हुरड्याचेही हवे ब्रँडिंग

2016-02-04 20:26:07
     883 Views

अलीकडे वाढत्या शहरीकरणा-मुळे शेतजमिनी नष्ट होत असताना दुसरीकडे शेतांविषयीचे आकर्षण वाढू लागले आहे. यातूनच कृषी पर्यटनाची संकल्पना पुढे आली. हुरड्याचा सीझन कृषी पर्यटनासाठी उत्तम ठरतो. परंतु हुरडा, ज्वारी आदींची मागणी वाढत असताना त्याच्या उत्पादनवाढीकडे लक्ष दिले जात नाही. त्या दृष्टीने प्रयत्न झाल्यास कोरडवाहू क्षेत्रातील शेतकर्‍यांनाही सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत
नववर्षाची सुरुवात अतिशय आल्हाददायक वातावरणात होते. शेत-शिवारात विविध पिके ऐन भरात आलेली असतात. त्यांचा फडशा पाडण्यासाठी पक्ष्यांचे थवे ठिकठिकाणी हिंडत असतात आणि शेतकरी राजा या पक्ष्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी सज्ज असतो. गोफणीद्वारे, बुजगावणे उभे करून या पक्ष्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न होतो. जीवापाड जपलेले पीक हाताशी येत असताना होणारा आनंद मोजता येणारा नसतो. विविध पिकांनी तरारलेली अशी शेतं इतरांसाठी आकर्षणाचे केंद्र न ठरली तरच नवल. त्यामुळे या दिवसात शेत-शिवाराच्या भटकंतीचे बेत आवर्जून आखले जातात. अर्थातच, त्याला निमित्त असते हुरडा पार्टीचे. सकाळच्या
कोवळ्या उन्हात किंवा सायंकाळच्या सोनेरी किरणांच्या साक्षीने गोवर्‍यांच्या पेटवलेल्या आगटीवर भाजलेली कणसे, त्याचे कोवळे- लुसलुशीत चवदार दाणे आणि सोबत विविध प्रकारच्या चटण्या असा खासा बेत म्हणजे खवय्यांसाठी अनोखी पर्वणीच. शिवाय जोडीला ऊस, कोवळा हरभरा असा सरंजाम असतो. अलीकडे यात स्वीट कॉर्न अर्थात गोड मक्याचाही अंतर्भाव केला जात आहे. हे कमी म्हणून की काय जेवणाला अस्सल गावरान बेत असतो. एकूणच हुरडा पार्टी हा ऐकण्या-बोलण्याचा नव्हे तर अनुभवण्याचा प्रकार आहे. त्यामुळे शेतावर जाऊन आवर्जून हा आनंद घ्यावा असा माहोल पहायला मिळतो.
कृषी पर्यटन संजीवनी ठरणार
सध्याच्या मार्केटिंगच्या जमान्यात प्रत्येक उत्पादनाचे महत्त्व वाढत आहे तसेच त्याचा व्यापक प्रसार आणि प्रसारही होत आहेत. त्याला ‘हुरडा पार्ट्या’ही अपवाद ठरत नाहीत. अर्थात, राजकीय नेत्यांना, सामाजिक क्षेत्रातील मंडळींना आपल्या शेतावर हुरडा पार्टीसाठी आवर्जून बोलावण्याची परंपरा काही ठिकाणी वर्षानुवर्षे पाळली जात आहे. सध्याही अनेक ठिकाणी अशा पार्ट्यांची धामधूम सुरू आहे. राजकीय नेत्यांसोबत कार्यकर्तेही या पार्ट्यांचा आनंद लुटत असतात. अलीकडे वाढत्या शहरीकरणामुळे शेतजमिनी नष्ट होत असताना दुसरीकडे शेतांविषयीचे आकर्षण वाढू लागले आहे. साहजिक, शेत पाहण्याच्या ओढीने का होईना, ग्रामीण भागाकडे जाणार्‍यांची संख्या वाढत आहे. यातूनच कृषी पर्यटनाची संकल्पना पुढे आली आणि पाहता पाहता कमालीची लोकप्रिय झाली. हुरड्याचा हंगाम कृषी पर्यटनासाठी अगदी उत्तम ठरतो. कारण या काळात शेतात विविध पिके डौलात उभी असतात. सिंचनाची सुविधा असणार्‍या ठिकाणी बर्‍यापैकी पाणी उपलब्ध असते. थंडीसारख्या आरोग्यदायी ऋतूमुळे ही भटकंती आणखी आनंददायी ठरते. अलीकडे अनेक शेतकरी पारंपरिक शेती व्यवसायाला या कृषी पर्यटनाची जोड देऊ लागले आहेत. हा अल्प भांडवलावर आणि उपलब्ध सोयी-सुविधांद्वारेच करता येण्यासारखा व्यवसाय असून त्यातून आर्थिकदृष्ट्या मिळणारा आधारही महत्त्वाचा ठरत आहे. यापुढे बहुतांश शेतकर्‍यांसाठी कृषी पर्यटन ही संजीवनी ठरणार आहे.
