अधिकारी होण्यासाठी पंचपदी

2016-02-05 17:57:33
     1353 Views


स्पर्धा परीक्षा स्वरूप, उद्देश व गैरसमज

आज कोणत्याही विद्याशाखेला प्रवेश घ्यायचा असेल किंवा कोणतीही नोकरी करायची असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याला विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या टप्प्यांमधूनच जावे लागते.या परीक्षांमध्ये व सामान्य परीक्षांमध्ये बराच फरक असतो. सामान्य परीक्षेत ३५ किंवा ठरवून दिलेले गुण मिळविले की परीक्षार्थी उत्तीर्ण होतो. मात्र स्पर्धा परीक्षांमध्ये असा कट ऑफ ठरलेला नसतो. परीक्षेच्या सर्व टप्प्यांमध्ये संपूर्ण देशातून वा महाराष्ट्रातून परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, त्यांची गुणात्मक कामगिरी यानुसार कट ऑफ दरवर्षी बदलतो व तुम्हाला उपलब्ध पद संख्येनुसार निवड यादीमध्ये तुमचे नाव निश्चित करावे लागते. त्यामुळेच या परीक्षांचे स्पर्धा परीक्षा हे नाव सार्थ ठरते. भरावयाच्या पदांसाठी योग्य व पात्र उमेदवाराची निवड करणे हाच कोणत्याही स्पर्धा परीक्षांचा उद्देश असतो. त्यासाठी भारतीय संविधानाने अनुच्छेद ३१५ नुसार केंद्रीय प्रशासनातील पदे भरण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्य प्रशासन सेवेतील पदे भरण्यासाठी राज्य लोकसेवा आयोगाची (महाराष्ट्रासाठी एमपीएससी) स्थापना केलेली आहे. जिल्हास्तरीय संवर्गातील पदे भरण्यासाठी त्या स्तरावर निवड मंडळांची निर्मिती करण्यात येते. बँकेसारख्या संस्थांमधील पदांची भरती ही संबंधित रिक्रुटमेंट बोर्डांकडून केली जाते.

आजही एमपीएससी, युपीएससी व एकूणच सर्व स्पर्धा परीक्षा यांच्यातील यशाबाबत सर्वसामान्यांमध्ये विशेषत: ग्रामीण भागात कमालीची भीती व गैरसमज दिसून येतात. या परीक्षा खूपच कठीण असतात, त्यासाठी शहरात, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधूनच शिक्षण घ्यावे लागते, दिल्ली-मुंबईला जाऊन क्लासेस करावे लागतात, रात्रंदिवस ५-६ वर्षे अभ्यास करावा लागतो, सर्व विषयांमध्ये तज्ज्ञ असावे लागते, श्रीमंतांच्याच मुलांची निवड होते, मुलाखती मध्ये सेटिंग होते, पोस्टिंग साठी मोठा वशिला लागतो, नशिबाने साथ दिली पाहिजे अशा अनेक कारणांमुळे एका बाजूला गुणवत्ता व क्षमता असूनही गरजू व होतकरू मुले या परीक्षांपासून दूर पळतात. मात्र दुसऱ्या बाजूला बालाजी मंजुळे, भारत आंधळे, रमेश घोलप, राजेंद्र भारुड यांचेसारखे शेकडोजण प्रतिकूल व हलाखीच्या परिस्थितीवर मात करून सर्वार्थाने यशस्वीपणे प्रशासनात विविध पदांवर काम करीत आहेत. वरील सर्व गैरसमजांना फाटा देत महाराष्ट्राच्या या सुपुत्रांनी त्यांची मनोगते, आत्मचरित्रे, मुलाखती इत्यादी मधून सर्वांना सहज शक्य व प्राप्य असे स्पर्धा परीक्षा यशाचे गमक उलगडून दाखविले आहे. त्यांनी सांगितलेली सर्व सूत्रे प्रत्येकाला अंमलात आणण्यास सोपी व सहज शक्य आहेत. निसर्ग व वैज्ञानिक नियमांप्रमाणे ती शाश्वत व नि:पक्ष आहेत. प्रत्येकजण या सूत्रांचा मनोभावे, प्रामाणिक, नियमित व काटेकोरपणे वापर करून सहज अधिकारी होऊ शकतो.
स्पर्धा परीक्षा यशस्वीतेची सूत्रे !

१) अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिका विश्लेषण

सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना हमखास पडणारा प्रश्न म्हणजे मी तयारी केंव्हा, कोठून व कशी सुरु करू ?

