हिंगणी प्रकरणातील पंधरा आरोपींचा जामीन फेटाळला

2016-04-29 15:22:36
     236 Views

माजलगाव जिल्हा सत्रन्यायालयाचा निर्णय
बीड
(प्रतिनिधी) : धारूर तालुक्यातील हिंगणी (बु.) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा चौक उध्वस्त करून त्यांच्या प्रतिमेची व निळ्या ध्वजाची गावातीलच काही गावगुंडांनी विटंबना केली आहे. त्यानंतर या गावगुंडांनी दलित वस्तीतील काही घरांवर दगडफेक करीत दहशत निर्माण केली. या प्रकरणी दिंद्रुड पोलिस ठाण्यात सोळा आरोपींच्या विरोधात विविध कलमाप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुरूवारी या सोळाही आरोपींना माजलगाव येथील जिल्हा व सत्र न्यायधिश डी.जे.राजे यांच्या समोर जामीनासाठी अर्ज दाखल झाले असता आरोपी अविनाश सतिष सोळंके यास जामीन दिला तर बाकी पंधरा आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
धारूर तालुक्यातील हिंगणी (बु.) याठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा चौक आहे. त्याठिकाणी त्यांची प्रतिमा व निळा ध्वज लावण्यात आलेला आहे. गेल्या पन्नास वर्षापासून दलित वस्तीतील नागरीक याठिकाणी १६ एप्रिलला डॉ.बाबासाहेब आंबेडकार यांना अभिवादन करतात. मात्र मंगळवार दि. २६ रोजी रात्री गावातील कही गावगुंडांनी हा चौक उध्वस्त करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर व निळ्या ध्वजाची विटंबना केली होती. या प्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात एकूण सोळा आरोपी ंच्या विरुध्द गुन्हा नोंद केला होता. ते सर्व आरोपी तेव्हापासून फरार होते. या आरोपींनी गुरुवारी वकीलामार्फत जामीनासाठी अर्ज दाखल केले असता, त्यापैकी अविनाश सोळंके याची रेल्वे खात्यामध्ये परिक्षा असल्याने त्यास जामीन देण्यात यावा या सबबीखाली त्यास जामीन देण्यात आला आहे. तर बाकी पंधरा आरोपींचा जामीन फेटाळला आहे.

चौकट
सपोनि रवि सानप आरोपीची पाठराखण करीत आहेत
दिंद्रुड पोलीस स्टेशनचे सपोनि रवि सापन हे राहुल वस्तीतील दलितांना न्याय देण्याऐवजी आरोपीची पाठराखण करीत आहेत. गावातील काही गावगुंडानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा चौक उध्वस्त करून त्यांच्या प्रतिमेची व निळ्या ध्वजाची नासधूस केल्यानंतर या घटनेची फिर्याद देण्यासाठी दिंद्रुड पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तुम्ही आपसात मिटवा व फिर्याद मागे घ्या अन्यथा तुमच्यावर गुन्हे दाखल करीन असा दम भरला अशा बेजबाबदार पोलीस अधिकार्‍यावर अनुसूचित जाती जमाती अ‍ॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षकांकडे संदिपान डोंगरे यांनी दिले आहे.
comments