​स्त्रीमुक्ती: कधी ,कुठे ,कशी?

08/03/2014 20 : 28
     1004 Views

जहाल व सौम्य स्त्रीवाद आणि स्त्रीमुक्‍ती’ , हे सर्व अर्थशून्य शब्दांचे बुडबुडे आहेत. ही सगळी साम्यवादी भाषा आहे. हा स्त्रीवादी प्रकार, म्हणजे स्त्री-जीवन उद्ध्वस्त करणारे सगळे राजकारणच आहे. इथे कुठेही स्त्रीचा गौरव किंवा सन्मान होत नाही. साम्यवादी व सामाजिक बांधिलकी असणार्‍यांनी आपली संघटना आणि चळवळ यांना सोयीचे करून इतिहास व साहित्य यांचे बीभत्स विकृतीकरण केले आहे. या विकृतीकरणालाच यइतिहासाचे पुनर्वाचन’ असे मोठे गोड नाव दिले आहे.हे विचार आहेत एका सनातनी दैनिकातील लेखात आलेले.आजही मनुवादी स्त्रीमुक्तीचा कडाडून विरोध कसे करत असतात याचे विवेस्च्न याच स्तंभात आम्ही काही दिवसांपूर्वी केले होते. आठ मार्च रोजी महिला दिन जागतिक स्तरावर साजरा होत असताना अशा विचारांना विरोध करूनच पुढे जावे लागणार आहे.अपर्णा रामतीर्थकर नावाच्या एक महिला वक्त्या आहेत.त्या नेहमी असेच विचार सांगत असतात.नांदेड जिल्हापरिषदेच्या गणेशोत्सवात त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते व झाडून सारे पुरोगामी अधिकारी कर्मचारी त्यांच्या स्त्रियांवरील हल्ल्याचे टाळ्या वाजवून स्वागत करीत होते.

हिंदू कोणास म्हणावे ? या पुस्तकाचे लेखक लेखक श्रीपाद दत्तात्रय कुलकर्णी याचे पुढील विचार बघा

यस्त्री ही कुटुंब-व्यवस्थेचा कणा आहे. वेदकालात प्रथम पूजेचा मान यसरस्वती (नदी), भारती (भरतकुलाची अधिष्ठात्री देवता) व इला (पहिला सम्राट मनू याची कन्या)’ या तिघींना होता. तो गणनायक गणपतीला नव्हता. सध्याच्या काळात जी यस्त्री-मुक्‍तीची’ चळवळ होत आहे, तिचे ध्येय कुटुंब-व्यवस्था तोडण्याचे आहे, जोडण्याचे नाही.यतिच्यावर होणारे अत्याचार थांबले पाहिजेत, ती शक्‍ती आहे, याची जाणीव तिला करून दिली पाहिजे’ , हे खरे; पण स्त्री-मुक्‍तीच्या नावाखाली कुटुंब-व्यवस्था मोडणे, ही चळवळ होता कामा नये. कुटुंब-संस्था मोडली की, गृहसौख्य संपले.’

आमच्या मते स्त्री मुक्ती म्हणजे नेमके काय ? हे आपण जाणुन घेतले पाहीजे. स्त्री मुक्ती म्हणजे निव्वळ पुरुषांच्या विरोधात जाणे नव्हे तर यपुरुषप्रधान’ संस्कृतीचा पगडा असलेल्या विशिष्ट पद्धतीचा विरोध करणारी चळवळ. पूर्वीची जाचक बंधने आज स्त्रियांवर नाहीत. पण याचा अर्थ स्त्री सर्वार्थाने मुक्त झाली असा होत नाही. स्त्री-मुक्ती चळवळी ठिकठिकाणी कार्यरत आहेत. हे विचार, ह्या चळवळी शहरापुरत्याच मर्यादित आहेत.

दलित,आदिवासी,शोषित, पीडीत स्त्रियांना त्याही खेड्यात राहणाऱ्या स्त्रियांना या चळवळीची सुतराम कल्पना नाही.आर्थिक, बौद्धिक,शैक्षणिक, सामाजिक, राजकीय या सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रीने शिरकाव केलेला आहे. पुरुषांनी स्त्रियांना मुक्त केले,मोकळीक दिली, स्वातंत्र्य दिले. त्यातून त्यांची मानसिकता किमान बदलली आहे. स्त्रियांना मुक्ती हवी म्हणजे काय हवे?कोणापासून मुक्ती हवी? स्त्रियांच्या कार्यक्षेत्राबाबतचा अन्याय आता थोडा कमी झालेला दिसतो. आता असे कोणते क्षेत्र आहे की, तेथे महिला नाहीत? न्यायिक विभाग, महसूल खात्यात जिल्हाधिकारी म्हणून काम करणाऱ्या महिला आहेत. पोलिस खात्यात सर्वोच्चपदी महिला आहेत. रिक्षाचालक, टॅक्‍सी ड्रायव्हर, रेल्वे इंजिन ड्रायव्हर,विमानचालक, बस कंडक्‍टर, तसेच विविध क्षेत्रांत अधिकारीपदी, सर्वोच्चपदी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या व्यवसायात महिला अग्रेसर आहेत. एवढेच नाही तर राष्ट्रपती, पंतप्रधान, या पदावर देखील महिला आरूढ झाल्या आहेत. पण आजचे त्या दुहेरे भूमिकेत वावरत असतातअशा वेळी त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्याचं काम रूढी,परंपरा करत असतात. महिलांना मुक्ती हवी ती बुरसटलेल्या रूढी परंपरांपासून वखवखलेल्या नजरांपासून, सासू, सून,नणंद, भावजया, त्यांच्या आया इत्यादी छळवादी महिलांकडून. स्त्री ही पुरुषाइतकीच स्वतंत्र आहे.निर्भय सारख्या अत्याचाराच्या घटना कायदे केल्याने बंद होणार नाहीत तर स्त्रीमुक्तीचे विचार समाजात रुजल्यानेच स्त्रिया खऱ्या अर्थाने निर्भय होतील.

