ऐतिहासिक शहर बीड

19-02-2015 : 08:31:34
     794 Views

बीड जिल्ह्याचा प्राचीन इतिहास रामायण काळाशी जोडलेला आहे असे मानले जाते. सुसंगत व लिखित इतिहास साधारण इसवी सनाच्या चौथ्या शतकापासूनचा उपलब्ध आहे. सातवाहन, चालुक्य, कलचुरी, वाकाटक, कदंब आदी घराण्यांनी या प्रदेशावर सत्ता गाजवली.

रामायण काळात सीतमाईस पळवून नेणार्‍या रावणाला जटायूने याच भागात अडवले असे म्हटले जाते. रावणाबरोबरच्या लढाईत जटायू जखमी झाला. त्याच स्थितीत सीताहरणाची हकिकत श्रीरामास सांगून तो इथेच गतप्राण झाला. अशी एक आख्यायिका ‘बीड’ शहराशी जोडलेली आहे. चालुक्य घराण्याचे या प्रदेशावर राज्य असताना विक्रमादित्य राजाच्या चंपावती नावाच्या बहिणीने बीड शहराचे नामाकरण ‘चंपावतीनगर’ असे केले होते असा उल्लेख इतिहासात सापडतो. हे चंपावतीनगर व त्या सभोवतालचा परिसर पुढे यादवांच्या व त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीच्या अमलाखाली होता.

एका यवन राजाने या भागात खोलवरील पाणी अनुभवले. पर्शियन भाषेत पाण्याला ‘भिर’ म्हणतात. त्या राजाने या भागालाही ‘भिर’ असे नाव दिले. त्याचा अपभ्रश होत या भागाला ‘बीड’ असे (काळाच्या ओघात) म्हटले जाऊ लागले.

बालाघाटच्या डोंगररांगेच्या जवळ व बिंदुसरा नदीच्या खोर्‍यात खळग्यासारख्या खोल भागात किंवा बिळासारख्या ठिकाणी बीड हे शहर वसलेले आहे. त्यावरूनच ‘बीळ’ या शब्दावरून शहराचे प्रचलित नाव ‘बीड’ हे पडले असावे, अशीही एक शक्यता सांगितली जाते.

बहामनी व निजामशाही राजवटीखालीदेखील काही काळ हा जिल्हा होता. पेशव्यांच्या कालखंडात निजाम व मराठे यांच्यामध्ये राक्षसभुवन (१७६३५) व खर्डा येथे झालेल्या लढाया इतिहासात प्रसिद्ध आहेत. मराठेशाहीच्या अस्तानंतर बीड जिल्हा हा पुन्हा निजामाच्या अमलाखाली होता, त्यानंतर १९५६ पर्यंत हैद्राबादचा भाग होता. १९५६ ते १९६० या कालावधीत बीड मुंबई प्रांताचा भाग होता. शेवटी १९६० साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासून बीड हा महाराष्ट्राचा भाग बनला.

निजाम व ब्रिटीश यांच्या विरोधात बीडमध्ये १८१८ सालीच (मराठवाड्यात सर्वप्रथम) आंदोलन छेडले गेले होते. जिल्ह्यातील धर्माजी प्रताप राव हे या लढ्याचे मार्गदर्शक होते. पुढील काळात स्वामी रामानंदतीर्थ व गोविंदभाई श्रॉफ यांनी मराठवाडा मुक्तीसाठी प्रयत्न केले.

भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ येथे आहे. तसेच या परिसराशी जोडले गेलेले रामायणातील संदर्भ, अंबेजोगाई येथील श्री योगेश्र्वरी देवीचे स्थान आदी घटकांमुळे बीड जिल्हा संपूर्ण भारतात धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांसाठी हा जिल्हा प्रसिद्ध असून नायगाव येथे मोरांसाठीचे अभयारण्य आहे. आद्यकवी मुकुंदराज, संतकवी दासोपंत, स्वामी रामानंदतीर्थ इत्यादी व्यक्तिमत्त्वांमुळेही बीड जिल्हा महत्त्वपूर्ण असल्याचे लक्षात येते. हैद्राबाद (मराठवाडा) मुक्ती संग्रामात स्वामी रामानंदतीर्थ यांच्या नेतृत्वाखाली बीडची भूमिका महत्त्वाची होती.


राजकीय संरचना:

लोकसभा : जिल्ह्यात लोकसभेचा बीड हा एक मतदारसंघ आहे. जिल्ह्यातीलच ६ विधानसभा मतदारसंघांचा मिळून हा मतदारसंघ बनला आहे.

विधानसभा : गेवराई, माजलगांव, बीड, आष्टी, केज, परळी हे जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघ आहेत.
बीडमध्ये जिल्हा परिषदेचे ६० मतदारसंघ असून, पंचायत समितीचे १२० मतदारसंघ आहेत.भूगोल:

महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागातील, राज्याच्या साधारण मध्यभागी असलेला हा जिल्हा; जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद, अहमदनगर, औरंगाबाद या जिल्ह्यांनी वेढलेला आहे.

बीडच्या उत्तरेकडे गंगथडी म्हणून ओळखला जाणारा गोदावरी खोर्‍याचा सखल भाग आहे. व दक्षिणेकडे मांजरा खोर्‍याचा भाग आहे. हा जिल्हा म्हणजे गोदावरी -मांजराचे खोरे होय.

