बदलता महाराष्ट्र

04/11/2012 8 : 53
     535 Views

जुलै महिन्यात दोन दिवस सबंध देश अंधारात बुडालेला असताना महाराष्ट्रात अखंडीत वीज पुरवठा सुरू होता. खाजगी वीज उत्पादकांकडून वीज खरेदी करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयामुळे हे शक्य होऊ शकले. दोन हजार साली राज्यातील दररोज विजेची मागणी १० हजार मेगावॅट असताना वीज पुरवठ्यात तीन हजार मेगावॅटची तूट होती. २०११-१२ साली ही तूट तीन हजार ते तीन हजार ५०० मेगावॅट होती. या कालावधीत विजेची मागणी १६ हजार मेगावॅट होती. ही तूट भरून काढण्यासाठी शासनाने खाजगी वीज उत्पादकांकडून सहा हजार मेगावॅट अतिरिक्त वीज उपलब्ध करुन घेतली.

नोव्हेंबर २०१० मध्ये मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी ऊर्जा, मत्स्यविकास, आरोग्य, शिक्षण अशासारख्या क्षेत्रांकडे विशेष लक्ष दिले. राज्यातील वीज पुरवठ्याची स्थिती सुधारल्याने मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे यासारख्या औद्योगिक क्षेत्रातील भारनियमन बंद झाले. परिणामस्वरूप महाराष्ट्रात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक आली. गेल्या वर्षी परदेशी कंपन्यांसोबत एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे ४० सामंजस्य करार केले गेले.

महाराष्ट्रातील ९८ टक्के गावे बारमाही रस्त्यांनी जोडली आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सायन, चेंबूर, कांदिवली येथे तीन उड्डाणपुलांची निर्मिती केली. ’ आम्ही गुंतवणूकदारांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा पुरवित असल्याने महाराष्ट्र हे परदेशी गुंतवणूकदारांचे पहिल्या पसंतीचे राज्य राहिले आहे’ ही बाब मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली आहे.

सद्यस्थितीत सर्वाधिक १५ विमानतळ असलेले महाराष्ट्र हे देशात एकमेव राज्य आहे. यामध्ये शिर्डी विमानतळाचा समावेश असून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक भेट देत असतात. नाबार्डने कृषी आणि ग्रामविकासासाठी २०११-१२ साली ६०२४ कोटी रुपयांचे साहाय्य केले. २०१०-११ पेक्षा हे साहाय्य ७१ टक्क्यांनी अधिक आहे. २०१०-११ साली हे साहाय्य ३५३३ कोटी रुपयांचे होते. ग्रामीण भागातील रस्ते, पूल, पिण्याचे पाणी, गोदामे, सार्वजनिक आरोग्य, अंगणवाडी केंद्रे आणि सांडपाणी निचऱ्याच्या सोयी अशासारख्या पायाभूत सुविधा निर्मितीसाठी नाबार्डने १७७७ कोटी रुपयांचे साहाय्य केले. ग्रामीण बँकेमार्फत ४६० कोटी रुपयांचे कर्ज वितरण करुन महाराष्ट्राने सबंध देशात पहिला क्रमांक पटकावला.

७५ हजार प्राथमिक शाळा, २२ हजार माध्यमिक शाळा, चार हजार उच्च शिक्षणाच्या संस्था आणि १९ विद्यापीठे असलेले महाराष्ट्र देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक पायाभूत सुविधा असणाऱ्या राज्यांपैकी एक आहे.

इन्फ्रास्ट्रक्चर कन्सल्टंट कंपनी अर्न्स्ट आणि यंग यांच्या २०१० च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील महाविद्यालये आणि संस्थांमध्ये १५ लाख विद्यार्थ्यांनी नावे नोंदविली. ही संख्या देशात सर्वाधिक आहे. दूरसंचार क्षेत्रातही महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली आहे. सर्वाधिक दूरध्वनी महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात २० लाख कायमस्वरुपी दूरध्वनी जोडण्या आणि सात कोटी वायरलेस टेलिफोन जोडण्या आहेत. मार्च २०११ पर्यंत महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक १५ लाख इंटरनेट ग्राहक तर २२ लाख ब्रॉडबॅण्ड ग्राहक होते.
comments