मराठीला नाकारणे हा तर राजद्रोहच म्हटला पाहिजे

20/09/2014 21 : 53
     798 Views

महाराष्ट्रातच मराठीचा दुस्वास व्हावा, शिक्षण खात्याने मराठी शाळांच्या परवानग्या नाकारून फक्त इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी पायघड्याअंथराव्यात. हा सगळा प्रकार कपाळकरंटेपणाचाच नमुना ठरतो. राज्य सरकारने ज्या संस्थांनी मराठी माध्यमांच्या शाळांसाठी अर्ज केले होते. त्यांना हे अर्ज बदलून तुम्ही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करा अशी सूचना केली. स्वतःच्या मातृभाषेला आणि महाराष्ट्राच्या राजभाषेला नाकारण्याचा राजद्रोहच एका अर्थी राज्य सरकारने केला आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. मराठी ही केवळ भाषा नाही. ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. आणि सगळ्याच विश्वाला उदात्ततेचा संदेश देणारी एक दिव्य संस्कृती आहे हे लक्षात घेतले पाहिजे. ज्ञानेशरांनी पसायदान मागताना सगळ्या विश्वाच्या कल्याणाची चिंता केली. आता विश्वात्मके देवे असे म्हणत असताना त्यांनी अमृताते पैजा जिंके असा मराठीचा गौरवाने उल्लेख केला.
आज त्याच अमृताहूनी गोड असणा-या मातृभाषेला राज्यकर्ते जर विषासमान वागणूक देणार असतील तर अशा शिक्षण खात्याला समुद्रात बुडवलेलेच बरे असे नाइलाजाने म्हणण्याची वेळ येते.आज भारतातल्या कोणत्याही प्रांतामध्ये तुम्ही गेलात तर त्या त्या भाषेचा अभिमानच पहायला मिळेल. महाराष्ट्राने मराठीपेक्षा इंग्रजीला एवढे डोक्यावर का घ्यावे हे कळत नाही. केवळ धंदेवाईकपणामुळेच हा प्रकार होतो आहे. मराठी माध्यमापेक्षा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये कमाई जास्त आहे. सरकारला अनुदान देण्याची वेळ येणार नाही आणि संस्थाचालकांचेही भले होईल अशा व्यावसायिक कारणामुळेच हा इंग्रजी पध्दतीचा व्यापारीकरणाचा निर्णय सरकारने केलेला दिसतो.आश्चर्याची गोष्ट म्हणजे राज्याच्या अनेक भागांत आजही मराठी माध्यमाच्या शाळा काढण्याची लोकांची तयारी आहे. आणि सरकार मात्र त्याला नकार देत आहे. मराठीपेक्षा इंग्रजी जास्त महत्त्वाची करियर, नोकरी,धंदा किंवा जगाच्या बाजारामध्ये मराठीपेक्षा इंग्रजीला मान आहे, अशी ठाम समजूत करून घेतल्यामुळे हा सगळा प्रकार घडताना दिसतो. परंतु इंग्रजी ही केवळ पोपटपंची करणारी भाषा आहे ती आपली मातृभाषा नसल्याने तिच्याविषयीचे प्रेम आपल्या मनामध्ये कधीही निर्माण होऊ शकत नाही. याउलट परिस्थिती मराठीची आहे. अगदी लहानपणापासून मराठीचा लळा लागलेला असतो. परंपरेने किंवा अनुवंशिकतेनेसुध्दा या भाषेविषयीची एक आत्मियता मनामध्ये असते. अशा आपल्या भाषेतून शिक्षण घेणे अधिक सोपे जाते. किंबहुना अन्य भाषा किंवा अन्य शिक्षण समजून घेण्याकरता मातृभाषेचा जास्त उपयोग होतो. जगातल्या अनेक प्रगत देशांमध्ये मातृभाषेतून शिक्षण देण्याचा नियम काटेकोरपणे पाळला जातो. चीन, फ्रान्स, जपान, जर्मनी, रशिया या देशांमध्ये सगळे शिक्षण त्यांच्या मातृभाषेमध्ये दिले जाते. आज इंग्रजीचे आंतरराष्ट्रीय महत्त्व जरी असले तरी स्वतःच्या भाषेवर ज्यांचे प्रभुत्व असते त्यांना अन्य भाषा शिकणे कठीण जात नाही.