जिल्ह्याचा पाण्याचा मुख्य स्त्रोत हा गोदावरी नदीचा. याच नदीने जिल्ह्याची उत्तर सीमा निश्चित केली आहे. गोदावरी बरोबरच सिदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, सरस्वती, वाण या गोदावरीच्या उपनद्या जिल्ह्यातून वाहतात. जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून मांजरा ही दुसरी महत्त्वाची नदी वाहते. चौसाळा, केज, रेना व लिंबा या मांजरा नदीच्या उपनद्या जिल्ह्यातून वाहतात.

जिल्ह्यात दोन मोठे जलसिंचन प्रकल्प आहेत.
१. सिंदफणा नदीवरील माजलगाव प्रकल्प
२. मांजरा नदीवर केज तालुक्यात मांजरा प्रकल्प.
तसेच अंबेजोगाई तालुक्यात वाण नदीवर व पाटोदा तालुक्यात सिंदफणा नदीवर प्रकल्प निर्माण करण्यात आले आहेत.शेती:

बीड हा कृषिप्रधान जिल्हा आहे. ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख पिक असून ते खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामांत घेतले जाते. गंगथडी (गोदावरीचे खोरे) परिसरात घेतली जाणारी रब्बी ज्वारी ‘टाकळी ज्वारी’ म्हणून ओळखली जाते.
खरीपातील कापूस, बाजरी, मूग, तूर, व भूईमुग ही महत्त्वाची पिके होत व महत्त्वाची रब्बी पिके गहू, हरभरा व करडई होत.

ऊस हे जिल्ह्यातील महत्त्वाचे बागायती पिक असून अलीकडील काळात साखर कारखान्यांमुळे उसाखालील क्षेत्र वाढत आहे.

ऊस तोडणीच्या हंगामात बरेच शेतकरी बीड जिल्ह्यातील इतर तालुक्यात व अनेकदा इतर जवळपासच्या जिल्ह्यांत किंवा क्वचित कर्नाटकमध्येही ऊस तोडणी कामगार म्हणून स्थलांतर करतात.
याशिवाय सूर्यफूल, द्राक्ष, आंबा व कलिंगडाचे पीक जिल्ह्यात घेतले जाते. जिल्ह्यातील नेकनूर परिसरातील ‘कालापहाड’ व अंबेजोगाईमधील ‘पेवंदी’ या जातीचे आंबे महाराष्ट्रात प्रसिध्द आहेत.

उद्योग:

जिल्ह्यात केवळ बीडमधे औद्योगिक वसाहत आहे. परळी येथे १९७० मध्ये औष्णिक विद्युत केंद्र उभारण्यात आले. १९९५ मध्ये वृक्षारोपणासाठी महाराष्ट्र शासनाच्या वनश्री पुरस्काराने या केंद्रास गौरविण्यात आले.

जिल्ह्यात एकूण सात सहकारी साखरकारखाने आहेत:
१. अंबेजोगाई तालुक्यातील आंबासाखर येथील अंबेजोगाई सहकारी साखर कारखाना
२. गेवराई तालुक्यातील शिवाजीनगर येथील जय भवानी सहकारी साखर कारखाना
३. माजलगांव तालुक्यातील तेलगांव येथील माजलगांव सहकारी साखर कारखाना
४. परळी वैजनाथ तालुक्यातील परळी वैजनाथ येथील वैजनाथ सहकारी साखर कारखाना
५. बीड तालुक्यातील सोनाजीनगर येथील गजानन सहकारी साखर कारखाना
६. आष्टी तालुक्यातील कडा येथील कडा सहकारी साखर कारखाना
७. केज तालुक्यातील उमरी येथील पद्मश्री डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखाना

परळी येथे विजेचे दिवे व विजेच्या इतर साहित्याच्या निर्मितीचा कारखाना आहे. त्याचबरोबर तेल गिरणी व कापूस कारखाना देखील आहे. बीड व वडवणीमध्ये हातमाग आहे. तेलगिरण्या परळीबरोबरच बीड व अंबेईजोगाईमध्ये आहेत.
मराठवाडा विकास महामंडळातर्फे बीड येथे चर्मोद्योग प्रकल्प राबविण्यात येत आहे. बीड येथे बनवले जाणारे छागल नावाचे चामड्याचे बुधले प्रसिद्ध आहेत. पाटोदा तालुक्यातील अमळनेर हे गाव तांबे-पितळ्याच्या भांड्यांसाठी प्रसिद्ध आहे.
जिल्ह्यात बांधकामाचा दगड मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने संबंधित उद्योग व व्यवसाय उपलब्ध आहेत.

दळणवळण:

जालना, अहमदनगर, उस्मानाबाद, परभणी हे बीडच्या भोवतालचे सर्व जिल्हे राज्य महामार्गाद्वारे बीडशी जोडले गेले आहेत.
जिल्ह्यातील एकमेव लोहमार्ग (मीटरगेज) परभणी - परळी- वैजनाथ असून तो १९२९ मध्ये वाहतुकीस खुला करण्यात आला. परळी- वैजनाथ हे जिल्ह्यातील एकमेव रेल्वे जंक्शन होय.
सामाजिक / विविध :

शैक्षणिकदृष्ट्या बीड जिल्हा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत येतो. या विद्यापीठाच्या अंतर्गत बीड जिल्ह्यात एकूण सुमारे ७० विविध प्रकारची महाविद्यालये आहेत.

जिल्ह्यातील बालाघाटच्या रांगांत लमाण या जमातीचे लोक आढळतात.
comments