शांतीचा भाव आचरणात आणण्यासाठी महावीर कथा श्रवण करा जैनाचार्य श्री गुप्तिनंदीजी यांचे प्रतिपादन

2016-04-21 18:57:17
     125 Views

बीड (प्रतिनिधी)- चोवीसवे तिर्थंकर भगवान महावीर स्वामी यांनी संबंध विश्‍वाला शांतीचा मार्ग दाखवला. सर्व प्राणीमात्रांबद्दल दया आणि करूणेचा भाव ठेवा. याची शिकवण भगवान महावीरांनी आपल्या कृतीतून समाजाला दिली. आज त्यांच्या या विचारांची केवळ एका देशाला नव्हे तर सर्व विश्‍वाला गरज आहे. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला दया आणि शांतीचा भाव आपल्याही आचरणात आणावा वाटत असेल तर त्यांनी महावीर स्वामींची कथा सातत्याने श्रवण करावी. श्रवणातुन आत्मचिंतन आणि आचरण घडवावे असे आवाहन जैनाचार्य श्री गुप्तिनंदीजी गुरूदेव यांनी केले.
बीड शहरात त्यागी भवनात आयोजित संगितमय भगवान महावीर कथेनिमित्त गेल्या आठवडाभरापासून जैनाचार्य आपल्या आपल्या ओजस्वी आणि रसाळ वाणीतून महावीर चरित्राचे निरूपण उपस्थित भाविकांसमोर करत आहेत. गुरूवारी (दि.२१) रोजी त्यांनी भगवान महावीर स्वामींच्या बाललिलांचे वर्णन केले. महावीर युवराज कसे बनले, त्यांनी दिक्षा का घेतली,याबाबत जैनाचार्यांनी विस्ताराने वर्णन केले. कथेचे निरूपण करतांनाच जैनाचार्यांनी प्रत्येकाचे आचरण पवित्र असणे किती महत्वाचे असते हेही विविध दाखले देत स्पष्ट केले.ते म्हणाले, व्यक्तीची, गुरू आणि भगवंतांबद्दलची श्रध्दा निस्सीम असायला हवी. ती अल्पज्ञानी नसावी. श्रध्दा असेल तर व्यक्तीचे भावही सकारात्मक होतात.विज्ञानाचा सिध्दांत आहे की काहीही होवू शकते. त्यासाठी चिरंतन संशोधन आणि प्रयत्न कायम ठेवावे लागतात. विज्ञानाच्या शब्दकोशात नाही हा शब्द नसतो असेही जैनाचार्य गुप्तिनंदीजी म्हणाले. यावेळी त्यांनी तिर्थंकर भगवान महावीर स्वामींची वीर, अतिवीर, वर्धमान, सन्मती आणि महावीर या पाच नावाबद्दल विस्ताराने माहिती दिली. ही सर्व नावे महावीरांनी आपल्या जीवन कार्यात सिध्द करून दाखवली असेही जैनाचार्य म्हणाले. आजच्या कथेत सादर झालेल्या ‘मेरा महावीर प्यारा, बडाही दुलारा, जय हो महावीरा, जय हो महावीरा‘ या संगीतमय भजनात भाविक तल्लीन झाले.
प्रारंभी भगवान महावीरांच्या प्रतिमेला पुष्पअर्पण करून कथेला प्रारंभ करण्यात आला. मुख्य श्रोता म्हणुन निलेश कासलीवाल यांच्यासह प्रविण मौजकर, आशिष जैन, डॉ.रमणलाल बडजाते, शिल्पा नाकेल, सचिता पोरवाल, अशोक लोढा, दिलीप गोरे, विपीन लोढा आदि मान्यवरांची उपस्थिती होती. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. प्रविण लोहारे आणि नरेंद्र महाजन यांनी सुत्रसंचलन केले. संयोजन समितीच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी सकल जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
comments