डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची आदर्श पत्रकारिता

2016-04-13 14:59:51
     2138 Views

भारतीय समाज व्यवस्थेमध्ये वृत्तपत्राची मुळे अगदी खोलवर रूजलेली आहेत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये भारतीय समाजाला योग्य दिशा, योग्य ज्ञान, योग्य विचार व योग्य न्याय देण्याचे कार्य वृत्तपत्राने केले आहे. सर्वसामान्यांवर होणा-या अन्याय-अत्याचाराला वाचा फोडण्याचे कार्य सातत्याने वृत्तपत्राने केले आहे.सर्वसामान्यांला त्यांचे हक्क, जबाबदा-या कर्तव्याची जाणीव करून देण्याचे कार्य वृत्तपत्राने केले आहे. म्हणूनच वृत्तपत्राला ‘लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ’ म्हणून ओळखले जाते. सर्वसामान्यांचे ज्ञायपीठ म्हणून वृत्तपत्राकडे पाहीले जाते. वृत्तपत्राशिवाय भारतीय समाज दुबळा आहे. असे म्हटले तरी वावगे ठरणार नही. कारण आजही सकाळी घराबाहेर पडण्यागोदर व्यक्ती वृत्तपत्र वाचल्याशिवाय बाहेर पडत नाहीत. समाजात अनेक कामाची सुरूवात सकाळचे वृत्तमानपत्र वाचूनच केली जाते.
कोणतेही चांगले काम समाजापर्यंत पोहचविण्यासाठी त्याला प्रसार माध्यमाची आवश्यकता असते.अन्यथा चांगल्या कार्याचे दर्शन समाजाला होऊ शकत नाही.डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात.
‘कोणतीही चळवळ, यशस्वी करण्यासाठी
त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते.
ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते,
तीची आवस्था पंख तूटलेल्या पक्षाप्रमाणे होते.’
अशाच पद्धतीची पत्रकारितेची सुरूवात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ३१ जानेवारी १९२० साली ‘मुकनायक’ या पाक्षिक वृत्तपत्रामधून केली. डॉ.आंबेडकरांनी प्रामुख्याने मुकनायक, बहिष्कृत भारत, जनता या तीन वृत्तपत्रामधून पत्रकारिता केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी विशिष्ठ उद्दिष्ठांनी प्रेरित होऊन सामाजातील अन्याय-अत्याचार पिडीत लोकांना न्याय मिळून देण्यासाठी त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून लढा उभारला. वृत्तपत्राच्या उद्दिष्ट्ये निश्चितीच्या संदर्भात आगोदर सामाजिक सुधारणा की, राजकीय सुधारणा, असा भेदभाव न करता दोन्ही गोष्टींची आवश्यकता लक्षात घेवून आपल्या पत्रकारितेची सामाजिक सुधारणा, सामाजिक परिवर्तन आणि राजकीय सुधारणा, राजकीय परिवर्तन हे उद्दिष्टे निश्चित केली. अस्पृश्य समाजात जागृती व स्पृश्य समाजातही जागृती अशी दुहेरी भुमिका स्विकारली. हिंदु समाज जीवनामध्ये आणि अस्पृश्य समाज जीवनामध्ये क्रांती घडवून आणण्याच्या उद्दिष्ठे ठेवली. ही उद्दिष्टे हस्तगत करणे हाच त्यांचा जिवनकार्याचा आणि पत्रकारितेचा धर्म झालेला होता. ‘मुकनायक’ हे डॉ.आंबेडकरांच्या जीवन व विचाराचे दर्शन होय. ‘मुकनायक’ हा त्यांचा चरित्रवेद आणि विचारवेद ही आहे.पत्रकारितेमधून त्यांना अस्पृश्यामध्ये आत्मजाणीव जागृती करावयाची होती त्यांच्या व्यथा वेदनांना वाचा फोडण्याचे काम त्यांना आपल्या पत्रकारितेमधून करायचे होते.अस्पृश्यांना राजकीय हक्क, राजकीय क्षेत्रात त्यांना वेगळे हक्क प्राप्त करून देण्यासाठी आपल्या पत्रकारिते मधून कार्य केले. हजारो वर्षे ज्या अस्पृश्य जातींना समाज व्यवस्थेने व धर्मव्यवस्थेने मुक-बधीर बनविले, अशा मुक्यांना,बहि-यांना डोळे-वाचा-मती आणि गती देण्याचे कार्य त्यांनी ‘मुकनायक’ या वृत्तपत्राच्या अग्रलेखामधून केले.
३१ जानेवारी १९२० रोजी डॉ.आंबेडकरांनी ‘मुकनायक’ या वृत्तपत्राची सुरूवात केली. या वृत्तपत्राची संपादक जबाबदारी त्यांनी पांडूरंग नंदराम भटकर यांच्याकडे सोपवली. कारण डॉ.आंबेडकर हे सिडनेहॅमसारख्या सरकारी कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून कार्य करित होते. त्यामुळे त्यांना उघडपणे संपादक पदावर कार्य करणे शक्य नव्हते. तर मुकनायकाच्या व्यवस्थापकपदी श्री.ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांची नेमणूक केली होती. परंतू डॉ.आंबेडकर हे बॅरीस्टरच्या उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले असता त्यांच्या पश्चात संपादकीय आणि व्यावस्थापकीय विभागाच्या मतभेदामुळे ‘मुकनायक’ अल्पावधीतच बंद पडले. लंडनहून परत आल्यानंतर त्यांनी इ.