स्वबळाची खुमखुमी

20/09/2014 8 : 56
     656 Views

तहान लागल्यानंतर विहीर खणायला जावे त्याप्रमाणे महाराष्ट्रातील शिवसेना-भाजपा युतीचे आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे नेते सध्या जागा वाटपासाठी चर्चेचे गुऱहाळ घालण्यात मग्न झाले आहेत. स्वबळाची भाषा राज्यात सगळेच प्रमुख पक्ष दंड थोपटून करीत असले तरी प्रत्यक्षात यापैकी कोणताही एखादा पक्ष स्वबळावर बहुमत मिळविण्याची खात्री देऊ शकतो असे वाटत नाही. भाजपा आणि शिवसेना युती ही गेल्या दोन दशकांपासून कायम राहिली आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या अनेक निवडणुका युतीच्या झेंडय़ाखाली एकत्र लढवूनदेखील प्रत्येक निवडणुकीपूर्वी भाजपा आणि शिवसेना या दोन पक्षात जागा वाटपाच्या मुद्यावर आव्हाने प्रति आव्हाने सुरू असतात. दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते न बोलता जागा वाटपाची कोडी सोडवीत राहतात अन् तोपर्यंत वेळ घालविण्यासाठी दुसऱया तिसऱया फळीतील नेतेमंडळी ‘शेंडी तुटो वा पारंबी’ या उक्तीची प्रचिती देण्याची भाषा करीत पक्षातील कार्यकर्त्यांच्या अस्मिता जागवण्याचा खटाटोप करतात. जागा वाटपावरून भाजपा-शिवसेना युतीतील घटक पक्षात जुंपलेले असताना त्याचा आनंद घेण्यास दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या नेतेमंडळींनाही सवड मिळत नसावी. युतीपेक्षाही तुंबळ संघर्ष या आघाडीत अगदी उमेदवाऱया मागे घेण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत किंवा क्वचित ठिकाणी त्यानंतरही सुरू राहतो. जागा वाटपाचा घोळ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत प्रत्यक्ष प्रचारकार्य सुरू होत नसले तरी स्वबळाची भाषा करीत आव्हाने-प्रतिआव्हाने देणारे आणि त्यांचे पक्ष प्रकाशझोतात राहतात. जाहिरातींवर एक पैसादेखील खर्च न होता आपसूक होणारी जाहिरात त्या त्या पक्षातील कार्यकर्त्यांना जागे करण्यासाठी किंवा त्यांच्यात ईर्षा निर्माण करण्याच्या दृष्टीने अधिक प्रभावी ठरत असावी. गेल्या अनेक निवडणुकांपासून युती आणि आघाडीतील जागावाटप हाच एकंदर निवडणूक प्रक्रियेतील सर्वात गंभीर, नाजूक आणि महत्त्वाचा टप्पा मानला जातो. मुंबईच्या लोकलमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी इच्छुक असलेले प्रवासी जसे खूपशी लठ्ठालठ्ठी आणि बरीचशी धक्काबुक्की करीत गाडीत प्रवेश मिळवितात आणि एकदा प्रवेश मिळाला की नंतर ‘जणू काही घडलेच नाही’ अशा थाटात शिस्तीत वागून गर्दीतही प्रवासाचा आनंद घेतात, त्याप्रमाणेच प्रत्यक्ष जागावाटप होईपर्यंत घटकपक्षात परस्परांविरुद्ध ‘गु।़र्र गु।़र्र म्यँव म्यँव’ चालू राहिले तरी एकदा का जागा वाटप झाले की नंतर वेगवेगळे आवाज काढायला वावच राहात नाही. प्रत्येक निवडणुकीप्रमाणेच येत्या विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून युती आणि आघाडीतील नेतेमंडळी इरेला पेटलेली दिसून येत असली आणि जो तो स्वबळाचे दंड थोपटू लागला असला तरी ‘सरडय़ाची धाव कुंपणापर्यंतच’ असेल यात शंकाच नाही. युतीतील भाजपाला आता शिवसेनेइतक्याच समान संख्येने जागा हव्या आहेत. त्याचप्रमाणे आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसलाही समान भागीदारी हवी आहे. यापूर्वीच्या