स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या कामकाजाचा जिल्हाधिकारी राम यांच्याकडून आढावा

2017-02-24 12:31:51
     899 Views

बीड, दि. २२ :- स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी बाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली व उपसंचालक तथा समन्वय अधिकारी श्रीमती स्मिता झगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे दि आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस बीड जिल्हयातील नगर परिषदा तसेच नगरपंचायतीचे सर्व मुख्याधिकारी हजर होते.
या बैठकित जिल्हाधिकारी राम यांनी स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अंमलबजावणीबाबत नगरपरिषद तसेच पंचायत निहाय आढावा घेतला. गेवराई नगर परिषद सर्वसाधारण सभेने दिनांक १८ फेब्रुवारी २०१७ रोजी ठराव घेउन गेवराई शहर हगणदारीमुक्त झाल्याचे जाहीर केलेले आहे. त्याबद्दल जिल्हाधिकारी राम यांनी गेवराई नगर परिषदेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांचे अभिनंदन केले. धारुर नगर परिषदेने शहर हगणदारीमुक्त जाहीर करणेसाठी दिनांक २८ फेब्रुवारी २०१७ रोजी सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. त्याअनुषंगाने मुख्याधिकारी नगर परिषद धारुर यांनी त्यादृष्टीकोनातुन दैनंदिन आरखडा तयार करुन कामकाज करणे तसेच योजनेसाठीचे पूर्ण आवश्यक प्रमाणपत्र ई. हस्तगत करणे,शहरातील सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करुन तेथे पाण्याची व्यवस्था करुन ते नागरीकांसाठी उपलब्ध करुन देउन शहर हगणदारीमुक्त करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
यापुढे शहर हगणदारीमुक्त झाल्याशिवाय कुठल्याही प्रशासकिय मान्यता देण्यात येणार नाहीत त्यामुळे सर्वांनी त्यांना ठरवुन दिलेल्या कालमर्यादेत म्हणजे ३१ मार्च २०१७ अखेर कुठल्याही परिस्थितीत शहर हगणदारीमुक्त करणे अनिवार्य असल्याचे निर्देश दिले. तसेच शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी मुख्याधिकारी यांनी प्रत्येक ओ.डी.स्पॉटनिहाय गुडमॉर्निंग पथकाची नेमनुक करावी सोबत पोलास बंदोबस्त ठेवण्यात यावा व याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची नोंद ठेऊन त्यांचे घरांचे सर्व्हेक्षण करुन आवश्यक असणाऱ्यांना शौचालयाचा या योजनेतुन लाभ देण्यात यावा. या कामात जे मुख्याधिकारी निष्काळजीपणा करतील त्यांचेविरुध्द प्रशासकिय कार्यवाही प्रस्तावीत करुन त्यांच्या गोपनिय अहवालात त्याची नोंद घेण्यात येईल असे कडक निर्देशही यावेळी देण्यात आले.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी शहरातील एन.जी.ओ.,सेवाभावी संस्था,महिला बचत गट यांना यात समाविष्ट करुन नागरिकांचे प्रबोधन करावे. ज्या नागरिकांनी या योजनेतुन प्रथम हप्ता घेउन अद्यापही शौचालयाचे बांधकाम सुरु केलेले नाही त्यांचेविरुध्द गुन्हे नोंद करावेत. तसेच उघडयावर शौचास जाणाऱ्या नागरिकांविरुध्द मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार फौजदारी व दंडात्मक स्वरुपाची कार्यवाही करावी असे निर्देश दिले. यासोबत शहरातील नागरिकांनी या शासनाच्या महत्वपुर्ण योजनेत आपला सहभाग नोंदवुन शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम व उपसंचालक तथा समन्वय अधिकारी श्रीमती स्मिता झगडे यांनी केले आहे.
comments