरणारी ज्याला त्याला विष खाऊ घालणारी झोपेच्या गोळ्या दुधातून देणारी, किराणा सामानात विषाची बाटली, झोपेच्या गोळ्या दर महिन्याला आणणारी, खूप दागदागिने घालून, भरजरी साड्या नेसून घरकाम करणारी. कधी कधी प्रश्‍न पडतो, इतक्या मोठ्या बंगल्यात राहतात, इतके दागदागिने घालतात मग कामाला नोकर का नाही ठेवत? इतके दागिने आणि भरजरी साड्या नेसून त्यांना काम सुचतं तरी कसं? त्यांच्या साड्यांची इस्त्री कधीही मोडत कशी नाही? त्यांच्या साड्यांवर डाग का पडत नाही? वास्तवातल्या स्त्रिया आधी साडी बदलल्याशिवाय घरचे आरामदायक कपडे घातल्याशिवाय स्वंयपाकघरात शिरत नाही. साड्यांना आणि दागिन्यांना किती जपतात. दागिने तर कायम लॉकरमध्येच असतात. आर्टिफिशियल ज्वेलरीच्या जमान्यात एवढे खरे दागिने? घरी साड्यांमध्ये वावरणार्‍या स्त्रिया नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ६० च्या वरच्या स्त्रिया साड्यांमध्ये दिसतील पण तरुण मुली.
मालिकेतली नायिका नेहमीच सर्वगुणसंपन्न असते. आता संपलेल्या ‘होणार सून मी’ मधली जान्हवी तर आजेसासुला कम्प्युटर आणि एका काकूला इंग्लिश शिकविते. सगळ्यांच्या सगळ्या समस्यांची उत्तरं तिच्याजवळ असतात. तिच्या येण्यामुळे घरातल्या सगळ्या रिकामटेकड्या बायका कामाला लागतात. एक ब्युटीपार्लर टाकते तर दुसरी ड्रेस डिझाईनिंग करायला लागते. इतक्या सासवांना ती लिलया हाताळते. तिला सगळे पदार्थ अगदी अगदी आजेसासुबाईंच्याच चवीचे करता येतात. तिच्या कार्यक्षमतेमुळे ती ऑफिसमध्ये बॉसच्या मर्जीतली आहे. यामुळे सगळ्या सासवा जान्हवीसारखी अफाट कर्तृत्व असलेली सून मिळावी म्हणून नवस बोलायला लागल्यात. मराठी मालिका जरा तरी बर्‍या. पण एकता कपूरच्या मालिका प्रेक्षकांच्या बुद्धिमत्तेचा, आकलनक्षमतेचा धडधडीत अपमान करतात. या इतक्या मेलोड्रामॅटिक वास्तवापासून दूर नेणार्‍या असतात की प्रेक्षक त्याच्याशी रिलेटच करू शकत नाही.
जाहिरातीतील स्त्रिया तर वास्तवापासून शेकडो मैल दूर असतात. केवळ सुंदर दिसणे हीच त्यांच्या जीवनाची इतिकर्तव्यता असते. ती गोरी नसल्यामुळे तिला नोकरी मिळत नाही, कुठलाही मुलगा तिच्या मागे लागत नाही. ती कधीही प्रकाश झोतात येत नाही. मग तिला जादुची कांडी सापडते. कुठलं तरी क्रिम, साबण, शाम्पू याच्या वापरामुळे ती आमूलाग्र बदलते. ती सुंदर दिसायला लागते, तिचा आत्मविश्‍वास वाढतो. तिला चांगला नवरा मिळतो, चांगली नोकरी मिळते. ती यशोशिखरावर चढते. केवळ एका क्रिममुळे, शाम्पूमुळे किंवा साबणामुळे! यशाचा इतका सोपामार्ग असताना वास्तवात मुली इतका अभ्यास का करतात?
अर्ध्यापेक्षा जास्त जाहीराती या फेअरनेस क्रिम, शाम्पू आणि साबणाच्या असतात. ती सतत धुणीभांडी करत असते. मुलांचा विचार करीत असते. त्याच्यासाठी कॉम्प्लॉन बोर्नव्हिटा, चांगल्या प्रतीच्या बदाम तयार सतत तयार ठेवते. ती कॉम्प्लान देऊन मुलांना उंच, बुद्धिमान आणि बळकट करते. बोर्नव्हिटा देऊन त्याच्यासोबत धावते, ‘तयारी जीत की’ साठी. प्रत्यक्षात किती आया आपल्या मुलांसोबत धावतात. डाग पडले तरी तिला टेन्शन येत नाही. ती म्हणते ‘डाग अच्छे है’ त्यांना ना कपडे धुण्याचे टेन्शन, ना भांडी घासण्याचं. त्यांची सगळी काम झटपट होतात. प्रत्यक्षात ही कामं किती वेळखाऊ, कंटाळवाणी आणि एकसुरी आहेत हे त्या गृहिणीलाच ठावूक. या जाहिराती स्त्रित्वाच्या साचेबंद आणि पारंपरिक कल्पनांना आणखी घट्ट करतात. ‘रोज क्या बनावू’ असा विचार बाबा कधीच करीत नाही.
