भिल्ल वस्तीतील २० घरे जाळली

2016-02-11 10:35:17
     240 Views

पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरा गावात अनेक वर्षांपासून भिल्ल समाजाची घरे आहेत. काही गावात राहतात, तर काही गावाबाहेर. याच समाजातील बबन गांगुर्डे यांच्याकडे आलेल्या मेहुणा सुनील बर्डे याने पारगावातील मीरा सुग्रीव घुमरे या महिलेचा खून केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडल्याने बलात्काराचा संशयही व्यक्त करण्यात आला. बुधवारी महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर जमाव आक्रमक झाला आणि थेट तीन वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या भिल्ल समाजाच्या घरांवर चालून गेला. सुरुवातीला घरांवर दगडफेक आणि नंतर तिन्ही ठिकाणची घरे, झोपड्या पेटवून देण्यात आल्या.
शेतातून घरी परतणार्‍या महिलेवर बलात्कार करुन खून केल्याच्या संशयातून बुधवारी संतप्त ग्रामस्थांनी अंत्यसंस्कारानंतर घरी न येता भिल्ल वस्तीवर हल्लाबोल केला. या जमावाने झोपड्यांना आग लावली. यामध्ये २० घरे खाक झाली.
घुमरा पारगाव येथील एका ४२ वर्षीय महिलेचे दासखेड रस्त्यालगत शेत आहे. मंगळवारी सायंकाळी शेतातील काम आटोपून त्या एकट्याच सरपणाचा भारा डोक्यावर घेऊन गावाकडे निघाल्या. घरी येण्यास विलंब झाल्याने नातेवाईकांनी शोध घेतला असता रस्त्यावरील खदाणीजवळ त्यांचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत रक्ताच्या थारोळ्य़ाआढळून आला. महिलेच्या मागोमाग भिल्ल वस्तीवरील गोट्या भिल्ल (पूर्ण नाव नाही) याचा पालवण येथील नातेवाईक सुनील बरडे हा येत असल्याचे गावातील एकाने पाहिले होते. त्यामुळे संशयाची सुई बरडेवरच गेली. तो भिल्ल वस्तीवर आढळून न आल्याने संशय अधिकच वाढला. ग्रामस्थ संतापलेले समजताच भिल्ल कुटुंबातील बहुतांश लोक रात्रीतून गायब झाले. जिल्हा रुग्णालयात महिलेचे शवविच्छेदन केल्यानंतर बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी पतीच्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा नोंद करुन सुनील बरडेला अटक करण्यात आली. अंत्यसंस्कार संपल्यानंतर संतप्त नातेवाईक व ग्रामस्थ घरी परतलेच नाहीत. त्यांनी आपला मोर्चा थेट भिल्ल वस्तीकडे वळविला. भिल्ल वस्तीवरील गोट्या भिल्ल याच्यासह इतर घरांनाही जमावाने आग लावली. आगीने अवघ्या काही क्षणात संपूर्ण वस्तीला कवेत घेतले. अध्र्या तासात संसारोपयोगी साहित्य, कपड्यांसह अन्नधान्य व तीन घरांतील दोन दुचाकीही खाक झाल्या.
comments