ज्वारी उत्पादनात वाढ
या पार्श्‍वभूमीवर यावेळी हुरडा पार्ट्यांचा आनंद घेऊ इच्छिणार्‍यांसाठी फारसे समाधानकारक चित्र दिसत नाही. कारण दुष्काळी स्थितीमुळे राज्यातील ज्वारी उत्पादनावर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी पावसाने बरीच ओढ दिल्याने खरिपाचा हंगाम फारसा हाती लागला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची मदार रब्बी हंगामावरच राहिली. अर्थात, या हंगामासाठी परतीच्या पावसाचा दिलासा महत्त्वाचा ठरला. त्यामुळे ज्वारीचे पीक सरासरीपेक्षा कमी प्रमाणात का होईना, उत्तम येऊ शकले. परंतु काळ्या मातीतून तरारून वर आलेले पीक, मग ते मुबलक असो वा अल्प प्रमाणात, त्या प्रती शेतकर्‍यांचा आत्मीयतेचा भाव तोच असतो. त्यामुळे शेतातील ठरावीक पट्ट्यातच आलेल्या ज्वारीच्या पिकाच्या वेळी अमावास्येला पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात येते. यानंतर ऐन भरात आलेल्या पिकांच्या संरक्षणाकडे तसेच काढणीकडे शेतकर्‍यांना विशेष लक्ष द्यावे लागते. अर्थात, यावेळी उत्पादनात झालेल्या घटीमुळे हुरडा आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध होणे कठीण आहे. शिवाय हुरड्याचा हंगामही काही दिवसांचाच असण्याची शक्यता अधिक आहे. असे असले तरी हुरडा पार्टीकडील वाढता ओढा तसेच ज्वारीची वाढती मागणी लक्षात घेता या पिकाच्या उत्पादनवाढीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे ठरणार आहे.
