डेंग्यू रोखण्यासाठी उपाययोजना

05-02-2016 : 05:57:15
     2621 Views

राज्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव पाहता राज्य शासन आणि आरोग्य विभाग कसोशीने उपाययोजना करीत आहे. मात्र नागरिकांनीही आपली नैतिक जबाबदारी म्हणून डेंग्यूचा फैलावच होऊ नये यासाठी परिसर स्वच्छतेकडे लक्ष द्यायला हवे. डेंग्यू म्हणजे काय, तो कसा पसरतो, यावर उपाययोजना कोणत्या ? याविषयीची ही माहिती. . . . .
डेंग्यू म्हणजे काय :- डेंग्यू हा एक विषाणूमुळे होणारा आजार आहे. या विषाणूंचे चार उपप्रकार आहेत. एडीस इजिप्ती व एडीस अलबोपिक्टस या डासांच्या चाव्यामुळे हा रोग पसरतो. डेंग्यू हा सामान्यत: एक आपोआप बरा होणारा रोग आहे. बहुतांश रूग्ण बरे होतात. या रोगाची अभिव्यक्ती सामान्य (क्लासिकल) डेंग्यू ताप, डेंग्यू रक्तस्त्रावी ताप व शॉकसह डेंग्यू रक्तस्त्रावी ताप अशा तिन प्रकारे होऊ शकते.
डेंग्यूचे प्रमाण का वाढते आहे :- वाढते शहरीकरण, जीवनशैलीतील बदल व सदोष जल व्यवस्थापनामुळे डासांच्या पैदाशीला मिळणारे प्रोत्साहन यामुळे भारतात गेल्या काही वर्षामध्ये डेंग्यूचे प्रमाण वाढले आहे. दरवर्षी पावसाळा संपला की डेंग्यूच्या प्रमाणात वाढ होते व साथी येतात. तसा हा रोग थोड्या प्रमाणात वर्षभर आढळून येतो. भारताची ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये डेंग्यूचे रूग्ण नियमितपणे आढळून येतात. रूग्ण मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण २०११ मध्ये ०.६५% इतके होते. २००८ मध्ये देशात डेंग्यूचे १२५६१ रूग्ण होते व त्यापैकी ८० मरण पावले. हे प्रमाण २०१३ मध्ये ७५८०८ रूग्ण व १९३ मृत्यू इतके वाढले. यावर्षी सप्टेंबर अखेरीस देशात डेंग्यूचे १३९११ रूग्ण आढळले असून त्यापैकी ३७ मृत्यूमुखी पडले आहेत. महाराष्ट्रात २००८ मध्ये डेंग्यूचे ७४३ रूग्ण आढळले व त्यापैकी २२ मरण पावले. हे प्रमाण २०१३ मध्ये ५६१० रूग्ण व ४८ मृत्यू इतके वाढले. यावर्षी सप्टेंबरपर्यंत २९९७ व्यक्तींना डेंग्यू झाला व त्यापैकी ७ मृत्यूमुखी पडले.
डेंग्यूची साथ का येते :- डेंग्यूची साथ येण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. विषाणूचा प्रकार, डासांची संख्या व त्यांची वर्तणुक, रोगबाधित होण्याची व्यक्तींमधील संभाव्यता व पूर्वी डेंग्यू विषाणू संसर्ग न झालेले लोकसमूह आदी घटक यासाठी कारणीभूत असतात.
डेंग्यूची लक्षणे काय आहेत :- बहुतांश लोकांमध्ये डेंग्यूच्या संसर्गामुळे ताप हे लक्षण दिसून येते. शिशू, मुले व पहिल्यांदाच डेंग्यूची लागण होणाऱ्या प्रौढांमध्ये इतर विषाणूजन्य रोगात येणाऱ्या तापाप्रमाणेच ताप येतो. रूग्ण बरा होतानाच्या काळात किंवा तापासोबत अंगावर पुरळही येऊ शकते. यासोबतच श्वसनसंस्था व पचनसंस्था यांच्याशी संबंधीत रोग लक्षणेही आढळून येतात. क्लासिकल डेंग्यू तापाचा अधिशयन कालावधी ५ ते ६ दिवस असतो. तो कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो. सामान्यपणे थंडी वाजून खूप ताप येणे, तीव्र डोकेदुखी, स्नायू दुखी, सांधेदुखी ही लक्षणे दिसतात. स्नायू व सांधेदुखीमुळे व्यक्ती हालचाली करू शकत नाही. नंतरच्या चोवीस तासात डोळे दुखायला लागतात व व्यक्तीला उजेड सहन होत नाही. खूप थकवा येणे, भूक न लागणे, बध्दकोष्ठ, पोटात कळ येणे, जांघेत ओढल्यासारखे दुखणे, घसा खवखवणे, नैराश्य येणे आदी लक्षणेही दिसून येतात. ताप ५ दिवस राहतो व नंतर रूग्ण पूर्णपणे बरा होतो. रूग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता अतिशय कमी असते. डेंग्यू रक्तस्त्रावी ताप हा डेंग्यूचा गंभीर प्रकार आहे. सुरूवातीच्या काळात याची लक्षणे क्लासिकल डेंग्यूप्रमाणेच असतात. परंतू विशिष्ट प्रकारचे पुरळ मात्र सहसा येत नाही. ताप ४० ते ४१ डिग्री सें.पर्यंत वाढतो व बालकांमध्ये तापामुळे झटके येऊ शकतात. या प्रकारात केशनलिकांमधून रक्तद्रव बाहेर पडून गुंतागुंत निर्माण होऊ शकतात. या प्रकारच्या डेग्यूमुळे काही रूग्ण मृत्यूमुखी पडतात. तिसऱ्या प्रकारात ताप, रक्तस्त्राव तसेच शॉक या तिन्ही बाबी आढळून येतात. या तीव्र डेंग्यूमध्ये केशवाहिन्यातून रक्त द्रवाची गळती झाल्याने शॉकची लक्षणे दिसून येतात. श्वसनाला त्रास होतो. गंभीर रक्तस्त्राव होतो किंवा विविध इंद्रिये निकामी होतात. सुमारे २ ते ४ % रूग्णांना या प्रकारचा डेंग्यू होतो.
