बाजार निवडणुकीचा भरला...


मराठीमध्ये एका गाण्याची ओळ अशी आहे की ‘बाजार फुलांचा भरला, मज तुळस दिसेना’ आज काहीशी अशीच परिस्थिती आहे. नवरात्र आणि निवडणुकीच्या निमित्ताने एकीकडे फुलांचा आणि दुसरीकडे मतांचा जोगवा मागणा-यांचा बाजार भरलेला दिसून येतो. परंतु या सगळ्या गोंधळामध्ये ज्या पध्दतीचे पावित्र्य आणि सभ्यता जाणवायला हवी, ती दिसत नाही. बाजार फुलांचा भरला मज तुळस दिसेना, असे म्हणत असताना त्या गीतकाराला सर्वार्थाने पवित्र वाटणारी तुळस शोधूनही सापडत नसावी. एकूणच देवपूजेमध्ये तुळशीचे असलेले महत्त्व आपल्या सगळ्यांना माहीत आहे. याशिवाय एकूण पर्यावरणाच्या रचनेमध्ये तुळस ही अधिक औषधी आणि गुणकारी मानली जाते. म्हणजेच फुलांपेक्षाही तुळशीची गुणवत्ता अधिक आहे. कदाचित यासाठीच विष्णूला किंवा भगवान श्रीकृष्णाला अन्य कुठल्याही फुलांपेक्षा तुलसीदल आवडत असावे. नेहमीप्रमाणे अशी महत्त्व असलेली वनस्पती आणि तशीच गुणवत्ता असलेली व्यक्ती दुर्मीळच असते. आणि म्हणूनच बाजार कितीही भरलेला असला तरी त्यामध्ये अशा दुर्मीळ वस्तू शोधण्यासाठी कष्टच घ्यावे लागतात.
एकीकडे नवरात्राचा जागर आणि दुसरीकडे मतांचा जोगवा हा सगळा संयोग सहजपणाने समोर आला म्हणजे फुलांच्या बाजारात तुळस दुर्मीळ ठरावी आणि आज सगळ्याच राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या भाऊगर्दीत गुणवान व्यक्ती दुर्मीळ ठरावी अशी आज परिस्थिती आहे. नवरात्र काय किंवा सत्तेसाठी चाललेला आटापिटा काय दोघांचाही संबंध शक्तीशी आहे. फक्त त्यामध्ये असलेला जमीन आसमानाचा फरक असा की, नवरात्रातील शक्ती ही दुर्जनांच्या निर्दालनासाठी आणि सज्जनांच्या रक्षणासाठी वापरली जाते. आणि निवडणुकीच्या बाजारात प्राप्त केली जाणारी सत्तेची शक्ती आजच्या काळाचा विचार केला तर दुर्जनांच्या रक्षणाकरता आणि सज्जनांचे खच्चीकरण करण्यासाठी मिळवली जाते. काहीशा लक्षात न येणा-या परंतु तितक्याच महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींची जर तुलना केली तर सामान्य माणसाच्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो. आणि म्हणूनच ती तुलना करीत असताना ज्या गोष्टी दुर्मीळ आहेत, ज्या गुणकारी किंवा गुणवत्ताप्राप्त आहेत त्याचीच मतदाराला अगदी सावधपणाने निवड करावी लागणार आहे.फुलांच्या बाजारामध्ये हरवून न जाता आठवणीने तुळस शोधण्याचा प्रयत्न जसा महत्त्वाचा ठरेल, तसाच आजच्या या राजकीय धुमधामीत आणि मतांच्या बाजारात गुणी व्यक्तीचा किंवा उमेदवाराचा शोध मतदारांना घ्यावा लागणार आहे.