जलयुक्त शिवार योजना दिशादर्शक ज्वारी हे खरे तर कोरडवाहू क्षेत्रातील पीक आहे. राज्यातील काही जिल्हे हे ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहेत. परंतु अन्य जिल्ह्यातही हे पीक कमी-अधिक प्रमाणात घेतले जाते. महाराष्ट्रातील हवामान आणि येथील शेत जमीन या दोन्ही गोष्टी ज्वारीच्या पिकासाठी पोषक ठरणार्‍या आहेत. असे असले तरी सिंचनाखालील क्षेत्र वाढले तसे राज्यात उसाच्या लागवडीखालील क्षेत्रात वेगाने वाढ झाली. हमखास आणि अधिक उत्पादन देणारे, फार लक्ष द्यावे न लागणारे पीक म्हणून शेतकरी उसाच्या लागवडीला महत्त्व देऊ लागले. परिणामी, राज्यात उसाचे पट्टेच्या पट्टे निर्माण झाले आणि या पिकाबाबतही समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे आता उसासारखे पीक घेतानाच काही क्षेत्र ज्वारी वा अन्य अन्नधान्य पिकासाठी राखून ठेवणे हिताचे ठरणार आहे. कारण अलीकडे शहरी भागातही आहारातील ज्वारीचा वापर वाढला आहे. अगदी धाब्यांपासून फाईव्ह स्टार हॉटेल्सपर्यंत ज्वारीच्या भाकर्‍यांना मोठी मागणी प्राप्त होत आहे. एवढेच नव्हे, तर महाराष्ट्रातून विविध देशांना ज्वारीच्या भाकर्‍यांची निर्यात केली जात आहे. त्याद्वारे अनेक हातांना काम प्राप्त होत आहे. यावरून ज्वारीचे वाढते महत्त्व लक्षात आल्याशिवाय राहत नाही.ज्वारी ही आरोग्यासाठी अतिशय उत्तम ठरते. अशा परिस्थितीत आरोग्यविषयक वाढत्या जागरूकतेमुळे यापुढेही ज्वारीला सतत मागणी राहणार आहे. त्याचबरोबर तिला दरही चांगला मिळणार आहे. अन्य शेतमालाच्या किंमतीतील चढ-उतारामुळे सतत चिंतेत असणार्‍या तसेच नुकसान सहन करणार्‍या शेतकर्‍यांनी या संधीचा अवश्य विचार करायला हवा. विशेषत: कोरडवाहू क्षेत्रातील शेतकर्‍यांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे. राज्यात जलयुक्त शिवाराची अनेक कामे सुरू असून येत्या पावसाळ्यात या योजनेद्वारे पूर्ण झालेल्या प्रकल्पात बर्‍यापैकी पाणीसाठा होण्यास मदत होईल. त्याचा परिणाम म्हणून जवळपासच्या विहिरींचा पाणीसाठा वाढण्यासही मदत होणार आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांनी ज्वारीच्या लागवडीकडे विशेष लक्ष द्यायला हवे. ज्वारीच्या उत्पादनवाढीच्या दृष्टीने शासन स्तरावरही प्रयत्न गरजेचे ठरणार आहेत. त्यात या शेतकर्‍यांना माफक दरात वेळेवर आणि दर्जेदार बियाणे उपलब्ध करणे, ज्वारीच्या अधिक उत्पादन देणार्‍या नवनवीन जाती विकसित करणे, ज्वारीच्या साठवण व्यवस्थेसाठी शेतकर्‍यांना सहाय्य देणे तसेच उत्तम विक्री व्यवस्था निर्माण करणे या बाबींचा समावेश असणे गरजेचे आहे.
यापूर्वी राज्यात फळबागा लागवडींना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने राबवलेल्या योजना यशस्वी ठरल्या. त्यातून राज्यात फळबागांच्या लागवडीखालील क्षेत्रात बरीच वाढ झाली, फळांचे उत्पादनही वाढले, संबंधित शेतकर्‍यांना त्याचा फायदा झाला. हेच प्रयत्न राज्यात ज्वारीच्या उत्पादनवाढीबाबत व्हायला हवेत. राज्यात अजूनही जिरायत शेती करणार्‍यांची संख्या मोठी असून त्यांना दिलासा देण्यासाठी ज्वारीच्या उत्पादनवाढीचे प्रयत्न महत्त्वाचे ठरणार आहेत. तसे झाल्यास पुन्हा एकदा राज्यातील सर्व शेत-शिवारे ऐन हंगामात ज्वारीच्या पिकांनी तरारून वर आलेली पहायला मिळतील. त्या ओढीने आलेले पाखरांचे थवेच्या थवे आकाशात दृष्टीस पडतील. शेता-शेतांवर हुरडा पार्ट्यांची लगबग आणि खवय्यांची गर्दी पहायला मिळेल. हे सारे दृश्य पाहून बळीराजा संतुष्ट पावेल, त्या काळ्या आईलाही समाधान मिळेल.
comments