बीड येथे पत्रकारिता अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु

13-05-2016 : 01:04:05
     231 Views

आज एकाही भारतीय प्रेक्षक व वाचकाचा दिवस हा वृत्तपत्र व दूरचित्रवाणीवरील बातम्या पाहिल्याखेरीज जात नाही. प्रादेशिक पत्रकारितेचे सातत्याने विस्तारणारे क्षेत्र हे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांसाठी एक नवं आव्हान म्हणून खुणावत आहे. यात हर तऱ्हेच्या विपुल संधी उपलब्ध आहेत.
बीड येथील वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयात कोणत्याही शाखेतुन बारावी उत्तीर्ण विद्याथ्र्यांसाठी बीए पत्रकारिता आणि जनसंवाद, कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्र्तीण असल्यास एमए पत्रकारिता आणि जनसंवाद, पत्रकारिता पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश सुरु झाले आहेत.

महाराष्ट्राचा विचार केला असता सर्वात आधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पत्रकारिता आणि जनसंवाद विषयीचे पदव्युत्तर शिक्षण उपलब्ध करून देण्यात आले. नंतरच्या काळात पुणे, नागपूर, जळगाव, नांदेड, येथील विद्यापीठांनी सुद्धा हा अभ्यासक्रम सुरू केलेला दिसतो.
वसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड येथील पत्रकारिता आणि जनसंवाद अभ्यासक्रमात माध्यम सिद्धांत, बातमीदारी, संपादन, माध्यम समीक्षण, जनसंपर्क आणि जनसंवाद, शोधपत्रकारिता, जनसंपर्क क्षेत्रातील संशोधन, ग्राफिक डिझायनिंग, जाहिरात सिद्धांत, दूरचित्रवाणी अभ्यास, चित्रपट अभ्यास, माध्यम कायदे, माध्यम संस्थांचा अभ्यास, आंतरराष्ट्रीय जनसंपर्क, माध्यम अर्थशास्त्र, माध्यम निर्मिती, माध्यम आणि संस्कृती, विकास संवाद, जाहिरात संवाद आणि व्यवस्थापन, विपणन, माध्यम नियोजन, या विविध विषयांचा यामध्ये समावेश होतो.

खाजगी आणि सरकारी दोन्ही क्षेत्रांत समसमान संधी पदवीचे शिक्षण आणि पदव्युत्तर शिक्षण यामध्ये जो फरक आहे तो यामध्ये असलेल्या रोजगाराच्या संधीचा. या संधी बघत असताना खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही क्षेत्रांतील संधी बघितल्या जातात. जेव्हा आपण सरकारी क्षेत्राचा विचार करतो तेव्हा शासनाच्या विविध विभागाचे जनसंपर्क अधिकारी, मंत्रालयातील माहिती संचालक जिल्हाधिकारी, क्षेत्रीय प्रचार कार्यालय इत्यादी सर्व ठिकाणच्या नेमणुका या पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होतात तसेच प्रसार भारती महामंडळाच्या बहुतांश जागेवरती नेमणूक करताना पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षणाला प्राधान्यक्रम दिला जातो. म्हणूनच हे शिक्षण महत्त्वाचे आहे. खाजगी क्षेत्रांमध्ये, विविध क्षेत्रांमध्ये जनसंपर्क अधिकारी असावाच यासाठी आग्रह असतो किंवा कॉर्पोरेट कम्युनिकेशन याला आजकालच्या काळात खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. माध्यम क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेणा-यांना ही संधी आपोआपच उपलब्ध होते. याखेरीज पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर स्वत:चा व्यवसाय करणे आणि तो माध्यम क्षेत्राशी निगडित करणे या संधी उपलब्ध असतातच.

