डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लोकशाहीविषयक विचार

14/04/2014 16 : 48
     4262 Views

समाजाच्या स्थितीसंबंधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या रानडे, गांधी आणि जीना या ग्रंथात विचारवंत थायरने आपल्या थिओडोर रूझवेल्ट यांच्या लिहिलेल्या चरित्रात नमूद करतात ते असे आहे की, प्रत्येक पंथ, पक्ष किंवा संस्थेत अशी ही एक स्थिती येते की तेव्हा तिची वाढ खुंटते, तिच्या नाड्या थंड पडतात. तिचा तरूणांसमोर आदर्श उरत नाहीत; तिच्या पोक्त पुरूषांना आशेची स्वप्ने दिसत नाहीत. ती केवळ तिच्या भूतकाळावर जगत असते आणि भूतकाळ तसाच चालू राहावा म्हणून ती प्राणपणाने प्रयत्न करीत असते. राजकारणात जेव्हा ही कठोरतेची स्थिती पूर्णत्वास पोहोचते तेव्हा त्याला आपण दूर्दम्य गतानुगतिकवाद असे म्हणतो आणि ही दूर्दम्य गतानुगतिकता ओळखण्याची मुख्य खूण अशी की दृष्टिभंग झाल्यामुळे व जाणीवशून्य झाल्यामुळे याच्या उपचाराची व नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास असमर्थ ठरल्यामुळे, एखाद्या म्हाता-या माणसाने आपले अंग जुन्या आराम खूर्चीत झोकून द्यावे, त्याप्रमाणे असा समाज भूतकाळात फेकल्या जातो. अशीच स्थिती आज भारतीय लोकशाहीची झालेली आहे ही लोकशाही श्रीमंतांच्या, गुंडप्रवृत्तींच्या आणि भांडवलदारी व्यवस्थेच्या हातात गेलेली आहे. प्रत्येक समाजाला अशा -हासाची आणि विनाशाची शक्यता असलेल्या काळातून मार्ग काढावाच लागतो त्यातून काही वाचतात तर काहींचा विनाश होत, आणि काही मात्र गतानुगतिक बनून -हासाच्या मार्गाला लागतात. असे का घडते? काही समाज जगतात याचे कारण काय? विचारवंत कार्लाईलने याचे उत्तर दिलेले आहे तो आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने लिहितो. बिकट काळ आला तरी त्यात सर्वनाश होतोच असे नाही तर अशा काळाला एक अत्यंत श्रेष्ठ, बुद्धिमान, दूरदर्शी, काळाची गरज ओळखून सत्याची पारख करणारा दूर्दम्य काळात ही मुक्तीचा मार्ग जाणणारा व शौर्याने इतरांना त्या मार्गावर नेणारा महापुरूष लाभला तर सर्व नाशापासून तो समाजाला वाचवू शकतो. तो महापुरूष म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. आजच्या लोकशाहीसंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नांना डॉ. आंबेडकरांनी उत्तरे दिली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत केलेल्या भाषणात म्हटल्याप्रमाणे, आपण आपल्या राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाहीचे रूपही दिले पाहिजे. राजकीय लोकशाही तिला आधारभूत अशी सामाजिक लोकशाही नसल्यास टिकू शकत नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय? तिचा अर्थ आहे, स्वातंत्र्य, समता, व बंधुभाव यांनी जीवनाचे सिद्धांत म्हणून मान्य करणारी जीवन प्रणाली. स्वतंत्र्यता, समता व बंधुभाव सिद्धांत म्हणजे एकाच त्रयीची भिन्न भिन्न तत्त्वे मानता येणार नाहीत. २६ जानेवारी १९५० रोजी आपण एका विसंगतीच्या जीवनात प्रवेश करीत आहोत. राजकारणात आपल्या जवळ समता असेल तर आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता. राजकारणात आपण एक मनुष्य, एक मत आणि एक मत, एक किंमत या सिद्धांतास मान्यता देत राहू पण आपल्या सामाजिक व आर्थिक जीवनात आपल्या सामाजिक, आर्थिक रचनेमुळे, एक माणूस, एक मूल्य या तत्त्वास आपण नाकारत राहू. आपल्या सामाजिक, आर्थिक जीवनात आपण समता कोठवर नाकारीत राहणार? दीर्घकाळ आपण ती नाकारत राहिलो तर आपल्या राजकीय लोकशाहीचे नष्टचर्य ओढवेल. शक्य होईल त्याक्षणी आपण ही विसंगती दूर केली पाहिजे. अन्यथा, ह्या प्रतिनिधी सभेने अत्यंत मेहनतीने घडविलेला राजकीय लोकशाहीचा दुमला, विषमतेने ग्रस्त आणि त्रस्त असलेले लोक उद्ध्वस्त करून टाकतील. अशीच परिस्थिती सामाजिक लोकशाहीची सध्या झालेली आहे.
