शेतीसंवादाची महाकृषी संचार सेवा

05/08/2014 20 : 29
     660 Views

शेतक-यांना कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी त्यांच्याशी कमी खर्चात व सवलतीच्या दरात मोबाईलव्दारे संपर्क साधणे सोईचे व्हावे, तसेच कृषी हवामान विषयक सल्ला, खते, बी-बियाणे यांची उपलब्धता व गुणवत्ता व कृषी विभागाच्या योजना, उपक्रमांची माहिती तात्काळ व कमी खर्चात शेतकऱ्यांना देणे सोयीचे व्हावे म्हणून भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) यांच्याबरोबर कृषी विभागाने सामंजस्य करार करुन महाकृषी संचार मोबाईल सीयुजी सेवा-३ ही सवलतीच्या दरांचे सिमकार्ड देणारी योजना पुन्हा उपलब्ध करुन दिली आहे. या योजनेची माहिती देणारा हा लेख.
आपल्या सर्वांच्या अन्नविषयक गरजांची पूर्तता करणारा शेतकरी आणि त्याची शेती अधिक समृध्द आणि प्रगतीशील व्हावी यासाठी विविध माध्यमातून शासन प्रयत्न करीत असते. कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी हे क्षेत्रीय पातळीपर्यंत कार्यरत आहेत. त्यांच्याशी सध्याच्या पध्दतीनुसार संपर्क करणे शेतक-यांना खुप अडचणीचे व खर्चिक आहे. क्षेत्रीय पातळीवरील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी कमी खर्चात व सवलतीच्या दरात संपर्क साधणे सोईचे व्हावे, तसेच राज्यातील सर्व शेतकरी, पुरस्कारप्राप्त शेतकरी, गटशेती करणारे शेतकरी व समुह शेती करणारे शेतकरी यांच्याशी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सातत्याने संपर्कात राहणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांना कृषी हवामान विषयक सल्ला, खते, बी-बियाणे यांची उपलब्धता व गुणवत्ता इत्यादी बाबत असणाऱ्या अडचणी व कृषी विभागाच्या योजना, उपक्रमांची सुचना व सल्ला इत्यादींची माहिती तात्काळ व कमी खर्चात देणे सोयीचे व्हावे तसेच शेतकऱ्यांनी कृषी व संलग्न विभागाशी संपर्क व संवाद साधणे सोपे व कमी खर्चाचे व्हावे, ही बाब लक्षात घेवून भारत संचार निगम लिमिटेड यांच्याबरोबर कृषी विभागाने सामंजस्य करार करुन महाकृषी संचार मोबाईल सीयुजी सेवा योजना नव्याने पुन्हा उपलब्ध करुन दिली आहे.
महाकृषी संचार मोबाईल सीयुजी सेवा योजनेची पहिल्या टप्प्याअंतर्गत जवळपास ७ लाख ५० हजार अधिकारी,कर्मचारी आणि शेतकरी यांना सेवा देण्यात येवून बीएसएनएलने तांत्रिक कारणामुळे नवीन नोंदणी बंद केली होती. त्यानंतर दुस-या आणि आता तिस’ ्ष-या टप्प्यात ही योजना सुरू करण्यात आली आहे.
भारत संचार निगम लिमिटेड व कृषी विभागाकडे शेतकऱ्यांकडून योजना पुन्हा नव्याने सुरु करण्याबाबत सातत्याने विचारणा होत होती त्यानूसार भारत संचार निगम लिमिटेडने नव्याने महाकृषी संचार सीयुजी मोबाईल सेवा सुरू केली. प्रिपेड सेवा प्लॅनचे दर हे पुर्वीच्या महाकृषी संचार या उपक्रमाच्या दराएवढेच आहेत. तथापि या प्लॅन मध्ये उपलब्ध सुविधांमध्ये बदल केलेला आहे. या अंतर्गत भारत संचार निगम लिमिटेड कडून शेतकऱ्यांसाठी प्रिपेड सेवा प्लॅनची सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. कृषी खात्यातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि त्यांच्या कुटूंबीयांना प्लॅन उपलब्ध करण्यात येत आहे.
नवीन सेवेस महाकृषी संचार ३ सीयुजी मोबाईल सेवा असे संबोधण्यात येत आहे. महाकृषी संचार -३ यांच्यामधील सदस्यांच्या भ्रमणध्वनी व संपर्क सुविधा विनामुल्य असतील. सीयुजी सेवा उपक्रमामध्ये शेतकरी, शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी यांना संपुर्ण राज्यात एकमेकांशी भ्रमणध्वनीद्वारे मोफत संपर्क साधता येईल तसेच त्यांचे कुटूंबातील व्यक्तींना या उपक्रमात सहभागी होता येईल. या उपक्रमामधील सहभाग ऐच्छिक आहे भारत संचार निगम लि. ने दिलेले दर विनामुल्य सुविधा इत्यादीबाबत त्यांनी आयुक्तालयास प्रस्ताव सादर केलेला आहे. यामधील प्रमुख बाबी पुढील प्रमाणे आहेत. प्रिपेड प्लान मासिक भाडे रु.१०८ आहे. सीयुजी अंतर्गत सर्व कॉल मोफत असतील. सीसुजी व्यतिरिक्त इतर नेटवर्क कॉल १०० मिनिट व बीएसएनएल नेटवर्क ३०० मिनीट मोफत, ३०० एसएमएस मोफत व २०० एमबी मर्यादेपर्यंत डाटा युसेज मोफत व सेवाकर अतिरिक्त आहे. सविस्तर उपलब्ध सुविधा व शुल्काच्या तपशीलासाठी प्लॅन पहावा.