जेथे आहात, जसे आहात, तेथून प्रारंभ करा आणि कधीच समाधानी राहू नका !

जॉर्ज कार्वर यांच्या वरील सुविचारात या प्रश्नाचे समर्पक उत्तर आलेले आहे. आज या क्षणी, तुम्ही जसे आहात तशी सुरवात करा. शालेय, महाविद्यालयीन जीवनापासून सुरुवात असेल तर फारच उत्तम ! याचा पुढील मुख्य तयारीसाठी तुम्हाला निश्चितच उपयोग होईल. तुमच्या अभ्यासाची, ज्ञानाची पातळी, खोली जी काही असेल तेथून सुरुवात करा. तुमची आर्थिक परिस्थिती, राहण्याचे ठिकाण, उपलब्ध मार्गदर्शन, सुविधा जे जसे आहे तसे स्वीकारा व तेथून सुरुवात करा आणि जोपर्यंत अधिकारी बनत नाही तोपर्यंत समाधानी न होता प्रयत्न सुरु ठेवा ! सर्वप्रथम वेब पोर्टल वरून तुम्हाला तयारी करावयाच्या परिक्षेचा अभ्यासक्रम व किमान मागील तीन वर्षांच्या प्रश्नपत्रिका मिळवा. त्यांचे सखोल वाचन व विश्लेषण करा. त्यामुळे तुम्हाला दोन बाबी प्रामुख्याने कळतील, त्यापैकी एक म्हणजे काय वाचू नये ? व दुसरे म्हणजे काय वाचावे ? यामुळे तुमच्या अभ्यासाला परीक्षाभिमुखता व योग्य दिशा येऊन तुमचा अमुल्य वेळ व वाया जाणारे कष्ट दोन्हीही वाचतील. कोणत्याही स्पर्धा परीक्षेचे साधारणत: खालीलप्रमाणे तीन टप्पे असतात.

स्पर्धा परीक्षांचा प्रत्येक टप्पा हा महत्त्वपूर्ण असून त्याची तयारीही वेगवेगळ्या पद्धतीने करणे आवश्यक आहे. एमपीएससीने पूर्व व मुख्य ह्या दोन्ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या केल्या आहेत. युपीएसची पूर्व परीक्षा वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी स्वरुपाची तर मुख्य परीक्षा पारंपारिक स्वरुपाची असते. थोडक्यात सांगायचे तर पूर्व परीक्षा ही माहिती, स्मरणशक्ती, तार्किक क्षमतेची, मुख्य परीक्षा ही ज्ञान, आकलन व उपयोजनाची आणि मुलाखत ही संपूर्ण व्यक्तिमत्त्वाची परीक्षा असते. क्रिकेटच्या भाषेत बोलायचे झाल्यास पूर्व परीक्षा ही वन डे सामना, मुख्य परीक्षा ही कसोटी मालिका तर मुलाखत ही २०-२० सामन्यासारखी असते. प्रत्येक परीक्षेची मागणी वेगळी असल्याने त्यानुसार तयारीमध्ये बदल अपेक्षित असतो. त्यासाठी प्रत्येकाने स्वत:च्या क्षमता व गुणवत्तेनुसार आपली तयारी करायला हवी. स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमामध्ये खालील बाबींचा समावेश होतो.

वरील सर्व विषयांचा अभ्यास आपण ५वी ते १२वी या इयत्तांमध्ये व पदवीपर्यंत केलेला असतो. त्यामुळे स्पर्धा परीक्षा तयारी करताना या सर्व विषयांची उजळणी, मूळ संकल्पना समजून घेणे आवश्यक ठरते. प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यावर कोणत्या विषयाचे प्रामुख्याने कोणत्या घटकावर व कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात याबाबत स्पष्टता येते. स्पर्धा परीक्षेत हमखास यशस्वी होण्यासाठी ठराविक वेळेत दिलेल्या प्रश्नांची उत्तरे अचूक सोडविणे आवश्यक असते. त्यामुळेच गती + अचुकता = यश असे स्पर्धा परीक्षांबाबत म्हटले जाते ते अगदी सार्थ आहे. उदा.राज्यसेवा पूर्व परिक्षा पेपर १ मध्ये १०० प्रश्न २ तासात सोडवावे लागतात. एक प्रश्न सोडविण्यासाठी ३६ सेकंद इतका वेळ मिळतो. या वेळेत प्रश्न वाचणे, उत्तराचे चारही पर्याय वाचणे, अचूक पर्यायाची निवड करणे व उत्तरपत्रिकेतील अचूक पर्यायाचा गोल काळा करणे ह्या सर्व प्रक्रिया गतीने व अचुकतेने पार पडणे आवश्यक आहे.