ही केवळ भाषा नव्हे संस्कृती आणि अस्मिता

जगाचा विचार केला तरीसुध्दा हे लक्षात येईल की, इंग्रजीचे आपण जेवढे स्तोम माजवतो, तेवढे जगात इतर देशात नाही. जगभराची आकडेवारी अशी सांगते की, जवळपास ९७ कोटी लोक चिनी भाषा बोलतात आणि पन्नास कोटी लोक इंग्रजी भाषेचा वापर करतात. जगातल्या या क्रमवारीत तिस-या क्रमांकावर हिंदी भाषेचा नंबर लागतो.यावरून इंग्रजीचा प्रभाव हा आपणच निर्माण केलेला आहे. इंग्रजी आली पाहिजे यात काही शंका नाही. इंग्रजांनी आपल्या राजवटीत आपला पाया भक्कम करण्यासाठी इंग्रजीचा प्रभाव वाढवला.लॉर्ड मेकॉलेने तसे भाषणच ब्रिटिश पार्लमेंटमध्ये २ फेब्रुवारी १८३५ ला केले होते. त्यावेळी त्याने म्हटले होते की, भारताची अध्यात्मिकता आणि इथली प्राचीन शिक्षणपध्दती तसेच सांस्कृतिक परंपरा मुळापासून बदलल्याशिवाय आपले राज्य भक्कम होऊ शकणार नाही. भारतीय लोक जेव्हा आपली सांस्कृतिक परंपरा विसरतील तेव्हाच आपल्याला हिंदुस्थान आपल्या अधिपत्याखाली आणता येईल. आज आपण ज्ञानेशरांनी सांगितलेला अमृताते पैजा जिंके हा मराठीचा महामंत्र विसरलेलो आहोत, पण मेकॉलेचा मंत्र घोकून आपली गुलामीृत्ती जोपासत आहोत. मेकॉले गेला इंग्रज गेले. गोरासाहेब गेला पण त्यांनी भारतात काळे इंग्रज निर्माण करण्याची कायमची व्यवस्था केली. आपले आणि आपल्या देशातले संस्कृतीचे हित कशात आहे हेच जर समजत नसेल तर मग त्या शिक्षणाचा त्या सुशिक्षितपणाचा काहीच उपयोग नाही असे म्हणावे लागेल. भारतातल्या अनेक नामवंतांनी मातृभाषेतून शिक्षणं घेतली आणि आपले कर्तृत्व सिध्द करून दाखवले. प्रसिध्द शास्त्रज्ञ जगदिशचंद्र बोस यांचे वडील बंगालमध्ये डेप्युटी मॅजिस्ट्रेट होते. परंतु त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे जगदीशचंद्र बोस यांना बंगाली माध्यमाच्या शाळेत टाकले होते. त्यावेळी त्यांनी असे उद्गार काढले होते की, इंग्रजीमुळे मुलांमध्ये खोटा गर्व निर्माण होतो. अन्य लोकांमध्ये मिळूनमिसळून वागण्याची सवय राहात नाही. हे त्यांचे निरीक्षण अतिशय मोलाचे म्हणावे लागेल. मातृभाषेतून शिक्षण घेतलेले जगदीशचंद्र बोस हे जगद्विख्यात शास्त्रज्ञ झाले.

मराठी संवर्धनाला प्रोत्साहन द्या
महाराष्ट्रातसुध्दा कितीतरी शिक्षण तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ आहेत की, ज्यांनी मराठी माध्यमातून आपले शिक्षण पूर्ण केले. आणि इंग्रजांनाच सळो की पळो करून सोडले. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर ही त्याची ठळक उदाहरणे आहेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मातृभाषेतून शिक्षण घेतले आणि कितीतरी मोठा तत्त्वविचार मांडला. डॉ.जयंत नारळीकरांसारखा शास्त्रज्ञ नेहमीच मातृभाषेतून शिक्षण देण्याची आवश्यकता सांगतात . अशी शेकडो उदाहरणे डोळ्यासमोर असताना आपल्याच राजभाषेला ठोकरून लावण्याचे महापातक राज्याचे शिक्षण खाते करीत आहे.ते धोरण राबवणारे राज्यकर्ते महाराष्ट्रासाठी कलंकच म्हणायला हवेत.
सरकारने ताबडतोब हा उफराटा प्रकार थांबवावा.देशातच काय पण जगात महाराष्ट्राचा सन्मान वाढवायचा असेल तर या मराठी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करावे. मराठी माध्यमाच्या शाळांना तातडीने परवानग्या द्याव्यात. एवढेच नव्हे तर जो जो मराठीच्या प्रचारासाठी संवर्धनासाठी कार्य करेल त्यांना प्रोत्साहन द्यावे. केवळ मराठी भाषा भवन किंवा कोशनिर्मिती मंडळे काढून चालणार नाहीत.गावागावात मराठीचे गुणगान करणा-या शाळा हीच महाराष्ट्राची ताकद झाली पाहिजे.
साभार
दै.नवाकाळ
comments