दिवाळी ऐवजी शेतक-यांचं दिवाळं

09/11/2012 17 : 55
     536 Views

महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी शेतक-यांच्या सुख-दुःखांचा विचार न करता तसेच त्यांचे रक्ताचे पाणी करणारे अपार कष्ट याची किंमत न करता दिवाळी साजरी करण्यासाठी नगदी पीकांच्या उत्पादनाला कमीत-कमी भाव जाहीर करून शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. त्यातच ऊस, कापूस आणि सोयाबीन पीकांच्या दरासंदर्भात शासनाने हात वर केल्याने महाराष्ट्रातील शेतक-यांना दिवाळी साजरी करण्याऐवजी त्यांचं दिवाळ निघाल आहे. यामुळे येणा-या कालखंडात कापूस, सोयाबीन आणि ऊस उत्पादक शेतक-यांनी आत्महत्या केली तर त्याला सर्वस्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार जवाबदार असणार आहे.
महाराष्ट्रातील शेतक-यांचे नगदी पीक म्हणून ऊसाचे पीक ओळखले जाते. महाराष्ट्रात सहकारी कारखाने देखील शेतकरी सभासदांचे आहेत. या शेतकरी सभासदांना योग्य दर मिळावा याचे नियोजन राज्यसरकार आणि साखर संघाने करणे अपेक्षीत असते. ऊस गळीत हंगाम सुरू होण्याच्या एक महिन्या आगोदर ऊसाचा दर शासनाने जाहिर केल्यास आंदोलने आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही. मात्र ज्या सरकारला साखर सभासदांनी मतदान करून सत्तेवर आणले त्याच सभासदांचा टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न राज्य शासनाने चालवला आहे. ऊसाचे दर निश्चित करण्यामध्ये राज्यसरकार हस्तक्षेप करणार नाही अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील सहका-यांनी घेतली आहे. त्यामुळे केवळ निवडणूकीमध्ये विजयासाठी आर्थिक मदत करणा-या संचालकांचे हित जोपासण्यासाठी साखर उत्पादक, सभासद शेतक-यांना देशोधडीला लावण्याचे घोर पाप राज्यसरकार करत आहे.
विदर्भ आणि मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन होते. कापूस उत्पादन शेतक-यांनादेखील ५ ते ६ हजार रुपये भाव मिळणे अपेक्षित होता. मात्र शासनाने याच भागातील आणखी शेतक-यांच्या आत्महत्या वाढाव्यात याच छूप्या हेतूने दलाल पोसण्यासाठी केवळ कापसाला ३,९०० रूपये हमी भाव जाहीर केला आहे. ऐन सनासुदीच्या म्हणजेच दिवाळीच्या मुहूर्तावर सन साजरा करण्यासाठी शेतकरी नाईलाजास्तव कापूस विक्री करून सुखाची दिवाळी साजरी करतो. याचा आर्थिक फायदा उठवण्यासाठी राज्यसरकारने ११ नोव्हेंबर पासून पणन महासंघाच्या वतीने कापूस खरेदी सुरू करणार आहे. राज्यात कापूस खरेदी साठी १०९ खरेदी केंद्रे सूरू करण्यात येणार आहेत. ही खरेदी केंद्रे देखील शेतक-यांना पिळवण्याचाच एक धंदा बनली आहेत. तर दुस-या बाजुला सोयाबीन सारख्या पीकाला जुलै-ऑगस्टच्या दरम्यान ५,०००रुपये दर बाजारपेठेत होता. मात्र शेतक-याचे सोयाबीन बाजार पेठेत आल्यानंतर सोयाबीनचे दर गडगडले आणि आज सोयाबीनला २००० ते ३००० रूपये दर मिळत आहे. त्यामुळे कोरडवाहू भागातील शेतक-यांचे कंबरडेच मोडले आहे.
राज्यात शेतक-यांच्या आत्महत्या अलीकडच्या कालखंडात कमी झाल्या होत्या, पण या वर्षी शेतक-यांच्या उत्पादनाला भाव नाकारून येणा-या कालखंडात आणखी शेतकरी आत्महत्या करतील अशी परिस्थिती राज्यसरकारने निर्माण केली आहे. राज्यात दुष्काळसदृस्य परिस्थिती असताना राज्यशासन शेतकरी आणि शेतक-यांसाठी योग्य हमी भाव देवून त्यांना आधार देईल अशी अपेक्षा होती. मात्र राज्यसरकारने शेतक-यांनी दिवाळी साजरी करू नये या हेतूने दिवाळी ऐवजी शेतक-याचं दिवाळ काढल आहे.
comments