२) परीक्षाभिमुख अभ्यास

युपीएससी किंवा एमपीएससी परीक्षांची अंतिम निवड यादी बघितल्यास असे लक्षात येते की, सर्वप्रथम येणाऱ्या परीक्षार्थीलाही साधारणत: ५० ते ६० % यादरम्यान गुण असतात. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करतांना प्रत्येक विषयात तज्ज्ञ असण्याची अजिबात आवश्यकता नाही व पैकीच्या पैकी गुण मिळावे हाही अट्टाहास नको. त्याऐवजी सर्व पेपरमध्ये सरासरी ६० टे ६५ % गुण मिळवणे आवश्यक ठरते. ‘आभाळाखालील सर्व’ असा अभ्यासक्रम असल्याने व कमी वेळात इच्छित गुण प्राप्त करायचे असल्याने अभ्यासात नेमकेपणा व परीक्षाभिमुख दृष्टीकोन खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने खालील ३झ नुसार तयारी करावी.

स्पर्धा परीक्षा तयारी
अ) नियोजन

नियोजन हा कोणत्याही तयारीचा आत्मा असतो. ज्या एकाग्रतेने व गांभीर्याने आपण दहावी, बारावीचा अभ्यास करतो तसा अभ्यास १ वर्ष स्पर्धा परीक्षेचा पाया पक्का होण्यासाठी व १ वर्ष संपूर्ण पूर्व, मुख्य व मुलाखत या प्रक्रियेदरम्यान केला तर तुमची निवड नक्कीच होणार ! दरवर्षी युपीएससी व एमपीएससीद्वारे विविध परीक्षांचे वार्षिक वेळापत्रक जाहीर केले जाते. त्यामुळे परीक्षांच्या तारखांचा आपल्याला अंदाज असतो. त्यानुसार परीक्षेचे पूर्व, मुख्य, मुलाखत टप्पे, त्यांचा संपूर्ण अभ्यासक्रम, सर्व घटक यांच्या किमान मूळ संकल्पना व महत्त्वपूर्ण बाबी यांचे वाचन, उजळणी व प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव याचे प्रत्येकाने दैनिक नियोजन तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. नियोजन करतांना संभाव्य सर्व अडचणी, महत्त्वाची कामे, सण इत्यादी सर्व बाबींचाही विचार करावा जेणेकरून त्यामध्ये वस्तुनिष्ठता येईल. हे वेळापत्रक एका फलकावर लावून सातत्याने डोळ्यासमोर राहील अशी व्यवस्था करावी.

अभ्यासाचे वेळापत्रक

अ. क्र.


