एक सर्वश्रेष्ठ राजा छत्रपती शिवाजीराजे

2015-02-19 21:02:43
     1088 Views

फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ (म्हणजे इंग्रजी वर्षाप्रमाणे १९ फेबु्रवारी १६३०) रोजी माँ जिजाऊंच्या पोटी पुत्ररत्न झाले. शिवनेरी किल्ल्यावरील शिवाईदेवीच्या नावावरून त्यांचे नाव ‘शिवाजी’ ठेवले. आजही सह्याद्रीच्या दरीकपारीतून शिवरायांचा जयजयकार निनादतो. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी स्वराज्य स्थापनेची कल्पना वास्तवात उतरवली आणि धर्मव्यवस्था, राज्यव्यवस्था, समाजकारण, राजकारण, न्यायव्यवस्था, अर्थव्यवस्था, महसूल, शेती या सर्व गोष्टींना व्यवस्थित हाताळणारे आणि त्यात बदल करणारे जगातील एकमेव श्रेष्ठ राजे ठरले. म्हणून शिवरायांचा राज्याभिषेक ही भारतीय इतिहासातील एक अपूर्व घटना सुवर्ण अक्षरांनी कोरली गेली. खरे तर शिवरायांच्या जडणघडणीत माँ जिजाऊंचे खूप मोठे योगदान होते. असा धैर्यवान, पराक्रमी राजा ज्या मातेने घडविला त्या जिजाऊ माता खूप धन्य आहेत. म्हणून त्या वीर मातेसमोर माथा आदराने झुकतो.आपलेपणाची भावना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य होते म्हणूनच रयतेच्या स्वराज्य कार्यातील सहभाग ही ऐतिहासिक गोष्ट ठरली.
छत्रपती शिवाजी महाराज हे अंधश्रध्दा व खुळ्या समजुतीच्या विरुध्द होते तसेच ते स्त्रियांचे रक्षक होते म्हणूनच ते सर्व स्त्रियांना आपल्या आई, बहिणी मानीत. त्यांच्यावर कुठे अन्याय, अत्याचार झाला तर ते अत्याचार करणा-या नराधमाला कठोर शिक्षा करत. शिवाजी राजे यांचा इतिहास, त्यांचे मौलिक विचार, त्यांचे महान कार्य आजही आपल्याला प्रेरणादायी ठरते. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले ही आपल्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. १६७४ साली शिवरायांचा राज्याभिषेक झाला. राज्यावर बसल्यानंतर त्यांनी रायगडाला राजधानी केले. राज्यात अनेक सुधारणा केल्या. दानधर्म करताना त्यांनी कधीही हिंदू- मुस्लिम असा भेद केला नाही.
अखेर काळाने त्यांच्यावर ३ एप्रिल १६८० रोजी झडप घातली आणि ...सर्वांना दु:खाच्या खाईत लोटून शिवाजी महाराजांनी या जगाचा निरोप घेतला....रयतेचा वाली गेला. संत रामदासांनी त्यांचे वर्णन करताना म्हटले,
निश्चयाचा महामेरू।
बहुत जनासी आधारू।
अखंड स्थितीचा निर्धारू।
श्रीमंत योगी।।
-सौ. रूपाली वैद्य (वागरे)
तथागतनगर, नांदेड
comments