डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा - प्रा. मिसाळ

2017-03-07 17:43:14
     1870 Views

बीड / प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण, राजकारण, राज्यघटना, समाजकार्य, चळवळी, धार्मिक परिवर्तन अशा टप्प्यांतून पुढे जात सामाजिक परिवर्तन घडविले. देशातील तत्कालीन जातीय, धार्मिक रूढी-परंपरेच्या जोखडातुतन मुक्त कारण्याचे काम राज्यघटनेच्या माध्यमातुन केले. अशा शिक्षणतज्ञ, घटनातज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे प्रतिपादन प्रा. नारायण मिसाळ यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभाग आणि वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यान मालेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि आजचा तरूण या विषयावर प्रा. नारायण मिसाळ बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विठ्ठल एडके उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर कै. अण्णासाहेब पाटील सेवाभावी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब केदार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातील मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रा. नारायण मिसाळ म्हणाले, डॉ. बाबासाहेबांनी समानतेची शिकवण दिली असून, आपण त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे. बाबासाहेबांनी आपणाला जी शिकवण दिली. जे विचार दिले. ते सत्यात उतरवण्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या मार्गावर चालण्याची गरज आहे. विशेषत: बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालताना त्यांची पुस्तकेही वाचणे आवश्यक आहे. असेही प्रा. नारायण मिसाळ यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या दुसर्‍या सत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना या विषयावर बोलताना भाऊसाहेब केदार म्हणाले,आधुनिक भारतात वाढत चाललेल्या अन्याय, अत्याचाराला वाचा फोडून वंचित समाजासाठी न्याय देवून त्या समाजाला शिक्षण प्रवाहात आणले. स्वातंत्र्य, समता आणि बंधूता या नैतिक मूल्यांची सार्या जगाला शिकवण दिली त्या महामानव व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आत्मचिंतन करणे ही काळाची गरज आहे. जागतिक महासत्ता असणार्या अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात जगातील सात विद्वानांची डॉक्टर ऑफ लॉ या बहुमानाच्या पदवीसाठी निवड करण्यात आली. त्यात डॉ. आंबेडकरांचे नाव प्रमुख होते. अतिशय खडतर परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश युवकांना दिला. अशा ध्येयप्रेरित विचारवंताचा आदर्श आजच्या तरुणांनी घ्यावा, असे आवाहनही भाऊसाहेब केदार यांनी केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य विठ्ठल एडके म्हणाले, सत्ताधार्यांमध्ये मग्रूरपणा वाढू लागला आहे. आपला सामाजिक अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार हे सारे खपवून घेतले जाईल अशी प्रवृत्ती काहीजणांमध्ये निर्माण होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत लोकशाहीचे आणि संविधानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी मोठी असून तसा विचार व्यापक प्रमाणावर व्यक्त होणे गरजेचे आहे. आर्थिक मंदी तसेच जागतिकीकरणाच्या नावाखाली शेतकरी तसेच अन्य समाज उद्ध्वस्त होण्याची चिन्हे दिसत आहेत. या परिस्थितीवर प्रगत म्हणवणारा महाराष्ट्र मात करू शकला नाही तर ती शोकांतिका ठरेल. अशा वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आणि मूल्यांची आठवण प्रकर्षाने होते. परंतु डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेले सामाजिक परिवर्तन अजूनही खर्या अर्थाने झालेले नाही हे लक्षात घ्यायला हवे. त्यासाठी जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन परिवर्तनाद्वारे समतेचा लढा लढण्याचा निर्धार व्यक्त व्हायला हवा.
यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. छाया गडगे यांनी केले. सुत्रसंचलन प्रा. बप्पासाहेब हावळे यांनी तर आभार प्रा. विजय दहिवाळ यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. वैजिनाथ, सुहास गाढवे, अफ्रोज सय्यद, सुरेश कसबे, सुधिर केंगार, संतोष मोरे, प्रविण पवार, जयदत्त गिरी आदीसह व्याख्यानास विविध महाविद्यालयातील विद्यार्थि, शिक्षक-शिक्षकेतर सेवक मोठया संख्येने उपस्थित होते.
comments