एॅडव्हर्टायझींगचे करियर


एॅडव्हर्टायझींगचे करियर
आपल्या संस्कृतीमध्ये ६४ कला आणि १४ विद्यांचा उल्लेख केला आहे. मात्र विसाव्या शतकाच़्या पूर्वार्धापासून ६५वी कला म्हणून जाहिरात क्षेत्राला मान्यता मिळाली. आज कोणत्याही उत्पादनाची, ब्रॅण्डची जाहिरातीविना आपण कल्पनाच करु शकत नाही. टी.व्ही चालू करा तर जाहिरात, रेडीओ सुरु करा तर जाहिरात, कोणतंही वर्तमानपत्र वा मासिक घ्या जाहिरातीशिवाय ही माध्यमे अपूर्ण आहेत. अलिकडेच एक बातमी वाचनात आली होती की एका तरुणाने चक्क आपले कपाळ जाहिरातीसाठी देऊ केले होते. असं हे त्रिभुवन व्यापणारे जाहिरात क्षेत्र करिअरचा पर्याय होऊ शकते का? त्यासाठी काय पात्रता असावी? कोणते गुण असावेत? कोणत्या संस्था याचे प्रशिक्षण देतात? या सर्व प्रश्नांचे उत्तर कदाचित आपणांस सापडू शकेल आणि आपल्या मधूनच एखादा हरहुन्नर कलाकार जाहिरात क्षेत्राला मिळेल.
जगातील इतर कोणत्याही व्यवसायापेक्षा आपल्या दैनंदिन आयुष्याला प्रभावीत करणारा व्यवसाय म्हणजे जाहिरात व्यवसाय होय. आपली आवड-निवड, आपण कोणती कार चालवतो, कोणती शीतपेये पितो, कोणते कपडे परिधान करतो ह्या सर्व बाबी जाहिरातींनी प्रभावित झालेल्या असतात.

कामाचे स्वरूप: जाहिरात क्षेत्राचा करिअर म्हणून विचार करताना या क्षेत्रातील अनेक संधी आपल्याला खूणावतात. इतर उद्योगांपेक्षा जाहिरात उद्योग हा एनर्जेटिक असा आहे. जाहिरातक्षेत्रात एकाच छताखाली अनेक कुशल गट कार्यरत असतात. यातील कामाचे तीन मुख्य भाग म्हणजे १) क्लाएंट सर्विसिंग २) मीडिया प्लानिंग, आणि ३) क्रिएटिव्ह रिसर्च


क्लाएंट:

क्लाएंट हा जाहिरात संस्थेचा दर्शनी चेहरा असतो, संस्थेची प्रतिमा त्यावरून जपली जाते. क्लाएंट कडून त्याबाबतची विस्तृत माहिती घेतल्यानंतर अकाऊंट एक्झिक्युटिव्ह आणि अकाऊंट प्लॅनर ब्रॅण्ड पोझिशनिंग कशी करावी याबाबत रूपरेषा आखतात. यामध्ये प्रामुख्याने ब्रॅण्डचा यु.एस.पी आणि कम्युनिकेशन ऑब्जेक्टिव्हचा समावेश असतो. उत्कृष्ट जाहिरात संस्थांना एम.बी.ए तर इतर जाहिरात संस्था डिग्री/डिप्लोमा, मार्केटिंग आणि मास कम्युनिकेशन प्रशिक्षितांना नोकरीसाठी प्राधान्यक्रम देतात.

अकाऊंट्स:

जाहिरातसेवा देण्यासाठी सर्विसिंग डिपार्टमेन्टमधील ही वरिष्ठ जागा आहे. क्लाएंटला देण्यात येणारी सेवा, त्याबद्दलची रणनिती, बजेट, त्यासाठी योग्य त्या प्रकारचा मीडिया निवडणे व याबाबतची चर्चा सतत क्लाएंट व आपल्या क्रिएटिव्ह टिमशी करत रहाणे व शक्य असल्यास मिडिया प्लानिंग डिपार्टमेन्टशी संपर्कात राहणे, मार्केट रिसर्च अभ्यासणे अशी कामे याअंतर्गत करावी लागतात. सततच्या चर्चात्मक मुद्द्यांना मूर्त स्वरूप देऊन ब्रॅण्ड आणि त्याची मार्केटमधील जागा ठरवण्याचे काम यातून केले जाते.

