शेतक-यांना मदतीचा हात द्या!

13/03/2014 6 : 36
     510 Views

गेल्या दहा- बारा दिवसांपासून बीड जिल्ह्यात सातत्याने होत असलेली प्रचंड गारपीट आणि अवकाळी पावसामुळे ९२४ गावे अस्मानी संकटात सापडली आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तब्बल ७४ हजार२५० हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिके व ३०६० हेक्टर फळबागा भुईसपाट झाल्या आहेत.अस्मानी संकटाने जिल्ह्यातील शेतक-यांची हातातोंडाशी आलेली रब्बी पिके व फळबागा पूर्णपणे संपुष्टात आल्या आहेत. गारपिटीने थैमान घातल्याने शेतकरी अक्षरश: भयभीत झाले आहे. आठवड्यात झालेल्या निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतक-यांच्या पिकांची कोट्यवधींची नासाडी झाल्याने सर्वत्र हाहाकार उडाला आहे. निसर्गाच्या तांडवात शेतक-यांच्या स्वप्नांचा पार चक्काचूर झाला आहे. या अस्मानी संकटाने शेतक-यांचे सर्वस्व हिरावून घेतले गेले आहे. जिल्ह्यात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. सलग दोन वर्षे दुष्काळाला सामोरे गेल्यानंतर आता गारपीट व अवकाळी पावसाने थैमान घातल्याने बीड जिल्ह्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. गारपिटीच्या न भूतो न भविष्यती अशा तडाख्याने हजारो शेतकरी पूर्णत: खचून गेले आहेत. या गारपीटग्रस्त, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतक-यांना तातडीने नुकसानभरपाई देऊन केंद्र व राज्य सरकारने खचून गेलेल्या बळीराजाला मदतीचा हात पुढे केला पाहिजे. या अस्मानी संकटात कंबरडे मोडलेल्या शेतक-यांना सावरण्यासाठी मायबाप सरकारने त्वरित दिलासा देणे आवश्यक आहे. असा आर्त टाहो ग्रामीण भागातून सर्वत्र फोडला जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सत्तारूढ आणि विरोधी पक्षांनी परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा महाराष्ट्रातील आपद्ग्रस्त शेतक-यांना मदत केली पाहिजे, असे सुचवावेसे वाटते.
सुनामीप्रमाणेच महाराष्ट्रातील शेतक-यांवर अवकाळी पाऊस व गारपिटीचे संकट कोसळल्याने लाखो हेक्टर क्षेत्रातील शेतक-यांची रब्बी पिके व फळबागा भुईसपाट झाल्या आहेत. या संकटाने शेतक-यांचे सर्वस्व हिरावून घेतले आहे. निसर्गाच्या प्रकोपात बळीराजा पार कोलमडून गेला आहे. शेती आणि शेती अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतक-यांचे हे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने विशेष पॅकेज जाहीर करून त्वरीत मदत दिली पाहिजे, अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे. गेल्या ५०-६० वर्षात आम्ही असे अस्मानी संकट पाहिले नाही, अशी प्रतिक्रिया ग्रामीण भागात वडीलधारी मंडळी व्यक्त करीत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अडकण्यापेक्षा केंद्र राज्यातील सत्तारूढ नेत्यांनी आपली सारी ताकद पणाला लावून शेतक-यांना मदत मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची खरी गरज आहे.
आपला देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. शेतकरी हा देशाचा कणा आहे असे म्हटले जाते. बळीराजाचे जीवन उद्ध्वस्त झाले असताना त्यांना आधार देण्याची सर्वस्वी जबाबदारी केंद्रातील यूपीए सरकार आणि महाराष्ट्रातील काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सरकारने पार पाडली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. केंद्रीय कृषिमंत्री,राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपमुख्यमंत्री आजित पवार या तिन्ही नेत्यांनी केंद्र सरकारला साकडे घालून शेतक-यांसाठी मोठे पॅकेज मिळवून दिले पाहिजे, अशीही मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे. अस्मानी संकटात देशातील यूपीए सरकार आणि महाराष्ट्रातील आघाडी सरकारने बघ्याची भूमिका न घेता संवेदनशीलता दाखवून ठोस निर्णय घेतला पाहिजे. लोकसभेतील विरोधी पक्ष उपनेते तथा भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी शेतक-यांवर अस्मानी संकट कोसळले असताना सुलतानी कोसळू नये, अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली आहे. राज्य सरकारकडून शेतीच्या नुकसानीच्या पंचनाम्याची प्रक्रिया अत्यंत धिम्यागतीने चालू असून, मदत मिळाली नाही तर शेतकरी रस्त्यावर येईल. त्यामुळे तीन दिवसात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करा व पाच दिवसांत मदतीचे वाटप करा, अशी जोरदार मागणी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे. महाराष्ट्रातील गारपीटग्रस्त भागासाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी राज्यपालांकडे करणार असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.
मराठवाडा, विदर्भ, खान्देश व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना गारपीट व अवकाळी पावसाने झोडपल्याने पिकांची मोठी हानी झाली आहे. या अस्मानी संकटाने शेतकरी भयभीत झाला आहे. मदत वेळेवर मिळाली नाही तर शेतकरी रस्त्यावर येईल. नैसर्गिक आपत्तीमध्ये विलंब होता कामा नये. महाराष्ट्रातील आपद्ग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीकडे आशेने पाहात आहे. राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व ४० मंत्री कोठे आहेत, असा सावल करत जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, त्वरित निर्णय घ्या, अशी जोरदार मागणी गोपीनाथ मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर केली आहे.