कोणत्या व्यक्तींमध्ये डेंग्यूच्या गुंतागुंती होण्याची जास्त शक्यता असते :- डेंग्यू हा साधा आजार आहे पण काही व्यक्तींमध्ये तो गंभीर रूप धारण करण्याची किंवा त्यात गुंतागुंती निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. अशा व्यक्तींमध्ये बालके व वृध्द, लठ्ठ व्यक्ती, गरोदर स्त्रिया, जठर वा आतड्यातील व्रणांचे रूग्ण, मासिक पाळी चालू असणाऱ्या स्त्रिया, थॅलॅसीमीयासारख्या रोगांचे रूग्ण, जन्मजात हृदय विकाराचे रूग्ण, स्टिरॉईड औषधी घेणारे रूग्ण तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा आदी जुनाट आजारांचे रूग्ण यांचा समावेश होतो. साहजिकच अशा व्यक्तींना डेंग्यू झाला तर त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण अधिक असते.
डेंग्यूवर उपचार किंवा लस आहे का :- डेंग्यूचे वर्णन वाचल्यावर लक्षात येईल की तो एक सर्वसाधारण आजार असून क्वचितप्रसंगी गंभीररूप धारण करू शकतो. त्यामुळे अनावश्यक घाबरण्याचे कारण नाही. डेंग्यूवरील उपचार हे लक्षणानुरूप आहेत. विषाणू मारण्यासाठी प्रभावी औषधे नाहीत. डेंग्यूचा प्रतिबंध करण्यासाठी लसही उपलब्ध नाही. यामुळे निराश व्हायची गरज नाही कारण जसा डेंग्यू कोणालाही होऊ शकतो तसेच त्याचा प्रतिबंधही कोणतीही व्यक्ती सहज करू शकते.
डेंग्यूचे नियंत्रण कसे करता येईल :- डेंग्यूचा विषाणू तर पर्यावरणात राहणारच. पण एडीस डासांचा बंदोबस्त करून किंवा ते डास आपल्याला चावणार नाहीत यासाठी उपाययोजना करून आपण डेंग्यूपासून आपला बचाव करू शकतो. काळ्या शरीरावरील पांढऱ्या पट्टयांमुळे एडीस डास इतर डासांपासून पटकन ओळखता येतो. याला ढळसशी र्चेीीिंळीें असेही नाव आहे. पाण्याच्या कृत्रिम अर्थात मानवनिर्मित साठवणीच्या ठिकाणी या डासांची पैदास होते. घर वा घराभोवतीच्या अशा साठलेल्या पाण्यात या डासांची पैदास होते. फुटके डबे, बाटल्या, फेकलेल्या बादल्या, फ्लॉवर पॉट, नारळाची करवंटी, मातीची भांडी, झाडातील पोकळ्या, पडलेले टायर अशा अनेक ठिकाणी पाणी जमा होते व त्यात हा डास अंडी घालतो. या डासाची मादी सहसा दिवसा चावे घेते. हा डास खूप दूरवर उडू शकत नाही. त्याचा पल्ला सुमारे १०० मीटरचा असतो. यामुळे या डासांचे निर्दालन करणे सोईचे जाते. अळ्या मारणारी व प्रौंढ डासांना मारणारी किटकनाशके फवारूनही डासांचा नायनाट करता येतो.
सर्वसामान्य नागरिकांची काय जबाबदारी आहे :- वरील उपाय हे नगरपालिका वा दुसऱ्या कोणी करायचे असे सर्वसामान्य लोकांना वाटत असते. पण वर वर्णन केलेली पाणी साठण्याची ठिकाणे नष्ट करणे आपल्याच हातात आहे. याखेरीज डासांनी चावे घेऊ नये यासाठी डासविरोधी मलम अंगाला लावणे, मच्छरदाणीचा वापर करणे, अंगभर कपडे घालणे आदी उपाय तर नक्कीच करता येतील. शिवाय वैयक्तिक, घरातील व घरासभोवतालची स्वच्छता ठेवल्यास डेंग्यू व अस्वच्छतेमुळे होणारे इतर अनेक आजार आपण सहज टाळू शकू. माननीय पंतप्रंधानांनी स्वच्छ भारत अभियान सुरू करून त्या दिशेने महत्वाकांक्षी पाऊल टाकले आहे. दरवर्षी येणाऱ्या डेंग्यूचा बिमोड करायचा असेल तर स्वच्छता अंगी बाळगण्याचा उपक्रम सर्वांनाच स्वीकारावा लागेल !
- जिल्हा माहिती कार्यालय, बीड
comments