करुण नायरचं धडाकेबाज त्रिशतक

2016-12-19 16:54:49
     1016 Views

चेन्नई: टीम इंडियाचा मधल्या फळीतील नवखा फलंदाज करुण नायरने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. पदार्पणाच्या कसोटी मालिकेत नायरने इंग्लंडविरुद्ध धडाकेबाज नाबाद त्रिशतक झळकावलं आहे. नायरच्या दणदणीत त्रिशतकाच्या जोरावर भारताने पहिला डाव ७ बाद ७५९ धावांपर्यंत मजल मारून, डाव घोषित केला. चेन्नई कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ गाजवला तो टीम इंडियाच्या करुण नायरनं. नायरनं ३८१ चेंडूत ३२ चौकार आणि ४ षटकार ठोकून त्रिशतकाला गवसणी घातली
करुण नायर हा आपल्या पहिल्याच कसोटी शतकाचं त्रिशतकाच रुपांतर करणारा आजवरचा तिसराच खेळाडू ठरला. याआधी गॅरी सोबर्स आणि बॉबी सिम्पसन यांनी असा पराक्रम गाजवला होता.तसंच करुण नायर हा कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा दुसराच भारतीय फलंदाज ठरला. याआधी वीरेंद्र सहवागनं कसोटी क्रिकेटमध्ये दोनवेळा त्रिशतक झळकावण्याचा पराक्रम गाजवला होता. त्यानंतर आता करुण नायरनं इंग्लंडविरुद्धच्या चेन्नई कसोटीत त्रिशतक साजरं केलंय.नायरने त्याचं १८५ चेंडूत शतक, ३०६ चेंडूत द्विशतक पूर्ण केलं.
दरम्यान भारताने कसोटी इतिहासात सर्वोच्च धावसंख्येची नोंद केली आहे. भारताने स्वत:च्या ७२६ धावांचा विक्रम मोडला आहे.
कालच्या डावात लोकेश राहुलचे एका धावेने हुकलेल्या द्विशतकाचा आनंद आजच्या मॅचमध्ये करुण नायरने भारतीय चाहत्यांना दिला. याशिवाय आर. अश्विनने त्याला चांगली साथ देत अर्धशतक पूर्ण केले. इंग्लंडने पहिल्या डावात ४७७ धावा केल्या होत्या. याआधी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारत ४ बाद ३९१ धावांवर होता. तिसरा दिवस लोकेश राहुलच्या खेळाने गाजला. त्याने केवळ शतक झळकावले नाही तर करिअरमधील बेस्ट स्कोर केला. केवळ १ रनने त्याचे द्विशतक हुकले.
comments