बीड जिल्ह्यातील गारपिटीने दोन दिवसात पाचजण मृत्युमुखी पडले असून, मृतांचा आकडा सातवर गेला आहे. गेल्या 22 फेब्रुवारीपासून आतापर्यंत बीड जिल्ह्यात पाच-सहा वेळा प्रचंड गारपीट आणि अवकाळी पावसाने झोडपले आहे. भर उन्हाळ्यात जूनमध्ये पडतो तसा अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतक-यांचे कंबरडेच मोडले आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली. अनेक जनावरे दगावली. गारपिटीमुळे शेकडो पक्षी मृत्युमुखी पडल्याचे आढळून आले आहे. पीकविम्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा यापूर्वी समावेश नव्हता. त्यामुळे यंदा झालेल्या पीक नुकसानीला पीकविमा लागू होणार नाही. आता अचानक ओढवलेल्या नैसर्गिक संकटामुळे अवकाळी पाऊस व गारपीट पीकविम्याच्या निकषात घ्यावी. यासाठी विमा कंपन्यांच्या प्रतिनिधीसोबत बैठक झाली आहे. त्यांनी निकष बदलण्यास अनुकुलता दर्शविली आहे. केवह पीकविम्याचा हप्ता वाढवून मागितला असून त्याला केंद्र आणि राज्य सरकारही तयार झाले आहे. यापुढे पीकविम्याच्या निकषात या दोन्ही गोष्टी समाविष्ट होणार असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितल्याने शेतक-यांना मदत मिळण्याचा मार्ग सुकर होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.
सध्या महाराष्ट्र सरकारवर २ लाख ९३ हजार कोटींचे कर्ज असले तरी अजून हजार-दोन हजार कोटी कर्ज काढा. मात्र राज्यातील संकटग्रस्त शेतक-यांना तातडीने मदत करा, अशी आग्रही मागण विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकांपेक्षा शेतक-यांना वाचविणा-याला प्राथमिकता दिली पाहिजे, असेही खडसे यांनी सूचित केले आहे. राज्यातील १७-१८ जिल्ह्यांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातल्याने शेतक-यांच्या रब्बी पिके व फळबागांची अपरिचित हानी झाली आहे. या अस्मानी संकटात शेतक-यांनी मदतीसाठी किती वाट पाहायची, असा सवाल खडसे यांनी राज्य सरकारला विचारला आहे. बीड जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी सायंकाळी वादळी वा-यासह गारपीट व पावसाने झोडपल्याने परळी,बीड व गेवराई,आंबाजोगाई तालुक्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. गारपीट पाठ सोडत नसल्याने शेतकरी भयभीत झाले आहे. शेतातील पिके जमीनदोस्त झाली. आता संसाराचा गाडा कसा चालवायचा या चिंतेने शेतकरी अत्यंत हताश आणि हतबल झाला आहे. शेतक-यांना अन्नदाता म्हणून संबोधले जाते. या अन्नदात्या बळीराजाला केंद्र राज्य सरकारने मदतीचा हात देणे आवश्यक झाले आहे. महाराष्ट्रातील शेतकरी अत्यंत कष्टी आणि परिश्रमवाही आहे. राज्यात हरितक्रांती झाल्याने धान्य उत्पादन वाढले आहे. दुग्धोत्पादनातही क्रांती झाली आहे. महाराष्ट्रात फळबागा लागवड करून शेतक-यांनी क्रांती केली आहे. कापूस, साखर, दूध, अन्नधान्य उत्पादनात शेतक-यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. म्हणून देश स्वयंपूर्ण झाला आहे. फळांचे विक्रमी उत्पादन काढून निर्यात करण्यातही महाराष्ट्रातील शेतकरी मागे नाही. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्याने गेल्या दहा वर्षांत मोठी प्रगती झाली आहे. या आधुनिकेतची कास धरणा-या शेतक-यांवर आता अस्मानी संकट कोसळल्यामुळे तो अक्षरश: हवालदिल झाला आहे. बीड जिल्ह्यात जायकवाडी धरणामुळे हरित-धवलक्रांती झाली आहे. बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने ज्वारी, हरभरा, गहू, कांदा, मका, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा ९१४ गावांना बसला आहे. या अस्मानी संकटामुळे ७४ हजार२५० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. अद्याप नुकसान पीडित शेतक-यांच्या शेतीचे पंचनामे सुरूच आहेत. या अस्मानी संकटाने पार पिचून खचून गेलेल्या बळीराजाला नव्याने उभे राहण्यासाठी तातडीने मदत हवी आहे. तो अशाळभूत नजरेने वाट पाहात आहे. केंद्र राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतक-यांना तातडीने मदत देऊन दिलासा दिला पाहिजे, हीच अपेक्षा सर्वदूर व्यक्त केली जात आहे.
निसर्गाने झोडपले आता सरकार काय करते, हे पाहू या! दरम्यान सध्या सुरू असलेल्या गारपिटीपासून राज्याची शनिवार,रविवारनंतर सुटका होण्याची शक्यता आहे. सध्याची हवामानाची स्थिती येत्या दोन- तीन दिवसात बदलणार आहे. त्यानंतर गारपीट थांबेल आणि तापमानात वाढ होण्यास सुरूवात होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. अवकाळी पाऊस गारपीट थांबली नाही तर शेती अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. वरूणराजा आता थांब रे, म्हणण्याची पाळी शेतक-यांवर आली आहे. निसर्ग कोपल्यानेच शेतक-यांचे होत्याचे नव्हते झाले आहे. विज्ञानाने आपण कितीही प्रगती केली असली तरी निसर्गापुढे नतमस्तक होण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही.
comments