‘प्रभू’ कृपा!

2016-02-26 12:01:27
     824 Views

‘यंदाचा रेल्वे अर्थसंकल्प सामान्य जनतेला डोळ्यांसमोर ठेवून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण होतील’ असा विश्‍वास रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला होता. तो खरा ठरला. यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात प्रवासी किंवा मालवाहतुकीत कोणतीही भाडेवाढ रेल्वेमंत्र्यांनी केलेली नाही. वाढत्या महागाईत रेल्वे प्रवाशांसाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. सोयी-सुविधांची खैरात अर्थसंकल्पात झाली आहे. चालू वर्षी पाच राज्यांत होणार्‍या विधानसभा निवडणुकांचा प्रभाव रेल्वे अर्थसंकल्पावर पडल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतल्यास नवल नाही. ‘सबका साथ, सबका विकास’ हेच ध्येय नजरेसमोर ठेवून मोठ्या घोषणा कटाक्षाने टाळल्या गेल्या. केलेल्या घोषणा मंत्री विसरतात असा सर्वसाधारण अनुभव आहे. मात्र आपण घोषणा विसरत नाही हे लक्षात आणून देण्यासाठी ‘मागील वर्षीच्या घोषणांवर काम सुरू आहे’ असे प्रभूंनी आवर्जून सांगितले. रेल्वेला तोट्याच्या खाईतून वर काढण्यासाठी इतर पर्याय असल्याचे सांगून बचतीचा नारा दिला. चालू आर्थिक वर्षात रेल्वे साडेआठ हजार कोटींची बचत करेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सात नवे अभियान, लांब पल्ल्याच्या मार्गांवर अंत्योदय व दीनदयाळ तसेच हमसफर, तेजस व उदय नावाच्या नव्या गाड्या, रेल्वेच्या संपूर्ण विद्युतीकरणावर भर, बाळासह प्रवास करणार्‍या मातांसाठी ‘जननी सेवा’ , महिलांच्या सुरक्षेसाठी २४ तास हेल्पलाईन, बडोद्यात रेल्वे विद्यापीठ आदी योजनांचा समावेश रेल्वे अर्थसंकल्पात आहे. आहेत. उपनगरी गाड्यांमधील वाढती गर्दी आणि प्रवाशांच्या वाढत्या अपघाती मृत्यूंचा प्रश्‍न प्रभूंच्या स्मरणात आहे. त्यादृष्टीने मुंबई, दिल्ली, कोलकाता व चेन्नईतील उपनगरी गाड्यांवरचा प्रवासी भार कमी करण्यासाठी कार्यालयांच्या वेळा बदलण्याबाबत राज्य सरकारकडे रेल्वे पाठपुरावा करत आहे. रेल्वेचे हे स्वयंस्फूर्त प्रयत्न निश्‍चितच सकारात्मक आहेत. आर्थिकदृष्ट्या रेल्वे सक्षम करण्याचे उद्दिष्ट प्रभूंनी ठेवले आहे. परंतु भाडेवाढीतून मिळणार्‍या ठोस उत्पन्नाकडे पाठ फिरवणे रेल्वेला किती दिवस झेपेल? अपंगांना ‘दिव्यांग’ संबोधण्याची ‘मनकी बात’ पंतप्रधानांनी केली होती. प्रभूंनीसुद्धा त्यांचे अनुकरण करत हमालांना ‘प्रवासी सहायक’ असा नावबदल सुचवला आहे. एकूणच प्रवाशांना लुभावणारा अर्थसंकल्प रेल्वेमंत्र्यांनी सादर केला. सुधारणांवर भर देताना भाडेवाढ किती दिवस थोपवायची, याचाही विचार त्यांनी केला असेलच. प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी जागरूक प्रयत्न करणार्‍या रेल्वेमंत्र्यांच्या प्रयत्नांना ‘देशदूत’ सुयश चिंततो. सर्व वाचकांच्या वतीने रेल्वेमंत्र्यांचे अभिनंदन!
comments