परीक्षेचा टप्पा


दिनांक


विषय


घटक


अभिप्राय


ब) तयारी

नियोजनानुसार दररोज नियमितपणे अभ्यास केल्यास ऐन परीक्षेच्या वेळी गोंधळ उडत नाही. त्यासाठी स्वयंअध्ययन व गटचर्चा ह्या दोन्ही पद्धती उपयुक्त आहेत. सध्या परीक्षांसाठी निगेटीव्ह मार्कींग पद्धत वापरली जात आहे. चुकीच्या उत्तरांसाठी गुण संख्या कमी केली जाते. त्यामुळे प्रत्येकाने सर्व विषयांच्या मूळ संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत. स्वत:च्या संक्षिप्त नोट्स काढायला हव्यात. त्यासाठी विविध रंगांचे पेन व तुलनात्मक तक्ते, आकृती, चित्रे, आलेख, नकाशे इत्यदींचा समर्पक वापर करायला हवा. इंटरनेटवरील चित्रफिती यांचाही वापर करता येईल. ज्ञानार्जन करतांना जेवढ्या जास्त ज्ञानेंद्रियांचा वापर होईल तेवढा अभ्यास रंजक होऊन ते दीर्घकाळ स्मरणातही राहील. तसेही मानवी मेंदू कोणतीही गोष्ट ही अक्षर रुपात नव्हे तर चित्र रूपातच लक्षात ठेवतो. उदा. आपण डोळ्यासमोर ढोरीें असे आणा म्हटले तर तशी अक्षरे डोळ्यासमोर येत नाहीत, त्याऐवजी लाल रंगाचे टोमेटो डोळ्यासमोर चित्ररुपात येते. अभ्यास करतानाही अशाच चित्र पद्धतीचा शक्य तेथे वापर करावा. आकडेवारी लक्षात ठेवण्यासाठी न्युमोनिक्स पद्धतीचा, सांकेतिक अक्षरे व अंक वापरण्याच्या पद्धतीचा वापर करता येईल. गंभीरपणे तयारी करणाऱ्या मित्रांचा गट तयार करून, प्रत्येकाला एक विषय किंवा घटक देवून त्यावर तयारी करून सर्वांसमोर वर्गासारखे शिकवणे, त्यावर प्रश्न-उत्तरे घेणे इ. माध्यमातूनही खूप चांगला अभ्यास होऊ शकतो. गप्पा मारणे या मूळ मानवी स्वभावानुसार अभ्यासाच्या,चालू घडामोडींच्या गप्पा मारणे यातूनही फावल्या वेळात अभ्यास होऊ शकतो. निगेटीव्ह मार्कींगचा फटका बसू नये व उत्तीर्ण होण्यासाठी केवळ ६० ते ७५ % गुणच आवश्यक आहेत त्यामुळे प्रश्नपत्रिका सोडवतांना साधारणत: तीन फेऱ्या कराव्यात. पहिल्या फेरीत हमखास उत्तर माहित आहे असेच प्रश्न सोडवावेत. दुसऱ्‍या फेरीत तर्क क्षमता वापरून व किमान ७५ % अचूक असण्याची खात्री आहे असेच प्रश्न सोडवावेत. वेळ व आवश्यकता असल्यासच तीसऱ्‍या फेरीत वरील प्रमाणे प्रश्न सोडवावेत. अशाप्रकारे प्रत्येकाने आपली गती, परिस्थती, उपलब्ध सुविधा यानुसार योग्य अभ्यास पद्धतीचा वापर करून तयारी करावी.

क) कामगिरी

बरेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा भरपूर अभ्यास करतात. मात्र ऐन परीक्षेच्या काळात किंवा त्या तीन तासात त्यांना अपेक्षित कामगिरी करता येत नाही. त्यांच्या सोबत किंवा मार्गदर्शनाखाली तयारी करणाऱ्या बऱ्याच जणांना पदेही मिळतात मात्र यांची अंतिम निवड होत नाही. गुणवत्ता असूनही कोठेतरी ते कमी पडतात व यशापासून वंचित राहतात. स्पर्धा परीक्षेसाठी परीक्षाभिमुख व ‘मार्क्सवादी’ दृष्टीकोन खूप महत्त्वाचा आहे. परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर अपेक्षित गुण मिळविणे व अंतिम निवड यादीत येणे हेच ध्येय प्रामुख्याने तयारी करतांना प्रत्येकाने डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन व आत्मविश्वास वाढीसाठीही आवर्जुन प्रयत्न करायला हवेत. परीक्षेपूर्वी उजळणी व पुरेसा प्रश्नपत्रिकांचा सराव करायला हवा. माझा संपूर्ण अभ्यास झाला आहे, अशी आदर्श अवस्था कधीही येणार नाही. त्याऐवजी निवडीसाठी आवश्यक एवढा माझा अभ्यास झाला आहे आणि माझी निवड हमखास होणारच असा आत्मविश्वास तयारीतूनच आपल्यात निर्माण व्हायला हवा.

३) योग्य मार्गदर्शन

केवळ स्पर्धा परीक्षाच नव्हे तर आयुष्यातील कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. तुमच्या अधिकारी होण्याच्या प्रवासातील खरे मार्गदर्शक म्हणजे मोजकी, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण पुस्तके,अनुभवी व प्रेरणादायी व्यक्ती आणि यशस्वी अधिकारी हे होत. काही दर्जेदार व गुणवत्तापूर्ण पुस्तकांची घटकानुसार यादी येथे सोबत दिलेली आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल तर क्लासेस, शिकवणी लावल्यास तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या अनुभवाचा अभ्यासासाठी नक्कीच फायदा होतो. यशस्वी अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट किंवा प्रेरणादायी व्याख्याने, लेख, पुस्तके यामधून तुमच्या ध्येयप्राप्तीसाठी तुम्हाला सकारात्मक ऊर्जा नक्कीच मिळते. आज विश्वास नागरे पाटील, राजेश पाटील, किरण गीते, संदीपकुमार साळुंखे, भारत आंधळे, रमेश घोलप, राजेंद्र भारुड इत्यादी अनेक अधिकाऱ्‍यांनी महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा जाणीव जागृती व यशस्वीतेच्या आत्मविश्वास निर्मितीसाठी अनमोल व भरीव कार्य केले आहे व करीत आहेत.