स.१९२७ साली ‘बहिष्कृत भारत’ नावाचे दुसरे पाक्षिक वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्राच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्पृश्य व अस्पृश्य समाजात समाज परिवर्तन, समाज जागृती आणि समाज सुधारणा हे कार्य सुरू केले. त्यांनी २० जुलै १९२४ साली ‘बहिष्कृत हितकारणी सभा’ स्थापन केली. तिचे उद्दिष्टे ‘शिका,संघटीत व्हा व संघर्ष करा’ ही होती तिचे उद्दिष्टे प्राप्त करणे हेच ‘बहिष्कृत भारत’ या वृत्तपत्राचे उद्दिष्टे होते परंतू काही कारणामुळे ‘बहिष्कृत भारत’ अल्पावधीतच बंद पडले. पुन्हा त्यांनी १९३० मध्ये ‘जनता’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी बहिष्कृतांची उन्नती करण्यासाठी प्रथम वृत्तपत्राद्वारे समाज जागृती करणे. त्यांच्या मनामध्ये उन्नतीची जाणीव निर्माण करणे आत्मजाणिव निर्माण करणे. अन्याय-अत्याचार आणि चुकीच्या वर्तनाची तसेच प्रस्थापीत विषमतावादी तत्वज्ञानाची त्यांना जाणीव करून देणे. त्यांचे मत परिवर्तन करणे. बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास व त्यांच्या भावी उन्नतीचे मार्ग ख-या स्वरूपाची चर्चा होण्यासाठी वृत्तपत्रासारखी अन्यभूमी नाही हे डॉ.आंबेडकरांना ज्ञात होते. समाजात होत असणा-या अन्यायाला वाचा फोडणारी व दिशा देणारी त्यांनी पत्रकारिता केली. अस्पृश्य समाजाला माणूस म्हणून जगता आलेच पाहिजे हे त्यांच्या पत्रकारितेचे उद्दिष्टे होते. आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून अस्पृश्य लोकांचा एक गौरवशाली इतिहास डॉ.आंबेडकरांनी वृत्तपत्ररूपी चळवळी मधून घडवून आनला. त्यांचे ‘जनता’ हे वृत्तपत्र प्रदिर्घकाळ चालले. त्या वृत्तपत्रातून त्यांनी स्वातंत्र्य पूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये मोलाचे कार्य केले. स्वातंत्र्य नंतर १९५६ साली या वृत्तपत्राचे रूपांतर ‘प्रबुद्ध भारत ’ मध्ये होईपर्यंत ते वृत्तपत्र सातत्याने चालले.
पत्रकारिता म्हणजे समाजातील प्रत्येक घटकावर होणा-या अन्याय-अत्याचाराला वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देणे होय. चांगल्या कामाचा गौरव करणे. वाईट कामाला आळा बसवणे हे पत्रकारितेचे कार्य असते. आंबेडकरांच्या पत्रकारितेने सबंध पत्रकारितेला एक आगळा वेगळा आदर्श निर्माण करून दिला. आपल्या वृत्तपत्राद्वारे स्पृश्य समाज, अस्पृश्य समाज व सरकार, राजकीय विचारवंत, समाज सुधारक यांना योग्य दिशा दाखविण्याचे कार्य केले. नवनिर्मिती हे त्यांच्या वृत्तपत्राचे अविभाज्य अंग असल्यामुळे समाजपरिर्वत हे समाज सुधारणेसाठी त्यांच्या पत्रकारितेने निश्चित स्वरूपाची भूमिका बजावलेली आहे. तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक व शैक्षणिक घडामोडीची त्यांनी निःपक्षपातीवृत्तीने समाजापुढे सत्य माहिती आणि नवे विचार प्रभावीपणे मांडण्याचे कार्य केले. त्यांच्या पत्रकारितेने सामाजिक, राजकीय , धार्मिक, आर्थिक, समाज जीवनाच्या समग्र परिवर्तनात अत्यंत महत्वाचे कार्य केले.डॉ.आंबेडकर म्हणतात ‘ पत्रकारिता हे पैसे कमविण्याचा धंदा नसून, लोक जागृती करिता घेतलेली स्वयंदीक्षा आहे.’ त्यांनी संबंध समाजाला एक दिशादर्शक पत्रकारिता केली. डॉ.आंबेडकरांनी आपल्या पत्रकारितेच्या स्वातंत्रता,समता, बंधुता व न्याय या तत्वांना प्रामुख्याने स्थान दिले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून स्वातंत्रपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देखील समाजाला नवी दिशा व समाज परिवर्तन घडवून आणण्याचा आदर्श निर्माण केला. वृत्तपत्राच्या संपादकाचे कार्य हे त्या वृत्तपत्राचा आरसा असतो. संपादकाचे कार्य म्हणजे त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून संपादकाच्या सद्सद्विवेक बुद्धीचे दर्शन असते हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून दाखवून दिले व समाजाचे खरे चित्र जगापुढे आणण्याचे मोलाचे कार्य केले आहे.
त्यांच्या ५७ व्या महापरिनिर्वाणदिनामित्त विनम्र अभिवादन !

प्रा.बप्पासाहेब हावळे
comments