नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ डिझाइन : नवी संधी

2015-10-15 13:59:44
     230 Views

अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवाहांमुळे नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ डिझाइन ही संस्था उदयास आली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या परंपरा, संस्कृती, कला आणि आधुनिक कल्पना आणि तंत्रज्ञान यांचा मेळ घालणे आवश्यक होते. प्रसिद्ध लेखिका आणि भारतीय हस्तकलांमधील तज्ज्ञ तसेच भारतीय हस्तमाग आणि हस्तकला निर्यात परिषदेच्या संस्थापिका पुपुल जयकर व प्रसिद्ध अमेरिकन डिझायनर चार्लस एम्स यांची न्युयॉर्क मध्ये म्युझियम ऑफ मॉर्डन आर्ट येथे १९५५ साली प्रदर्शनानिमित्त भेट झाली. या दोन्ही नामवंताचा संवाद पुढे सतत सुरु राहिला. दरम्यान श्रीमती जयकर आणि इतर समविचारी नामवंतांच्या सल्ल्यानुसार भारत सरकार डिझाइन विषयक संस्था स्थापन करण्याचा विचार करू लागली.

भारतात झपाट्याने होत असलेल्या औद्योगिकरणामुळे अशा संस्थेची अधिकच गरज भासु लागली. सन १९५७ साली भारत सरकारने फोर्ड फाऊंडेशनला विनंती करुन चार्लस आणि रे एम्स यांना भारत भेटीसाठी निमंत्रित केले. या दोघांनी भारतभर भ्रमंती करुन विविध लेखकांशी, उद्योजकांशी, शास्त्रज्ञांशी, वास्तु तज्‍ज्ञांशी, कारागिरांशी संवाद साधून दिनांक ७ एप्रिल १९५८ रोजी भारत सरकारला अहवाल सादर केला. हा अहवाल देशातील पुढचे डिझाइन विषयक शिक्षण ठरविण्यासाठी महत्त्वाचा ठरला. भारत सरकारने फोर्ड फाऊंडेशन आणि साराभाई कुटुंबियांच्या सहकार्याने नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रियल डिझाइन या संस्थेची अहमदाबाद येथे सप्टेंबर १९६१ मध्ये स्थापना केली. गौतम साराभाई आणि त्यांच्या भगिनी गिरा यांचा संस्थेच्या प्रारंभीच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा होता. आज ही संस्था दर्जेदार शिक्षण आणि संशोधनामुळे उद्योग, संवादशास्त्र, वस्त्रोद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय संस्था ठरली आहे. भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत ही स्वायत्त संस्था आहे. राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून संसदेने २०१४ साली या संस्थेस मान्यता दिली आहे. भारत सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाने देखील संस्थेस वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्था म्हणून मान्यता दिली आहे.

जागतिक दर्जाचे शिक्षण आणि डिझाइन विषयक जागृती निर्माण करुन जीवनाचा दर्जा उंचाविणे, देशाच्या विविध क्षेत्रातील डिझाइन विषयक गरजा ओळखून व्यावसायिक निर्माण करणे, डिझाइन तंत्रज्ञ निर्माण करणे, विविध संशोधन प्रकल्प हाती घेणे हे संस्थेचे ध्येय आहे. संस्थेमध्ये विविध अभ्यासक्रम शिकविण्यात येतात. वर्ष २०१६-१७ च्या शैक्षणिक सत्रासाठी संस्थेने नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली आहे. संस्थेच्या अभ्यासक्रमांमध्ये चार वर्षाचा बॅचलर ऑफ डिझाइन हा अभ्यासक्रम अहमदाबाद येथील संकुलात, मास्टर ऑफ डिझाइन हा अडीच वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम अहमदाबाद, बंगलूरु आणि गांधीनगर येथील संकुलात तर ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्राम इन डिझाइन हा चार वर्षाचा अभ्यासक्रम विजयवाडा येथील संकुलात शिकविण्यात येतो.

या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज शुक्रवार दिनांक २७ नोव्हेंबर २०१५ पर्यंत करावयाचे असून प्रवेश परीक्षा रविवार दिनांक १० जानेवारी २०१६ रोजी होईल. प्रवेशासाठी पात्रता, जागांची संख्या, प्रवेश परीक्षेचे केंद्र, आरक्षणाचे नियम आणि अन्य माहिती संस्थेच्या हींीं:ि//रवाळीीळेपी.पळव.शर्वी या वेबसाईटवर उपलब्ध आहे. बॅचलर ऑफ आर्किटेक्चर ही पदवी संपादन केल्यानंतर सध्या या संस्थेत मास्टर ऑफ डिझाइन या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात शिकणारा नागपूर येथील विहंग अनिल गडेकर हा विद्यार्थी संस्थेविषयी बोलताना म्हणतो, डिझाइन म्हटले की, आपल्याला फॅशन डिझाइन किंवा इन्टिरियर डिझाइन ऐवढ्याच गोष्टी डोळ्यासमोर येतात. परंतु, वेगवेगळ्या क्षेत्रात कशाप्रकारे डिझाइनची आवश्यकता असते ते येथेच आले की शिकायला मिळते. येथील प्रवेश परीक्षेविषयी विचारले असता विहंग सांगतो, प्रवेश परीक्षेत स्केचिंग, निर्मिती क्षमता आणि सामान्यज्ञान याची प्रामुख्याने चाचणी घेतली जाते. ही संस्था आंतरराष्ट्रीय दर्जाची असल्यामुळे पुढे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सेवेच्या व व्यवसायाच्या संधी निर्माण होतात. परंतु महाराष्ट्रातील तरुणांमध्ये अद्यापही या क्षेत्राविषयी व संस्थेविषयी हवी तशी जागरुकता दिसून येत नाही. म्हणून महाराष्ट्रातील युवक-युवतींनी या कलात्मक क्षेत्रातील अभ्यासक्रमांचा जरुर विचार करुन आवश्यक ती पूर्वतयारी करुन एका नव्या क्षेत्रात आपले भवितव्य घडवावे.

-देवेंद्र भुजबळ
संचालक (माहिती‍)(प्रशासन).
comments