आजही आई मुलीला सांगते, बाई गं, तुझे हे काम आहे, आता हुंदडणे बंद कर. जरा स्वयंपाक -पाण्यात लक्ष घाल. घरकामाचं बघ. मुलाला मात्र यातील काहीच आई सांगत नाही तिचे बंधन फक्त मुलीला; मुलाला नाही. म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती कोण चालवते ? महिलाच या संस्कृतीच्या अमर्थ्क बनविल्या जात आहेत.गुलामाला त्याच्या हातातील बेड्या हे अनमोल अलंकार आहेत ही गोष्ट सनातनी विचारवंत आजही समजून सांगत असतात त्याला विरोध करणे ही काळाची गरज आहे. मुलीला गौण आणि दुय्यम स्थान स्त्रीच बहाल करत असते. संस्कार करायचे,शिस्त लावायची तर मुलगा मुलगी दोघांनाही सारखीच लागली पाहिजे. कामाची वाटणी समान झाली पाहिजे. हे चक्र कुटुंबापासून पुढे जाईल.अनेक कुटुंबे मिळून समाज तयार होतो. म्हणजे कुटुंबापासून सुरुवात केल्यास त्याचा परिणाम समाजावर होतो. स्त्री-पुरुष आचार-विचार,संस्कारात समानता आणणारी स्त्रीमुक्ती आजही हवी आहे.

स्त्रियांच्या मनावर, बुद्धीवर, रूढी परंपरेचे, पुरुषप्रधान संस्कृतीचे थरच्या थर साठलेले आहेत. ते अगोदर गळून पडायला हवेत . स्त्री-मुक्ती चळवळींनी काही गोष्टींचा नको तेवढा विपर्यास केला,अतिरेक केला. उदा. कुंकू, बांगड्या,साड्या किंवा अन्य पारंपरिक वेशभूषा, केशभूषा झिडकारणे आणि शर्ट पँट घालून बॉयकट करून पुरुषी वागणे म्हणजे स्त्री-मुक्ती, अशी वरकरणी उथळ स्रीमुक्ती कोणाचेच भले करणार नाही याबरोबर विचारांचे बळी हवेच मुलगी म्हणून जन्माला येणं हे काही स्त्रिच्या हाती नाही. पण पुढे वंश चालू राहायचा तर मुलगी म्हणजे स्त्री हवीच. आईलाच आपल्या स्त्रीत्वाचा विसर पडावा अन्‌पोटी मुलगी जन्माला येऊ नये याचा खटाटोप तिनं करावा, यापेक्षा स्त्रीजातीचा मोठा अपमान कोणता असेल? स्त्रीचा उभा जन्म अनेक बंधनात अडकलेला असतो. आता खरी गरज आहे, स्त्रियांनी आत्मपरीक्षण करण्याची, त्यांच्यात भरपुर ताकद आहे, ही पुरुषप्रधान संस्कृती संपविण्याची, पण त्याकरिता स्त्रियांनी आपली मानसिकता बदलायला हवी, आणि स्त्री मुक्तिची चळवळ योग्य दिशेने न्यावयास हवी.आजही महिलांना बुरख्यात ठेऊन घरात शौचालय न बंधाणारे त्यांच्या अब्रुचे धिंडवडे गावागावात काढत आहेत. यस्त्री मुक्ती म्हणजे पुरुषप्रधान संस्कृतीपासून मुक्तता !’ पुरुष वर्चस्ववादी समाजाची गुलामगिरी झिडकारणे असा अर्थ अभिप्रेत आहे.त्यासठी आपण सर्वानी मिळून प्रयत्न केले पाहिजेत आणि या देशातील स्त्रीमुक्ती फक्त पोळ्या प्रमाणे साजरी न करता ती रोजच आपल्या मनात आचरणात यायला हवी असे आम्हला वाटते.सर्व प्रकारचे नाते संबंध निभावणाऱ्या सर्व भगिनींना स्त्रीमुक्ती दिनाच्या लाख लाख शुभेच्छा!
comments