श्रीगणेशा राजकारण्यांना सदबुद्धी दे !

28/08/2014 2 : 34
     440 Views


आज श्रीगणेशाचे आगमन होत आहे.अतिशय मंलमय वातावरण सर्वत्र आहे.उशिराका होईना वरूणराजाने आपली कृपा दृष्टी बळीराजाकडे दाखवल्यामुळे जे दुबारा पेरणीचे संकट ओढवलेला बळीराजा मनातल्या मनात तात्पुरता सुखावला आहे.परंतु राजकारण्यांनसाठी हा उत्सव एक प्रकारची राजकिय पर्वनीच ठरतो.त्यात आता सर्वत्र विधानसभेच्या निवडणूकाचे वेध लागले आहेत.त्यात गणेशउत्सव म्हणजे राजकारण्यांना आयतेच व्यासपीठ मिळते.त्यात ते आपली राजकिय पोळी भाजून घेण्याचा आटोकाट पर्यत करणारच हे त्रिवार सत्य आहे.
एकिकडे भारतवर्षात सामान्य माणूस महागाईने हतबल झाला आहे. महागाईने सर्वसामान्याचे कंबरडेच मोडले आहे. पेट्रोलदरवाढ,डिझेलदरवाढ,गॅसदरवाढ,साखरदरवाढ प्रत्येक जिवनावश्यक वस्तूच्या किंमतीमध्ये वाढ झालेली आहे. सामान्य जनतेला महागाईमुळे सन्मानाने आणि सुखाने जीवन जगता येणार नाही अशी कुटील निती वापरून सत्ताधारी राजकर्ते आपले कूकर्म करत आहे. सत्तेत मदमस्त झालेले राजकारणी राजकीय कुरूक्षेत्रावर जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचे सोडून सत्तेच्या सारीपाटात दंग आहेत. अशा वेळी हे गणेशा या सर्वां सत्तेत मदमसत झालेल्या राजकारण्यांना सदबुद्धी दयावी अशी प्रार्थना गणराचे भक्त असलेली सामान्य जनता करीत आहे.
बळीराजा असख्य आडचणीचा सामना करत असतांना गारपीटीने शेतक-यांचे कबंरडे मोडले त्यात भर म्हणून महावितरण कंपनीने हातावर पोट घेवून जगणा-याला अवाच्या सवा विजबील आकारून तोंडचे पाणी पळवले आहे. तर दुस-या बाजूला उद्योगधंद्याना प्रोत्साहन देण्याऐवजी भारनियमन करून विजेवर चालणारे उद्योगधंदे बंद पाडून उद्योजकांना व सुशिक्षितांना बेरोजगार करण्याचा जुनाच उद्योग नविन पध्दतीने सुरू केला आहे की, काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्वार्थी पुढारी व प्रशासनातील एसीमध्ये बसून कागदी घोडे नाचवणा-या क्लास वन अधिका-यांना सामन्याचे काहीच देणे घेणे नाही .भ्रष्टाचाराने तर कळसच केला आहे,रस्ते,सिचंन ,अन्नपुरवठा, आदर्श घोटाळा, शेतक-यांच्या आत्महत्या, अंधश्रद्धा निर्मुलन समीतीचे डॉ.दाभोळकरांची हत्या, खून, दरोडे, महिलांवर होत असलेले दिवसाढवळ्या बलात्कार,छावण्यामध्ये शेण खाणारे आणि खाणीमध्ये तोंड काळे करणारे राज्यकर्ते मात्र सुशिक्षीत बेरोजगारीचा गैरफायदा घेत या तरूणांना वाममार्गाला लावण्याचे घोरपाप करत आहेत. आणि त्यांची पिलावळ अध्र्या हळकुंडाने पिवळे होवून आयत्या पीठावर रेघोटया मारत आपले उखळ पांढरे करत आहे. अशानाही गणेशा सर्वसामान्याचा विचार करण्याची सदबुद्धी दे.
गणेश उत्सव हा सामाजिक कार्यकर्ते व नेतृत्व घडणारे प्रशिक्षण केंद्रच आहेत असे निश्चितपणे म्हणता येईल. मात्र एकिकडे पर्यावरणाचा समतोल ढासळत असताना मानवी मनाच्या विचार शक्तीचा ही समतोल पूर्णता कोलमडून गेला आहे की काय? हे गणराया समतोल बिघडवणा-या स्त्रीभ्रुणहत्या ,जातीय दंगली घडवणा-या,व्यक्तीस्वातंत््रय हीरावून घेणा-या विध्वंसक प्रवृत्तींना ही सदबुद्धी दे.
तसे पाहीलेतर गणेशउत्सव हा फक्त धार्मिक सण नाही,तो एक लोकोत्सव आहे. या निमित्ताने जनजागृती करण्याचे व ज्ञानप्रवाह प्रवाहित ठेवण्याचे कार्य महाराष्ट्रीयन समाजाने केले आहे. पण अलिकडच्या काळात गणेश उत्सवाचे स्वरूप बदलत चालेले आहे. काळानुसार बदल होतच असतात पण टिळकांनी सुरू केलेला गणेश उत्सव देशहिताचे कार्य करणारा होता,परंतु आजच्या गणेश उत्सवाला कारर्पोट इव्हेंटचे स्वरूप येत आहे. काळ बदलला , माणसे बदलली , विचारधारा बदलली तरी जो उत्सव मांगल्यासाठी सुरू केला आहे तो मंगलमयच व्हावा, हीच सर्वसामान्य गणेशभक्ताची अपेक्षा आहे.
सुखा मागून दुःख व दुःखामागून पून्हा सुख येईल,हे चक्र सुरूच राहील दुष्काळानतंर पाउस येईल,भ्रष्टाचाराचा भस्मासूर नष्ट होऊन शिष्टाचार येईल आणि महागाईच्या भडक्यानंतर कधीतरी पुन्हा सुखाची भाकर मिळावी व बळीचे राज्य यावे अशीच मागणी गणेशभक्त श्रीगणेशा तुझ्या चरणी करत आहेत.

गणपती बाप्पा .............मोरया !

संपादक
प्रा.गणेश पोकळे
comments