अनुसूचित जाती व नवबौध्द घटकासाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण योजना

2016-03-09 16:49:09
     226 Views

बीड
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील मुलामुलींसाठी सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण ही योजना राबविली जाते. हे प्रशिक्षण देण्यासाठी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, हनुमान नगर, अमरावती या संस्थेची निवड करण्यात आली असून योजनेअंतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी हा तीन महिन्याचा आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील मुलामुलींसाठी सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेण्यासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. उमेदवार हा महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असावा, उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्ष असावे, उमेदवाराची उंची पुरुष १६५ से.मी. व महिला १५५ से.मी. असावी, पुरुष उमेदवारांसाठी छाती न फुगविता ७९ से.मी.(फुगवून ८४ से.मी.) असावी, उमेदवारांची शैक्षणिक पात्रता इयत्ता १२ वी उत्तीर्ण असावा, उमेदवार हा शारिरीकदृष्ट्या निरोगी व सक्षम असावा.
उमेदवारांनी अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. उमेदवाराचा शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र (सक्षम प्राधिकाऱ्याचे), रहिवाशी प्रमाणपत्र, स्वत:चे दोन पासपोर्ट साइज फोटो, सेवायोजना कार्यालयाकडे नोंदणी केली असल्यास नोंदणी क्रमांक छायाप्रत, उमेदवाराच्या ओळखपत्राची साक्षांकित सत्यप्रत, उमेदवार शारिरीकदृष्ट्या निरोगी व सक्षम असावा, या प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिने असून ते निवासी स्वरुपाचे असेल. प्रशिक्षण कालावधीत उमेदवाराची निवासाची व भोजनाची सोय संबंधित संस्थेमार्फत मोफत करण्यात येईल, प्रशिक्षणासाठी निवड झाल्यानंतर प्रशिक्षण ठिकाणी उमेदवारास स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल त्यासाठी कोणताही प्रवास भत्ता दिला जाणार नाही, प्रशिक्षण कालावधीत उमेदवारास प्रशिक्षण अर्धवट सोडून जाता येणार नाही. प्रशिक्षण अर्धवट सोडून गेल्यास त्याच्यावर करण्यात आलेला खर्च संबंधित उमेदवाराकडून वसूल करण्यात येईल.
हे प्रशिक्षण गुरुवार दि.१० मार्च २०१६ पासून सुरु होणार असल्याने योग्य व पात्र उमेदवारांनी दि.१५ मार्च २०१६ पूर्वी आवश्यक कागदपत्रासह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नगर रोड, बीड येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन रवींद्र शिंदे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बीड यांनी केले आहे.
comments