यामध्ये मुख्यत: माध्यम क्षेत्रातील ज्या काही विविध संधी आहेत. उदा. चित्रपट, टेलिव्हिजन, मुद्रित माध्यमे, इंटरनेट, इत्यादी सर्वाशी संबंधित विद्यार्थी स्वत:चा व्यवसाय उभारू शकतात. यात एखाद्या क्षेत्राशी निगडित त्या क्षेत्राला पुरवठा करणारा संबंधित व्यवसाय असेल किंवा स्वत: निर्मिती करणे असेल या सर्व गोष्टी आल्याच. यामध्ये चित्रपट निर्मिती, मालिका निर्मिती, विविध निर्मिती संस्था किंवा जाहिरात संस्था या सगळ्यांमधून हे विद्यार्थी स्वत:ला सिद्ध करू शकतात. वेगवेगळ्या अनेक अभ्यासक्रमानंतर ज्या वेळेला पदव्युत्तर शिक्षण माध्यमाच्या मार्फत घेतले जाते तेव्हा त्या दोन्हीचा मिळून दुग्धशर्करा योग आपल्याला दिसून येतो. उदा. ग्राफिक डिझाईन किंवा जाहिरात क्षेत्रात आधी ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स केला किंवा वाणिज्यचे पदवी शिक्षण घेतले आणि नंतर माध्यमातून पदव्युत्तर शिक्षण घेतले असले तरीसुद्धा व्यावसायिक वाटचाल होऊ शकते. या संधीमध्ये तांत्रिक आणि मानवी अशा दोन बाजू आपल्याला बघाव्या लागतात. यामध्ये मानवी बाजू बघत असताना स्वत:चे उपजत जे कलागुण असतात किंवा विविध विद्यार्थ्यांमध्ये कलात्मक दृष्टिकोनातून ज्या काही गुणांचा विकास केला जातो त्यांना संधी दिली जाते. उदा. कलादिग्दर्शक असेल, छायाचित्रकार असेल, किंवा दिग्दर्शक असेल, अभिनय क्षेत्रातील संधी असतील या सर्व संधी यातल्या मानवी बाजू म्हणून बघता येतील. जेव्हा आपण तांत्रिक बाजूंचा विचार करतो. त्यावेळी ग्राफिक डिझायनर, चित्रपट संकलक या सगळ्यांचा विचार आपल्याला येथे करावा लागतो. त्याचप्रमाणे तांत्रिक बाजूमध्ये कोणत्याही एखाद्या माध्यमाशी निगडित, कोणत्याही एखाद्या चित्रपट निर्मिती किंवा टीव्हीसाठी मालिका निर्मिती हे करत असताना त्यातले जे काही इतर घटक असतात, त्या घटकांमध्ये सुद्धा पदव्युत्तर शिक्षण घेतलेला विद्यार्थी आपला सहभाग नोंदवू शकतो. यासाठी कारण म्हणजे पदव्युत्तर शिक्षण घेत असताना विविध विषय. या विषयांमध्ये मुख्यत: माध्यम संशोधनावरती जास्त लक्ष केंद्रित केलेले दिसते. आणि दोन वेगवेगळ्या विभागातून माध्यम संशोधन दिले जाते. याच्या मागे हे कारण आहे की जगात माध्यम क्षेत्रात सर्वात जास्त संधी ज्या उपलब्ध आहेत. त्या माध्यमसंशोधनातूनच आहेत.
शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना उपसंपादक, वार्ताहर, सूत्रसंचालक, कथालेखक, छायाचित्रकार, रेडिओ जॉकी, ध्वनीसंकलक, दिग्दर्शक, सहाय्यक दिग्दर्शक, कार्यकारी निर्माता, स्तंभलेखक, व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट, बातमी विश्लेषक, जनसंपर्क अशा संधी उपलब्ध आहेत.

आज भारतात तब्बल १०० वृत्तवाहिन्यांसह ४०० खाजगी वाहिन्या लोकांपर्यंत पोहोचतात. या क्षेत्रात करिअर घडवण्यात विपुल संधी माध्यम क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना खुलं झालं आहे. गेल्या काही वर्षामध्ये प्रादेशिक भाषेतील वर्तमानपत्रांनी खप आणि वाचक संख्येत आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. प्रादेशिक पत्रकारितेचे सातत्याने विस्तारणारे क्षेत्र पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांसाठी एक नवं आव्हान म्हणून खुणावत आहे. प्रादेशिक वर्तमानपत्रांच्या नवनवीन आवृत्त्यांमुळे राज्याच्या कानाकोप-यात नोकरीची संधी उपलब्ध होताना दिसत आहे. जाहिरात क्षेत्रातही प्रादेशिक भाषेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच मराठी माध्यमातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांना जाहिरात क्षेत्रात आपली कर्तबगारी सिद्ध करण्यास वाव आहे.

प्रा.विठ्ठल एडके
वसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड
comments