निवडणुकात कोणत्या पक्षाला किती जागा सोडल्या, जागा वाटपाचे प्रमाण कोणते होते याचा विचार करीत न राहता सध्याच्या स्थितीतील पक्षबळाचा विचार जागा वाटपासाठी व्हायला हवा, असे भाजपाचे म्हणणे आहे, तर यापूर्वी युती स्थापन करताना वाजपेयी, अडवाणी-बाळासाहेब ठाकरे यांनी जे प्रमाण निश्चित केले तेच अंतिम असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. या दोन पक्षात यापूर्वीही अनेकदा संघर्ष विकोपाला पोहोचण्याची स्थिती निर्माण झाली होती. तथापि, जोपर्यंत प्रमोद महाजन यांच्यासारखा समंजस नेता हयात होता तोपर्यंत युतीतील सारे संघर्ष वेळीच संपुष्टात यायचे. आता प्रमोद महाजनही राहिले नाहीत आणि युतीवर ज्यांची हुकूमत चालायची ते सेनाप्रमुखही राहिले नसल्याने आव्हान-प्रतिआव्हानांवर कोणताच अंकुश दिसून येत नाही. जोपर्यंत भाजपा आणि शिवसेना एकत्रपणे निवडणुकांना सामोरे जातील तोपर्यंतच एक समर्थ पर्याय म्हणून ते जनतेच्या नजरेसमोर उभे राहू शकतात. हे पक्ष परस्परांच्या विरोधात निवडणुका लढवू पाहतील तर त्यांचा फायदा त्यांच्यापैकी कोणालाही न होता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीलाच होऊ शकतो. दोन्ही पक्षांना स्वबळाची खुमखुमी आल्याचे चित्र सध्या दिसत आहे. तथापि, प्रत्यक्षात ही खुमखुमी पोकळ ठरू शकते याची जाणीवही या नेतेमंडळींना असावी. लोकसभेसाठी भाजपा अधिक जागा तर विधानसभेसाठी शिवसेनेला अधिक जागा सोडायच्या असे युती स्थापन होताना ठरले होते. त्यानुसार गेल्या काही निवडणुकात जागावाटप होत असले तरी बदलत्या राजकीय स्थितीनुसार या वाटप प्रमाणात बदल व्हावा असे भाजपाचे म्हणणे आहे. पूर्वी भाजपाला लोकसभेच्या २८ जागा दिल्या जायच्या अन् शिवसेना २० जागा लढवायची. आताच्या स्थितीत या प्रमाणातही बदल झाला आहे, तसाच बदल विधानसभेच्या जागा वाटपात व्हावा अशी भाजपाची मागणी असली तरी ही मागणी ताणून धरणे भाजपाच्या हिताचे ठरणार नाही. विविध राज्यातील पोटनिवडणुकांचे निकाल लक्षात घेता भाजपाने स्वबळाच्या भाषेला थोडा आवर घालणेच शहाणपणाचे ठरू शकते. अर्थात शिवसेनेलाही हाच नियम लागू शकतो. स्वबळाची भाषा जेवढी भाजपाला त्रासदायक ठरू शकते तेवढीच शिवसेनेच्या दृष्टीनेही ती फारशी हिताची नाही. शिवसेना किंवा भाजपा यापैकी कोणताही पक्ष महाराष्ट्राच्या सर्व भागात सारखाच प्रभावी ठरण्याच्या क्षमतेचा नाही. दोन्ही पक्षांची बलस्थाने किंवा प्रभावक्षेत्रे आहेत तिथे हे दोन्ही पक्ष परस्परांविरोधात उभे राहिल्यास होणाऱया मतविभागणीचा फायदा तिसऱयालाच होऊ शकतो. आजवर अनेकवेळा हे सिद्ध झाले आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांना याची जाणीव असूनही हे स्वबळाची भाषा करीत असतील तर त्यामागे केवळ अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यापेक्षा अन्य कोणता हेतू असू शकेल असे वाटत नाही. युतीप्रमाणेच आघाडीतदेखील जागा वाटपावरून कुरबूर सुरू आहे. अर्थात या कुरबुरी परस्परांवर कुरघोडी करण्याच्या हेतुपुरत्याच मर्यादित असू शकतात. अखेर ‘तुझे माझे जमेना, तुझ्यावाचून करमेना’ हेच सत्य मानून युती किंवा आघाडीतील घटक पक्षांसमोर निवडणुकांना एकत्र सामोरे जाण्यावाचून पर्याय असणार नाही, हेही तेवढेच खरे!
साभार
दै.तरूण भारत
comments