मीडिया:

मीडिया प्लॅनर्स म्हणजेच माध्यम सल्लागार हे जाहिरात संस्थांना योग्य त्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. नियोजित प्रकारे वृत्तपत्रे, मासिके, नियतकालिके अशी छापील माध्यमे व टि.व्ही, रेडिओ, इंटरनेट अशा इलेक्ट्रॉनिक कामही ते करतात. एखाद्या ब्रॅण्डवर विषेश संशोधन करून ग्राहकांच्या अथवा वाचकांच्या सवयी लक्षात घेऊन ब्रॅण्ड रिकॉल व त्याच्याशी निगडीत मोहिम राबविण्याचे कामही मीडिया प्लॅनरला करावे लागते. थोडक्यात मॅथ्स, स्टॅटिस्टिक्स, एम.बी.ए आणि आकडेमोड करणा-या सॉफ्टवेअर्स चलाखीने हाताळणारा व्यक्तिंना याबाबतीत नोकरीसाठी प्राधान्य दिले जाते.


क्रिएटिव्ह डिपार्टमेंट:

जाहिरात संस्थेत क्रिएटिव्ह डिपार्टमेंटचे काम शब्दांची योग्य निवड, त्यांची जुळवाजूळव, अचूक विजूअल्स (दृष्यपरिणाम) साधणे जेणेकरून त्या माध्यमातून दर्शकाचे लक्ष वेधून घेऊन त्याचे ग्राहकात रूपांतर होईल व अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करून खप वाढवला जाईल अशा प्रकारचे असते. क्रिएटीव्ह डिपार्टमेंटचेही कॉपी आणि क्रिएटिव्ह असे दोन भाग पडतात. कॉपी डिपार्टमेंट शब्दांतून ब्रॅण्डचा संदेश पोहोचवला जाईल अशा शब्दांची रचना करणे, जिंगल्स अथवा डायलॉग रचणे अशी कामे कॉपी डिपार्टमेंटमध्ये केली जातात.

आर्ट डिपार्टमेंट:

ब्रॅण्डचा लूक आणि फिल कसा असावा हे ठरवण़्याचे काम आर्ट डिपार्टमेंट करते. यासाठी स्केचेस काढणे व त्यातील हेडिंग, विज्यूअल्स, पिक्चर्स, लोगो हे एका ठराविक व मर्यादित जागेत बसवण्याचे काम यात येते. कोणते फॉन्ट्स निवडावेत, फोटोग्राफिक ट्रिटमेन्ट कशी असावी हे काम प्रामुख्याने आर्ट डिपार्टमेंटला करावे लागते. एफ.बी.ए, अप्लाईड आर्ट अथवा ग्राफिक डिझाईनमधील डिग्री व याशिवाय कंप्यूटर ग्राफिक्स, मल्टीमिडियातील ज्ञान या क्षेत्रात काम करण्यासाठी महत्त्वाचे आहे.

मार्केट रिसर्च:

जाहिरात संस्थेद्वारे राबविल्या जाणा-या विशिष्ट ब्रॅण्डवरील जाहिरात मोहिमेचे आकडेवारीतील परिणाम व त्याचे मोजमाप करण्याचे काम मार्केट रिसर्चमध्ये करावे लागते. यावर आधारित माहितीनूसार मीडिया प्लॅनर ब्रॅण्डची मार्केटमधील जागा ठरवण्यासाठी अचूक निर्णयप्रक्रिया ठरवतो. यात करिअर करण्यासाठी स्टॅटिस्टिकल मॉडेलिंग, सँपलिंग टेक्निक्स आणि सायकोग्राफिक्स या क्षेत्रात यासाठी प्राविण्य असावे लागते.

जाहिरात प्रशिक्षण देणा-या संस्था:

जाहिरात क्षेत्रात करिअर करण्यासाठी फार कमी महाविद्यालये पदव्यूत्तर शिक्षण देतात. मीडिया प्लॅनिंग आणि क्लाएंट सर्विसिंग हे विषय मास कम्युनिकेशनची पदवी घेतेवेळी पदवी शिक्षणात समाविष्ट असतात.
comments
Leave a reply

आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.

Your E-mail ID not be published. Required *. मराठी/इंग्रजी साठी [CTRL + G] बटन वापरा

anti spam
(Maximum characters: 500)
characters left.

Required fields are marked (*)