आईच करते आणि तिच्या मदतीला असतात एव्हरेस्ट मसाले ‘टेस्ट मे बेस्ट, मम्मी और एव्हरेस्ट’ पापा और एव्हरेस्ट नाही. नवर्‍यानी मदत केल्यास सगळ्यांनाच रुचिपालट होईल. कितीही थकली, पाठ दुखली तरी घरकाम तिनेच करायचे. नवरा, मुलं फारतर मुव्ह लावून देतील पण तिला आराम कर म्हणणार नाही, किंवा घरकामात मदत करणार नाही.
दृकश्राव्य माध्यमातून दिसणार्‍या स्त्रीप्रतिमांबद्दल युनेस्को म्हणतो, ‘जागतिक स्तरावर अशा माध्यमातून स्त्रियांचे चार प्रकारे चित्रण केले जाते. १. सेक्स किटन म्हणजेच मादक खेळणे. २. कुटुंबवत्सल माता, ३. चेटकीण-भुरळ पाडणारी मायावी विकृत स्त्री, ४. करीअरसाठी धडपडणारी स्त्री.
या अहवालात शेवटी असं म्हटलं आहे की, येत्या ७५ वर्षांत तरी माध्यमांमध्ये स्त्री-पुरुष समानता येणे शक्य नाही.
जाहिरातीत दिसणारं क्रिम लावून पाहण्याची, ते साबण विकत आणण्याची सवय महिलांना लागते. एक काळा केस, एक मुरुम त्यांची झोप उडवू शकतो. एक डाग त्यांना सर्व शक्तिनिशी कामाला लावतो. जाहिरातीतून केलेली अतिशयोक्ती, खोटारडेपणा, इमोशनल ब्लॅकमेलिंग हा वेगळाच मुद्दा आहे. ‘जो बिबीसे करे सच्चा प्यार, व प्रेस्टीजसे कैसे करे इन्कार’ ही जाहिरात अभिषेक आणि ऐश्‍वर्याने केल्यावर बिचार्‍या गरीब नवर्‍याला बायकोवरचे प्रेम सिद्ध करायला प्रेस्टीजच शिवाय दुसरा पर्यायच उरत नाही.
इंटरनेट डिऍडीकंशन सेंटर दोन वर्षांपूर्वी निघालय. काही दिवसांनी टीव्ही डिऍडीकंशन सेंटर निघेल. एखादा एपिसोड जरी मिस झाला तरी बायका अस्वस्थ होतात. सगळी कामं आधी आटोपून, बाहेरून त्यावेळेच्या आधी येऊन भक्तिभावाने टीव्हीसमोर बसतात. रिपीट टेलेकास्ट असतं म्हणून बरं. नाहीतर मालिका दिग्दर्शकाची काही खैर नव्हती. टीव्हीमुळे सगळी काम ब्रेकब्रेकमध्ये करायची सवय गृहिणींना लागली. एका ब्रेकमध्ये कुलर लावायचा, दुसर्‍या ब्रेकमध्ये भाजी फोडणीला द्यायची. तेवढ्या वेळात जमायलाच पाहिजे. मालिकेतील एक शब्द सुद्धा सुटायला नको. त्यावेळात कुणी आलं तर ‘‘काय माणूस आहे भलत्याच वेळी आलाय्’ ’ अशा नजरेनं त्याला पाहिलं जातं. पटकन चहा देऊन त्याला कटवलं जातं. त्यालाही टीव्हीसमोर बसवल्या जातं. त्याला अशा प्रकारची वागणूक मिळते की तो कानकोंडा होतो.
ब्लेड, डिओ, ऑफटरशेव्ह लोशनच्या जाहिरातीत कमी कपड्यातल्या स्त्रिया दिसतात. ज्या अँगलने त्यांना दाखविले जाते त्यावरून ती त्या वस्तूची जाहिरात नसून स्त्री शरीराची जाहिरात आहे असे वाटते ती स्त्री त्या उत्पादनाची जाहिरात करते की स्वतःची हेच कळत नाही. काही काही जाहिराती इतक्या अश्‍लील आणि बिभत्सपणे दाखविल्या जातात की ती जाहिरात संततिनियमनाच्या साधनाची आहे असे पाहणार्‍याला वाटते. पूर्वी फक्त स्त्रियाच कमी कपड्यामध्ये दाखवायचे पुरुषही कमी कपड्यात दाखवतात.
- माधुरी साकुळकर
comments