स्त्री-पुरूष समानतेची दुटप्पी भूमिका

2016-02-05 17:22:17
     838 Views

मी नास्तिकही नाही. खेडय़ातून शहरात प्रवास झाला परंतु कुणाच्या श्रद्धेचा अपमान करणे, किंवा त्यांच्या नियमाविरुद्ध जावून त्यांच्या आस्थेची खिल्ली उडवणे मला शिकवले गेले नाही. अन्य जाती धर्मातील शिक्षकांनी देखील नाही. याचा अभिमान आहे मला! मैत्रिणीसोबत उज्जैनला गेले होते. तेथील पुजा-यांनी दक्षिणा देण्याचा हेका लावला तसा हातात असलेले अकरा रुपये पर्समध्ये परत ठेवले. परंतु मैत्रिणीने श्रद्धेने दिलेल्या १०० रुपये दक्षिणेची आणि ओटीची खिल्ली उडवली किंवा देवावरील माझा जो काही थोडाफार विश्वास आहे, तोही कमी झाला नाही! ज्याप्रमाणे आईवडिलांचा, ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद कधीही दिसत नाही तरीही आपण त्यांच्या पाया पडतो तसेच श्रद्धेचे आहे. आस्थेचे आहे जी दिसत नाही पण असते. एका मंदिरात आपली आस्था नसताना केवळ स्त्री पुरुष समानतेच्या नावाखाली अकारण गोंधळ घालणे माझ्या स्वभावात नाही! ईश्वर आहे मानणारे नियम आपसूक पाळतात. ईश्वर नाहीच मानणारे असेच धडका मारत राहतात. नाही एका मंदिरात प्रवेश ना ठीक आहे. हजारो मंदिरे आहेत. मी तिथे जाईन. तिथला आशीर्वाद घेईन. आणि कुठेही प्रवेश दिला नाहीतरी माझे काही अडणार नाही! ‘शोधिसी मानवा.राऊळी मंदिरी. नांदतो देव हा अपुल्या अंतरी. बरोबर ना?

एकीकडे शनि, शन्या, एक दगड फक्त, असले कुत्सित संबोधन वापरायचं, मंदिराला अंधश्रद्धा म्हणायचे, घरीच देव असताना मंदिरात जायची गरज काय म्हणून कडाडून टीका करायची व दुसरीकडे चौथ-यावर जाण्यासाठी तमाशे करायचे? ठेवूनच पाहू चौथ-यावर पाय. बघू काय करतोय शनि, असे आव्हानात्मक बोलणे नास्तिकच करू शकतात! अरे, नाही पटत तुम्हाला देव तर नका त्याच्या नादी लागू. संधीचा फायदा घेऊन इतरांना परावृत्त करा! प्रवेशासाठी खटाटोप कशाला?

तसेही चौथ-यावरच प्रवेश केल्याने. काही बिघडणार नाही! .करून पहा.! कालपर्यंत देव धर्माच्या नावाने खडे फोडणारे, आज मंदिरात जबरदस्तीने प्रवेश मिळवणार.. आणि उद्या याच मंदिरावर प्रश्नचिन्ह उभे करून मंदिराविरोधात आंदोलन करणार..असले दुटप्पी वागणे मला जमत नाही. जमणारही नाही! आपण भारतभूमीला माता म्हणतो, ‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी असे म्हटले जाते. देवाच्या दारी ओटी भरणारी स्त्री असते.. कुठे स्त्रियांना मोठेपणा दिलाय तर कुठे पुरुषांना.! हे समजून घेण्याइतकीही समजदारी आपल्यात नसावी? शिंगणापूर येथे पुरुषांनादेखील चौथ-यावर जायला बंदी घातली परंतु त्यासाठी कोणत्याही पुरुषाने आंदोलन उभे केले नाही. त्यांना त्यात त्यांचा अपमानही वाटला नाही! बरोबरी करायची तर त्यांच्या समजूतदारपणाची करायला हवी!
comments