नियम पाळा अपघात टाळा !

2016-06-10 14:04:36
     2659 Views

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात - १७ ठार ! ....सकाळी-सकाळी दैनिकात हेडलाईन वाचली आणि मन सुन्न झाले. या अपघातात १७ निष्पाप जीवांनी आपला जीव गमाविला होता. आणि त्याहीपेक्षा वाईट गोष्ट म्हणजे हा भीषण अपघात ज्या कारणामुळे झाला, ते कारण मनाला चटका लावणारे आहेच आहे, पण त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना चांगलाच धडा शिकविणारेही आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून महामार्गावर भरधाव वेगाने धावणारी आरामबस आणि चुकीच्या दिशेला थांबलेली मोटार गाडी यांच्यामुळे तब्बल १७ जण आपल्या जीवाला मुकले आहेत. या १७ जणांचे कुटुंबही उद्ध्वस्थ झाले आहे. बेजबाबदार वृत्तीतून झालेली ही चूक आणि त्यामुळे मोजावी लागलेली जीवांची किंमत ही अपरिमित आहे. एकवेळ अपघातात झालेली वित्तहानी भरून काढणे शक्य असते पण झालेली जीवित हानी कधीही भरून येणारी नसते.....ना कुटुंबाची....ना समाजाची.....

भारतात दर एक दोन मिनिटाला अपघातात एकाचा मृत्यू होतो असे सांगितले जाते. अर्थातच हे नक्कीच भूषणावह नाही. भारतात दरवर्षी होणाऱ्या नैसार्गिक मृत्यूच्या खालोखाल सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघातात होतात अशी आकडेवारी सांगते. आणि त्यातही दु:खद बाबा अशी की, मृत्युमुखी पडणारे बहुतांशी नागरिक हे २० ते ४० या वयोगटातील असतात. म्हणजेच ऐन उमेदीच्या काळात घरातील कर्तीसवरती व्यक्ती अपघातात मरण पावल्यामुळे अथवा कायमचे अपंगत्व आल्यामुळे दरवर्षी हजारो कुटुंबांची अतोनात हानी तर होतेच होते परंतु त्याचबरोबर पूर्ण विकसित मनुष्यबळ दगावल्यामुळे राष्ट्राचीही मोठी हानी होते.

खरेतर जवळ जवळ ९० ते ९५ टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे होत असतात. वाढते शहरीकरण... वाहनांची भरमसाठ संख्या... तुलनेने अरुंद अपुरे रस्ते तर दुसरीकडे वाहनचालकांचा भरधाव वेग... पुढे जाण्याची घाई... सुरक्षितेच्या बाबींकडे केलेले दुर्लक्ष व वाहतुकीच्या नियमांचे केलेले उल्लंघन, महामार्गावरील वाहतुकीच्या नियमांचे अज्ञान, साईन बोर्डच्या अनुषंघाने न घेतलेली खबरदारी अशा अनेक बाबी दिवसागणिक असंख्य रस्ते अपघातांना निमंत्रण देत आहेत. त्यामुळे सुरक्षतेच्या बाबतीत केवळ सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता वाहन चालक आणि पादचारी यांनी रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे हे अत्यंत आवश्यक आहे. शासन पातळीवर दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते.

नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांची जागृती व्हावी व या प्रबोधनातून नागरिकांनी आपल्या व इतरांच्या सुरक्षतेसाठी स्वशिस्तीचा अवलंब करावा हा त्या मागील प्रमुख उद्देश असतो. परंतु खरी वस्तुस्थिती अशी आहे की, आपण ना वाहतुकीच्या नियमांकडे गांभीर्याने पाहतो, ना ही या अभियानाकडे.....! परिणामी दिवसागणिक अपघातांची संख्या वाढत आहे, आणि त्यातील बळींची सुद्धा !!

वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणे, बेपर्वाईने वाहन चालविणे, सार्वजनिक ठिकाणी इतरांच्या सुरक्षिततेचा विचार न करणे या गोष्टी अपघातास निमंत्रण देणाऱ्या असतात. तर दुसरीकडे सीट बेल्टचा, हेल्मेटचा वापर न करणे याबाबी सुद्धा मृत्यूस कारणीभूत ठरतात. किंबहुना सीट बेल्ट, हेल्मेटचा वापर न केल्यामुळेच अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे वाहन चालविताना योग्य ती खबरदारी घेणे आणि छोट्या-छोट्या परंतु महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. उदा. मर्यादित वेगाचे पालन करावे, धोकादायक ओव्हरटेकिंग/लेन कटिंग करू नये, वाहनात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी अथवा वजन भरू नये, वाहन चालविण्याचे तज्ज्ञांकडून प्रशिक्षण घ्यावे, वाहतुकीच्या नियमांचे आकलन करावे, हेल्मेट, सिट बेल्ट न वापरता वाहन चालवू नये, तसेच प्रवास करू नये, वेळोवेळी वाहनाची तांत्रिक तपासणी करून घ्यावी, रात्रीच्यावेळी गाडी चालविताना नेहमी पुढील व मागील दिवे, पार्किंग लाईट सुरु आहेत का याची तपासणी करावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मद्यपान किंवा इतर नशापाणी करून वाहन चालवू नये, डाव्या बाजूने ओव्हरटेक करणे टाळले पाहिजे. शिवाय जर पुढील वाहनाने उजवीकडील ब्लिंकर चालू ठेवला असेल तर त्यावर विश्वास ठेऊन आपले वाहन पुढे ओव्हर टेक करू नये. कारण बऱ्याच वेळा अनावधपणे ब्लिंकर चालू राहण्याची शक्यता असते. अशावेळी विश्वास वाटला तरच ओव्हरटेक करणे शहाणपणाचे ठरते. शिवाय आपल्या पुढे ओव्हरटेक करीत असलेल्या वाहनासोबत समांतर ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न जाणीव पूर्वक टाळला पाहिजे. थोडक्यात रस्ते अपघात टाळावयाचे असतील तर स्वशिस्त अंगीकारणे अत्यंत गरजेचे आहे. वाहन चालविताना स्वशिस्त पाळली तरच अपघात टाळता येऊ शकतात. थोडक्यात सुरक्षित व सतर्कपणे केलेला प्रवास हा आपल्या बरोबरच इतरांच्याही आनंदी व सुखद प्रवासाची गुरुकिल्ली आहे.

अर्चना जगन्नाथ माने,
माहिती सहाय्यक,
विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर
comments