जॉब आणि करिअर


नोकरी आणि व्यवसाय यात मुळात फरक आहे का? तेच आपण पाहूयात. माझ्या पाहण्यात अशी अनेक माणसे येतात की जी परंपरागत विचारांनी बांधलेली असतात. शिक्षण पूर्ण झाले की ते नोकरीच्या, चांगल्या नोकरीच्या शोधास लागतात. चांगली नोकरी म्हणजे तरी काय, तर अधिक उत्पन्नाची, अधिक पदोन्नतीची संधी आणि ज्या क्षेत्रात काम करायचे त्या क्षेत्राला असणारी भरभराटीची संधी किंवा शक्यता. एकदा अशी नोकरी पदरात पडली की पुढची आकांक्षा म्हणजे अधिकाधिक पगार, आता हा अधिक पगार त्याच संस्थेत किंवा दुस-या संस्थेतही प्राप्त होऊ शकतो. असे ही ऐकण्यात येते की, नोक-या बदलून अथवा आहे तिथेच वरची जागा पटकावून ही भरभराट साधता येते. हे बरेचसे खरे आहे आणि हाच राजमार्ग झाला आहे.

पण यात कितपत तथ्य आहे? कारण असे असते तर सर्वांनीच याचा मार्ग अवलंब करून आपली भरभराट साधली असती. शिक्षण सल्लागार म्हणून मी असे सांगू शकतो की बरेचजण नोकरी आणि कारकीर्द याची गल्लत करतात. हे दोन्ही शब्द एकाच अर्थी वापरतात. मात्र, प्रत्यक्षात हे दोन्ही भिन्न शब्द आहेत. एखाद्याची कारकीर्द उत्तम असली म्हणून त्याची नोकरी उत्तम असेलच असे नाही, तसेच उत्तम नोकरी (उत्पन्न) असली म्हणून एखाद्याची कारकीर्द उत्तम असेलच असे नाही.

नोकरी आणि कारकीर्द हे भिन्न शब्द आहेत. कारकीर्द हा बहुव्यापी अर्थाने वापरला जाणारा शब्द आहे, तर नोकरी या शब्दालाच मर्यादा आहेत. कारकीर्दीचे मूल्यमापन किंवा मोजमाप करता येत नाही, पण पगार, वरचे पद, अदिकाराची जागा यावरून नोकरीची मूल्यामापन करणे शक्य असते. नोकरी हे साध्य नसून साधन आहे आणि कारकीर्द मात्र साध्य आहे. प्रत्येकाने यशस्वी कारकीर्दीकडे लक्ष ठेवायला हवे. केवळ यशस्वी नोकरीकडे नाही.
मग कारकीर्द करायची, यशस्वी कारकीर्द करायची तर काय करायला हवे? यासाठी तीन टप्पे सुचविता येतील. प्रथम आत्मपरीक्षण करून स्वतःला जाणून घ्यायला हवे. आपल्यातली ताकद, बलस्थाने यांचे वारंवार केलेल्या विश्लेषणाने हे साध्य होते. आपल्यात काही त्रुटी किंवा कमतरता असल्यास अभ्यास, प्रशिक्षण याद्वारे त्रुटी दूर करता येतील. आत्मविश्वासाचा विकास आणि विचारप्रवृत्तीत घडवून आणलेला विधायक बदल, अशा स्थितीला आपण पोहोचलो, अंगी कला-गुण बाणविले की आपण आपल्या आवडत्या कारकीर्दीकडे जायला सज्ज होतो.

दुसरा टप्पा असा की नोकरपदास पात्र होणे हे वेगळे आणि अंगी नोकरीस साजेशी पात्रता असणे वेगळे असते. उत्तम पात्रता असूनही नोकरी मिळत नाही, उलट अंगी काहीही गुण नसतानाही काही जणांना चांगली नोकरी मिळते, असे पाहायला मिळते. आवश्यक शैक्षणिक पात्रता असून भागत नाही, तर त्यासोबत काही कौशल्यही असावे लागते. हे कसब किंवा कौशल्य म्हणजे केवळ तांत्रिक कसब असे नाही, तर माणसा-माणसातले संभाषण कोशल्य, नेतृत्वगुण, सांघिकरीत्या काम करण्याचे कसब, सहकार, लोकांना सांभाळण्याची कला आणि मुख्य म्हणजे मनोधारणा किंवा विचारसरणी, यासारख्या अनेक गुणांचा समावेश होतो. आपणाकडे शिक्षणासोबत असे गुणांचे डबोले असल्यास आपण नोकरीत पात्रच नाही, तर योग्य ठरतो. तिसरा टप्पा म्हणजे, यशाची, यशस्वी कारकीर्दीची आपली अशी व्याख्या ठरवणे. ही व्याख्या आपली स्वतःची असावी. इतरांच्या वा अगदी जगाच्या व्याख्येवर अवलंबून नसावी. (गाण्याच्या बाबतीत जसे म्हणतात ना की एखाद्याची नक्कल करण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या आवाजात गा - अगदी तसेच) यशस्वी कारकीर्द बनविण्यासाठी हे सर्व घटक अतोनात महत्त्वाचे आहेत.
comments
Leave a reply

आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.

Your E-mail ID not be published. Required *. मराठी/इंग्रजी साठी [CTRL + G] बटन वापरा

anti spam
(Maximum characters: 500)
characters left.

Required fields are marked (*)