बीएसएनएल कंपनीसोबत या उपक्रमांतर्गत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या योजनेमध्ये कृषी विभागाची भुमिका फक्त कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी यांना विशेष सवलतीच्या दरात भ्रमणध्वनी व सीयुजी सेवा सुविधा उपलब्ध करुन देणे यासाठी मर्यादीत आहे. या उपक्रमाअंतर्गत सहभागी होणारे अधिकारी, कर्मचारी, कुटूंबातील व्यक्तीं व शेतकऱ्यांनी ही सेवा स्विकारल्यानंतर त्याबाबतचे सर्व देयके त्यांनीच भरावयाचे आहे. अर्जा सोबत कंपनीने निश्चती केलेली रक्कम जमा करावयाचे आहेत. ही रक्कम पाहिल्या देयकामध्ये समायोजित करण्यात येते. भ्रमणध्वनी सेवा घेण्यासाठी व कार्यान्वीत करण्यासाठी आवश्यक असणारे ओळखपत्र , ओळखीचा पुरावा, रहिवाशी पुरावा, रहिवाशी बाबतचा पुरावा व फोटो हे स्वत: या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तीने उपलब्ध करुन द्यावयाचा आहे. बीएसएनएल कंपनीचे भ्रमणध्वनी क्रमांक जर अगोदर अधिकारी, कर्मचारी व शेतकरी यांच्याकडे असतील तर त्यांना पुन्हा नवीन क्रमांक घेण्याची आवश्यकता नाही असे क्रमांक या योजनेत समाविष्ठ होवू शकतील फक्त प्रिपेड प्लॅनचे सिम कार्ड बदलेल. बीएसएनएल कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नियोजन करावे.
राज्यात सर्वदूर या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता यावा या दृष्टीने भारत संचार निगम लिमिटेड यांच्या मुलभूत सुविधा विचारात घेवून सर्व जिल्ह्यांना समान कनेक्शनचा लक्ष्यांक देण्यात येत आहे. सदरचा प्रकल्प मर्यादेत राबविण्यात येत आहे. महाकृषी संचार-३ सीयुजी मोबाईल सेवा सभासद करण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांशी कृषी विषयक सल्ला सेवेसाठी सहमती घेणे व त्याबाबतचा विहीत डाटा बेस कृषी विभागास देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तालुका कृषी अधिकारी शेतक-यांना सभासत्वाकरिता संमतीपत्रक, प्रमाणपत्र देतांना महाकृषी एस.एम.एस सेवेत नोंदणी करणेकरीता सहमती अर्ज भरुन घेण्यात येतो. तालुका स्तरावर सीयुजी सभासदांचे पिक निहाय गट तयार करुन या शेतकऱ्यांना पिकांविषयी, योजनांविषयी आवश्यकतेनुसार मार्गदर्शन देण्याकरीता कृषि विभागांतर्गत, कृषि विद्यापीठातंर्गत पिकनिहाय तज्ञांची निवड करण्यात येत आहे. या तज्ञांचा मोबाईल नंबर प्रसिध्दीस देण्यात येतो. त्याच प्रमाणे संबंधीत तज्ञांचा मोबाईल क्रमांक कार्यक्षेत्रातील सर्व सीयुजी सभासदांना महाकृषी एसएमएस सेवेद्वारे पाठविण्यात येतो. या प्रमाणे प्रत्येक तालुक्यात किमान पाच गट व पाच तज्ञांची निवड करण्यात येते.
या उपक्रमात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्वेच्छेने सहभागी होण्यासाठी बीएसएनएल कंपनीच्या सेवा केंद्राशी किंवा कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून माहिती घ्यावी. नवीन महाकृषी संचार सीयुजी मोबाईल सेवा-३ ही योजना ७ ऑगस्ट २०१४ पर्यंत मर्यादीत आहे. शेतक-यांनी मुदतीत आपला अर्ज करुन सवलतीचे सिम कार्ड प्राप्त करुन घ्यावेत आणि या संवादाच्या महाप्रक्रियेचे एक घटक बनून आपली शेती अधिक समृध्द आणि उन्नत करण्यासाठी पुढाकार घ्यावा हीच अपेक्षा.

- अनिल आलुरकर
जिल्हा माहिती अधिकारी, बीड
comments