नवरात्र आणि निवडणूक शक्तीचाच जागर
एकीकडे सणासुदीच्या मुहूर्तावर लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जिकडे तिकडे नवरंगांची उधळण सुरू आहे. प्रत्येक दिवशी नवा रंग आणि नवा उत्साह व्यक्त करण्याचा प्रयत्न होत आहे. विविध रंगांच्या फुलांचा संस्कारही सांगितला गेला.आज तर याच फुलांना इतकी प्रचंड मागणी आहे की, त्यांचे भाव दुप्पट होणे स्वाभाविक ठरतात.तोच प्रकार निवडणुकीच्या बाजाराबाबत होत आहे.कोणत्याही परिस्थितीत वाटेल ती किंमत देऊन मत मिळवण्याचा प्रयत्न होईल आणि प्रत्येक उमेदवार आपापला राजकीय रंग दाखवण्याचा प्रयत्न करेल. लोकांनाच मात्र योग्य त्या रंगाची आणि योग्य त्या व्यक्तीची निवड करावी लागेल. निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये महाराष्ट्रात नवरात्राच्या मुहूर्तावर तशा नवरंगीच लढती होत आहेत. आज जरी प्रमुख पाच राजकीय पक्ष रिंगणात असल्यामुळे ही लढत पंचरंगी वाटत असली तरी अन्य छोटे पक्ष जर त्यात जोडले तर ही लढत नवरंगीच ठरणार आहे. प्रत्येकजण आपण कसे वेगळ्या ढंगाचे आहोत हे सांगण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न करेल. प्रचाराच्या या भडिमारामध्ये गोंधळून न जाता महाराष्ट्रातल्या मराठी मतदाराने आपल्या मनाचा विचार केला तर त्याला योग्य तो उपायसुध्दा सापडू शकेल. त्यासाठी मात्र कष्टच घ्यावे लागणार आहेत. कोणत्याही गोष्टीची निवड करताना चाणाक्षपणा दाखवावा लागेल. प्रचाराच्या दणदणाटामध्ये आपल्या निवड करण्याच्या हक्कावर मतदारांनी कोणालाही कुरघोडी करू देता कामा नये. कारण त्यांना फुलांच्या बाजारात जशी तुळस निवडायची असते, त्याचप्रमाणे निवडणुकीच्या या बाजारात योग्य व्यक्ती आणि योग्य प्रवृत्ती निवडून द्यायची आहे. नुकतीच लोकसभा निवडणूक होऊन गेली असल्यामुळे आता महाराष्ट्रातल्या निवडणुकीकरता योग्य तो कौल देण्याची मतदारांची कसोटी सुरू झालेली आहे. राजकीय पक्षांनी एकजूट न दाखवता आपली बेफिकिरी दाखवून दिली; पण मतदारांना तसे करून चालणार नाही. प्रगल्भ लोकशाहीसाठी तितकाच जबाबदार मतदार आवश्यक आहे.

चौघांचे भांडण पाचव्याचा लाभ
महाराष्ट्रातल्या या प्रमुख पंचरंगी लढतीमध्ये कोण कसा बाजी मारतो हे १९ तारखेलाच समजेल.परंतु ज्याप्रमाणे दोघांचे भांडण तिस-याचा लाभ असे नेहमी म्हटले जाते. त्याप्रमाणे चौघांचे भांडण पाचव्याचा लाभ अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. फक्त आता हा पाचवा कोण. हेच मतदारांना ठरवायचे आहे. अन्यथा त्या समजूतदारपणाने जर मतदान झाले नाही. तर ज्यांचा कोणालाही लाभ होण्याची शक्यता नव्हती. अशांना अनाठायी संधी दिल्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. गेली पंधरा वर्षे ज्या सत्तेचा अनुभव घेतला, अशांना जर चुकूनही संधी दिली गेली तर ती चूक महाराष्ट्राला महागात पडू शकते. निवडणुकीच्या बाजारामध्ये योग्य व्यक्ती सापडलीच नाही, असे म्हणण्याची वेळ मतदारांवर येऊ नये. म्हणूनच या बाजाराच्या निमित्ताने मतदारांना स्वतःसाठी काही निकष ठरवावे लागतील. जितक्या सहजपणाने आपण आतापर्यंत मतदानाकडे पाहिले तशी आता वेळ राहिलेली नाही. योग्य व्यक्ती आणि योग्यता असलेला पक्ष ही महाराष्ट्राची गरज आहे. किंबहुना लोकशाहीची ती अनिवार्यता आहे. नवरात्रात शक्तीची उपासना करत असताना लोकशाहीच्या उपासनेसाठीसुध्दा तितक्याच सशक्त व्यक्तींची आणि पक्षाची गरज आहे, सहजपणाने केलेल्या या तुलनेमधून काही महत्त्वाच्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
साभार
दै.नवाकाळ
comments
Leave a reply

आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.

Your E-mail ID not be published. Required *. मराठी/इंग्रजी साठी [CTRL + G] बटन वापरा

anti spam
(Maximum characters: 500)
characters left.

Required fields are marked (*)