लोकशाहीचे अस्तित्व टिकविण्यासाठी डॉ.आंबेडकरांनी पुढील तीन मार्ग सांगितलेले आहेत. १) लोकशाहीचे अस्तित्व आपणाला टिकवायचे असेल तर, आपले सामाजिक आणि आर्थिक उद्देश साध्य करण्यासाठी आपण फक्त सनदशीर मार्गांचाच अवलंब केला पाहिजे. याचा अर्थ असा की, सविनय कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह हे मार्ग आपण वज्र्य केले पाहिजेत. सामाजिक व आर्थिक उद्देश साध्य करून घेण्यासाठी जेव्हा सनदशीर मार्गाचा अवलंब करणे यथायोग्य वाटत होते. परंतु सनदशीर मार्गांनी आपले उद्देश साध्य करणे शक्य असताना असनदशीर मार्गाचा जर कोणी अवलंब केला तर ते त्याचे कृत्य यथार्थ वाटणार नाही. हे असनदशीर मार्ग म्हणजे बेबंदशाहीची उगमस्थाने होत. हे मार्ग आपण जेवढ्या लवकर वज्र्य करू तेवढे आपणाला अधिक हितावह होणार आहे. २) हिंदुस्थानच्या राजकारणात भक्ती किंवा व्यक्ती महात्मपूजा ही भावना जितकी थैमान घालते तितकी ती जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात घालीत नसते. एखाद्याने धार्मिक बाबतीत भक्ती दाखविली तर ती त्याची जन्ममरणाच्या फे-यातून कायमची मुक्तता करू शकेल. परंतु एखाद्याने राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिमहात्मपूजा दाखविली तर ती त्या राजकीय विचार प्रणालीला अधोगतीस नेईल व त्या राजकीय पंथात सर्वाधिकारीपणाची सत्ता प्रस्थापित करील. ३) आपण राजकीय लोकशाही प्रस्थापित करून स्वस्थ बसता कामा नये. तर आपण राजकीय लोकशाहीतून सामाजिक लोकशाही निर्माण करण्यासाठी झटले पाहिजे. राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार असेल तरच राजकीय लोकशाहीचे अस्तित्व चिरंजीवी होऊ शकेल, एरवी नाही.भारतीय राज्यघटनेच्या घटना समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटना देशातील लोकांना अर्पण केली. ही घटना प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही लोकशाही मूल्ये देणारी आहे. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्याची हमी घटनेने दिलेली आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे की, भारतीय राज्यघटनेचे यशापयश हे अंमलबजावणी करणा-या राज्यकत्र्यांवर असेल. खरंतर हा त्यांनी दिलेला इशाराच होता. आज तरी हे मान्यच करावे लागेल.
आजचा भारत तरूणांचा देश आहे. तरूण हीच खरी देशाची संपत्ती आहे, परंतु भ्रष्टाचार, अंधश्रद्धा, विभूतीपूजा, व्यसनाधिनता, शिक्षणाचे बाजारीकरण, बेरोजगारी यासाखे प्रश्न निर्माण झालेले आहेत. भारतीय राज्यघटनेने एक व्यक्ती, एक मूल्य, एक मत अशी तात्त्विक विचारधारा दिलेली असताना आपण आपले मौलिक मतदानाचे स्वातंत्र्य गमावून बसतो अन् आपले प्रश्न वाढवत राहातो. राजकारणी लोकांची भक्तिपूजा करणे हा लोकशाहीतील अडसर आहे. तरीही तरूण सद्सद्विवेक बुद्धीशिवाय जयजयकार करीत राहतात अन आपले व्यक्तिस्वातंत्र्य गमावून बसतात. राजकारणात व्यक्तिपूजा आणि भक्ती केल्यानेच हुकूमशाही निर्माण होत आहे. भारतीय राजकारणामध्ये राजकारणातील संप्रदाय निर्माण होत आहेत. राजकारणात भक्ती वा व्यक्तिपूजा करण्यात येत आहे. त्यामुळे राजकारणात हुकूमशाही सत्ता प्रस्थापित होत आहे आणि हीच हुकूमशाही स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या लोकशाही मूल्यांना नष्ट करून टाकत आहेत. भारत हा व्यक्तीपूजकांचा देश बनताना धर्म आणि राजकारण या क्षेत्रांना व्यापून टाकत आहेत. या व्यक्तीपूजेने अनुयांना अनैतिक आणि राष्ट्राला संकटग्रस्त केलेले आहे. ही विभूती पूजा भारतीय लोकशाहीपुढे आव्हान ठरत आहे.
भारतीय संविधानाच्या प्रत्येक कलमाच्या अंमलबजावणीसाठी भारतीय तरूणांनी एकत्र येण्याची गरज आहे. कायद्याच्या अधिराज्यासाठी सर्वांनी आग्रह धरल्यास समताधिष्ठित भारतीय तरूणच देशाला महासत्तेकडे आगेकूच करण्यासाठी भारतीय संविधानाच्या आधारे पाठबळ देतील, डॉ. आंबेडकरांनी सरनाम्याचे महत्त्व सांगताना ते म्हणतात, शेकडो वर्षाच्या गुलामगिरीनंतर भारतीय स्वातंत्र्य झालेत, भारतीय जनतेने आपल्याकरीता काळानुरूप एक भव्य आणि उदात्त असे संविधान तयार केले. त्या संविधानाचा आधार माणूस आहे. प्रत्येक व्यक्तीला एक मूल्य (One Man-One Value) प्राप्त व्हावे यासाठी प्रत्येक भारतीयाने आपल्या मनात भारतीय संविधानाचा सरनामा आणि त्यातील उदात्त ध्येयवाद कोरून ठेवला पाहिजे. राष्ट्रीय जीवनातील प्रत्येक क्षेत्रात हा सरनामा आम्हाला दीपस्तंभासारखा मार्गदर्शन करीत आहे. प्रत्येक भारतीयाने व्यक्तिगत आणि सामाजिक जीवन घटनेतील सरनाम्यानुसार घडविण्यास कटिबद्ध झाल्यास भारतीय लोकशाहीची मुळे येथील भूमीत दृढमूल झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणूनच भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल ठरेल.

-नितीन रणदिवे
comments