स्वयंभू नेतृत्वाची अखेर

04/06/2014 9 : 54
     300 Views

अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर कुठेतरी एक रम्य पहाट उगवावी. पण अचानक आकाशात ढग जमा व्हावेत आणि त्या रम्य पहाटेची सुखस्वप्ने अचानक आलेल्या वावधानात जमीनदोस्त व्हावीत,असा प्रकार गोपीनाथ मुंडे यांच्याबाबतीत झाला असे म्हणावे लागेल. केवळ चाळीस वर्षांच्या अल्पावधीत महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर स्वतःचे एक अढळ स्थान निर्माण करून दाखवण्याची किमया त्यांनी करून दाखवली. जनसंघापासून ते आजच्या भाजपापर्यंत या पक्षाला कधीही महाराष्ट्रात लोकनेता लाभला नव्हता, तो गोपीनाथ मुंडेंच्या रूपाने महाराष्ट्राला मिळाला. म्हणून प्रमोद महाजन यांनादेखील त्यांचा खूप अभिमान वाटत असे. भारतीय जनता पार्टीतले अनेक लोक चळवळीतून आले. परंतु लोकनेता होण्याचे भाग्य फक्त गोपीनाथ मुंडे यांना मिळाले.
भाजपा सेना युतीच्या काळात उपमुख्यमंत्रीपद भूषवून त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाचा एक ठसा निर्माण केला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे ही त्यांची इच्छा होती. २००५ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला. त्याचवेळी प्रमोद महाजन यांनी २०१४ साली गोपीनाथ मुंडे महाराष्ट्रात मुख्यमंत्री होतील अशा प्रकारचा एक दुर्दम्य आशावाद प्रकट केला होता. मुंडे यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या प्रवासाला आता कुठे सुरुवात झाली होती.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बहुमताने भाजपा सरकार सत्तेवर आले. कारण महाराष्ट्रातही आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा-सेना युती पूर्ण बहुमत मिळवून सत्तेवर येण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला होता. परंतु नियतीला हे मान्य दिसत नाही. दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून दहा दिवसांपूर्वी त्यांचा शपथविधी आता ख-या अर्थाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सोनेरी झालर प्राप्त व्हायला लागली होती. परंतु त्यापूर्वीच काळाने आपला कृतघ्न डाव साधला आणि महाराष्ट्राचा तडफदार महत्वाकांक्षी तळागाळातल्या समाजाला बरोबर घेऊन जाणारा लोकनेता हिरावून नेला. महाराष्ट्राचीच नव्हे तर एकूणच राजकीय क्षेत्रासाठी सर्वात मोठी हानी ठरते. नेतृत्व करताना ते समाजासाठी असले पाहिजे. समाजाचा त्या नेतृत्वाला मनापासून पाठिंबा असला पाहिजे. अशा एका मजबूत व्याख्येमध्ये मुंडे यांचे नेतृत्व अतिशय योग्य ठरते अन्यथा अल्पावधीत त्यांना महाराष्ट्राची एवढी लोकप्रियता प्राप्त झाली नसती.
लोकांना बरोबर घेऊन जाणारा नेता म्हणूनच त्यांची प्रतिमा कायम डोळ्यासमोर राहणार आहे. महाराष्ट्रावर सातत्याने आघात महाराष्ट्राला राजकीय क्षितिजाला एकापाठोपाठ एक धक्के सहन करावे लागत आहेत. गोपीनाथ मुंडेंच्या या अचानक निघून जाण्यामुळे महाराष्ट्राने ते किती सहन करायचे असा प्रश्न सहज मनामध्ये येतो. प्रमोद महाजन, बाळासाहेब ठाकरे आणि विलासराव देशमुख या चौघांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर जो आघात झाला तो भरून निघणे कठीण आहे. या चौघांनी स्वतःच्या कर्तृत्वाने राष्ट्रीय पातळीवर स्वतःचे स्थान निर्माण केले होते. गोपीनाथ मुंडे यांनी तर ख-या अर्थाने कार्यकर्ता ते लोकनेता असा खडतर परंतु यशस्वी प्रवास करून दाखवला. विद्यार्थी परिषदेच्या कामातून त्यांनी त्यांच्यातील कार्यकत्र्याला वाव दिला. अनेक चळवळींमधला त्यांचा सहभाग त्यांच्या नेतृत्वगुणांचे संवर्धन करणारा ठरला. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर अणीबाणीतला त्यांचा संघर्ष विशेषत्वाने गाजला. पक्षाने सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. १९८० च्या दशकामध्ये त्यांच्यासारखा तरुण, तडफदार, धडपड्या युवा कार्यकर्ता मिळाल्यामुळे या पक्षाच्या आशाही पल्लवित झाल्या. तेव्हाचे पक्षाचे संघटन मंत्री वसंतराव भागवत यांनी गोपीनाथ मुंडेंकडे मोठी जबाबदारी देण्याचा नेहमीच आग्रह धरला. मुंडेंनीदेखील महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाशी दोन हात करायचे असतील तर पक्षाचा चेहरामोहरा बदलावा लागेल, असा आग्रह धरला.
शहरी आणि व्यापारी वर्गाचा पक्ष म्हणून भाजपाची प्रतिमा निर्माण झाली होती. गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या सरचिटणीसपदाच्या काळापासून त्याचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न केला. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर भाजपाला राज्याच्या खेड्यापाड्यात पोहचवण्याचे आणि सर्व समाजाचे नेतृत्व करणारा पक्ष म्हणून त्याची प्रतिमा निर्माण केली. आज भाजपाची ग्रामीण भागात पाळेमुळे दिसतात त्याचे बरेचसे श्रेय गोपीनाथ मुंडे यांच्याकडे जाते. काँग्रेसपेक्षाही आपण चांगल्या पध्दतीने बेरजेचे राजकारण करू शकतो. आणि समाजातल्या सगळ्या वर्गाला भाजपा आपलासा वाटेल अशीदेखील परिस्थिती निर्माण करू शकतो हे मुंडे यांनी सिध्द करून दाखवले. म्हणूनच शेतकरी कामगार पक्ष असो, रिपब्लिकन पक्ष असो किंवा अगदी अलीकडची स्वाभिमानी शेतकरी संघटना असो या सगळ्यांना बरोबर घेण्याचे काम मुंडे यांनी करून दाखवले. त्यांच्या निघून जाण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ख-या अर्थाने लोकनेता कोण? असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
अशा जाणत्याराजाला बीड लाईव्हची भावपुर्ण श्रद्धांजली...
comments