४) चालू घडामोडी

कोणत्याही स्पर्धा परीक्षांच्या पेपरमध्ये चालू घडामोडीवर आधारित प्रश्न मोठ्या प्रमाणावर असतात. एवढेच नव्हे विविध विषयांवर विचारल्या जाणारे प्रश्नही त्या विषयातील घटकांबाबत लगतच्या काळात घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडींवर आधारीतच असतात. शिवाय मुलाखतीमधील बरेच प्रश्नही चालू घडामोडींबाबत उमेदवाराची मते जाणून घेण्यासंदर्भात असतात. त्यामुळे चालू घडामोडींच्या तयारीसाठी नियमित पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे. दररोज किमान एक इंग्रजी, हिंदी किंवा मराठी राष्ट्रीय व राज्यस्तरीय दैनिकाचे (महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता इ.) वाचन आवश्यक आहे.अनावश्यक स्थानिक बातम्यांवर वेळ वाया न घालवता अभ्यासक्रमासंबंधी आवश्यक घटकांचेच वाचन करावे. दूरदर्शनच्या दररोजच्या बातम्याही घ्यायला हव्यात. सोबतच एक दर्जेदार साप्ताहिक (इंडिया टुडे, फ्रंटलाईन इ.) व एक मासिक (स्पर्धा परीक्षा, चाणक्य मंडल इ.), योजना, लोकराज्य यांचेही नियमित वाचन करावे. आपल्या सभोवती घडणाऱ्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय महत्त्वपूर्ण राजकीय, आर्थिक, सामाजिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक, खेळविषयक इत्यादी घटनांबाबत आपण जागरूक व दक्ष असले पाहिजे आणि त्याबाबत आपले स्वत:चे एक स्वतंत्र, सकारात्मक व संतुलित मतही असले पाहिजे. या सर्व बाबी नक्कीच आपल्या यशाला सहाय्यभूत ठरतात.

स्पर्धा परीक्षांमधून निवड होणारा अधिकारी हा संवेदनशील, प्रामाणिक, कार्यकर्ता व कोणत्याही बाबतीत तज्ज्ञ नसला तरीही चालेल, मात्र सर्व बाबतीत किमान आवश्यक ज्ञान असलेला असावा, अशी निवडकर्त्यांची अपेक्षा असते. त्यासाठी प्रत्येकाने आपला सर्वांगीण म्हणजेच बौद्धिक, शारीरिक, सांस्कृतिक व सामाजिक विकास कसा होईल याकडे कटाक्षाने व जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवे. बौद्धिक विकासासाठी नियमित वाचन व केलेल्या वाचनाचे चिंतन करणे आवश्यक आहे. सोबतच नियमित ध्यान करणेही उपयुक्त ठरते .शारीरिक विकासासाठी दररोज ३० मिनिटे व्यायाम, किमान एक खेळ व ३० मिनिटे योगा खूपच लाभदायक आहे. सांस्कृतिक व सामाजिक विकासासाठी प्रत्येकाने विविध उपक्रम, सण, उत्सव यांमध्ये सहभाग घ्यायला हवा. किमान एक आनंददायी व ऊर्जादायी छंद जोपासायला हवा. या सर्वांमधून खऱ्‍या अर्थाने सक्षम व विकसित भारत निर्माणासाठी आवश्यक सुजाण नागरिक निर्माण होईल व त्याचा निश्चितच आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी पदी निवड होण्यास हातभार लागेल.

चला तर माझ्या विकसित भारत निर्माणाचे खरे निर्मिक असलेल्या बंधू आणि भगिणींनो... उठा, जागे व्हा..... या यशाच्या राजमार्गावर पाऊल ठेवा..... आतापर्यंत सांगितलेल्या सर्व सूत्रांचे मनोभावे आचरण करा व एक संवेदनशील, प्रामाणिक व कार्यकर्ता अधिकारी होऊन भारत मातेच्या सेवेत स्वत:ला समर्पित करा !

- रश्मी तेलेवार वावगे,
comments