चंद्रभागेचे प्रदूषण थांबविण्यासाठी नमामि चंद्रभागा अभियान

2016-04-21 18:54:22
     213 Views

मुंबई, दि. २१ : चंद्रभागा ही महाराष्ट्राच्या निखळ, निरागस श्रद्धेचा मानबिंदू आहे. वारकरी आणि चंद्रभागा यांचे अतूट नाते आहे. चंद्रभागेच्या पावित्र्याचे आणि निर्मळतेचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन ‘नमामि चंद्रभागा अभियान’ शासन आणि लोकसहभागातून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून येणारी आषाढी वारी ही अधिक निर्मल करणार असल्याची ग्वाही वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
काल मंत्रालयात पंढरपूर वारीमार्गावरील सर्व मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छतागृहे, रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उपलब्ध करण्याबाबत वित्तमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार श्रीमती मेधा कुलकर्णी, सेवा सहयोग फाऊंडेशनचे नरेंद्र वैशंपायन, चंद्रशेखर कुलकर्णी, संदीप जाधव, अतुल नागरस, देहू संस्थांनचे माजी अध्यक्ष शिवाजीराव मोरे, यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या अभियानांतर्गत २०२२ पर्यंत चंद्रभागा नदी ही प्रदुषणमुक्त करून तिचे जतन आणि संवर्धन करण्यात येणार आहे. त्यासाठी सन २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे असे सांगून वित्तमंत्री म्हणाले की, चंद्रभागा नदीच्या पाण्याच्या प्रदुषणास कारणीभूत ठरणारे घटक नदीच्या प्रवाहात येण्यापासून रोखण्याच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील.
लोणी आणि यवतमध्ये गेल्यावर्षी पथदर्शी स्वरूपात स्वच्छ आणि निर्मळ वारीचा प्रकल्प राबविण्यात आला होता. या प्रकल्पाला मिळालेले यश लक्षात घेऊन हा प्रकल्प आता दोन्ही वारी मार्गावरील सर्व पालखीतळासाठी राबविण्यात यावा अशा सूचना श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी व्हिडिओ कॉन्फरसींगद्वारे विभागीय आयुक्त पुणे यांना दिल्या.
पुढे ते म्हणाले की, हा पथदर्शी प्रकल्प यशस्वीपणे राबविणाऱे माजी खासदार प्रदीप रावत, देहू संस्थानचे माजी अध्यक्ष शिवाजीराव मोरे, आणि सेवा सहयोग फाऊंडेशनचे सी. आर. कुलकर्णी या अशासकीय सदस्यांना विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीस निमंत्रित करण्यात यावे तसेच त्यांचे स्वच्छ आणि निर्मळ वारीसंदर्भातील अनुभव आणि मते जाणून घेतली जावीत व यासंबंधीचा अहवाल येत्या पंधरा दिवसात शासनाकडे सादर केला जावा.
comments