पाणी मराठवाडयाचे


भविष्यात या देशात एकवेळ अशी स्थिती येईल की सोन स्वस्त आणि पाणी महाग. तशीच वेळ आज मराठवाडय़ाची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्हयावर आली आहे. ‘पाण्यासाठी दाही दिशा‘ अशी वेळ आलेली असतांनाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी औरंगाबाद, जालना जिल्हयासाठी निलवंडे धरणातुन अडीच अब्ज घनफुट पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच जालना शहरासाठी होत असलेल्या नळपाणी पुरवठा योजनेसाठी शासनाकडुन ५० कोटी रुपये निधी देण्याची घोषणा केली. ही योजना दोन ते तीन महिन्यात पुर्ण करण्याचे आदेशही दिले आहेत.

मराठवाडय़ातील लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्हयात तुलनेन सरासरी पाऊस चांगला झाला असला तरी तो ही तुषार सिंचना सारखा झालेला आहे. त्या मानाने औरंगाबाद जालना आणि ब़ीड़ जिह्यात झालेल्या पावसाची अवस्था ही चिंताजनकच आहे. या सर्वाचा विचार करता भविष्यात पाण्यासाठी वणवण करावी लागणार हे निश्चित.

औरंगाबाद, जालना, अंबड, गेवराई या मोठय़ा शहराना पाणी पुरवठा होतो तो जायकवाडी धरणातुन. यंदा हे धरणच भरले नाही त्याची पातळी जोत्याच्यावर आलेली नाही. पाऊस न पडणे हे अस्मानी संकट आहे असे मानले तरी जायकवाडी भरण्याच्या आत धरणाची दारे बंद करुन पाणी अ़ड़वणे हे मात्र सुलतानी संकटच मानावे लागेल.

जायकवाडी धरण भरल्या शिवाय ध़रणाचे किंवा बंधाऱयाची दारे बंद करु नयेत अशी मागणी नेहमी दिवंगत गोविंदभाई श्रॉफ करीत असत. आजही तीच अवस्था आहे. खरीपाच्या पिकासाठी पाटाच्या पाण्याची आवश्यकता नसतानांही पाटातुन पाणी सोडले जाते. विभागीय आयुक्तानी या कडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे पाटाचे पाणी जायकवाडीत सोडावे म्हणजे ते मराठवाडय़ातील या जिल्हयांच्या पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी वापरता येईल. तसेच पाणीसाठा खास या कारणासाठी राखीव ठेवावा असा अहवाल दिला होता. ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी.

निळवंडे धरणातुन जायकवाडीत पाणी सोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यानी दिले ही आनंदाची बाब असली तरी निळवंडे धरण परिसरातुन पाणी सोडण्यास विरोध सुरु झाला आहे त्या कडे दुर्लक्ष करता येणार नाही. नगर आणि नाशिक जिल्हयाला मुख्यमंत्र्यानाच शेजार धर्माची शिकवण द्यावी लागणार आहे हे महत्वाचे आहे अन्यथा जायकवाडी धरणासारखी ही घोषणाही मराठवाडय़ाच्या लोकांसाठी कोरडीच घोषणा राहील हे मात्र खरे.

जायकवाडीत पाणी सोडण्याचे आदेश देवून मुख्यमंत्री महोदयांनी आपले कर्तव्य पूर्ण केले. मुख्यमंत्री साहेब पण असे असले तरी मराठवाडय़ाच्या हक्काच जे पाणी आहे ते मराठवाडय़ाला देण्याचा अधिकारही आपलयाला आहे तो आपण गाजवला तर ख-या अर्थाने या निर्णयाला एक वेगळीच झळाळी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही.

मराठवाडय़ाला जे पाणी पाहिजे आहे ते जगण्यासाठी तर नगर आणि नाशिककरांना पाणी पाहिजे आहे ते पिके जगविण्यासाठी. माणुस की पिक याचा निर्णय करण्याची वेळ आत्ताच आली आहे. यासाठी जलसंर्वधनात जसे माथा ते पायथा पाणी अडविण्याचे तत्व स्विकारले आहे. तेच तत्व आता शासकीय धोरण ठरवितांना व त्याची अमंलबजावणी करतांना आचरणात आणावे लागणार आहे. गोदावरी ही नदी सर्वाची आहे तेव्हा या गोदावरीच्या शेवटच्या टोका पर्यंत पाणी राहील याची जबाबदारी ही शासनाने घेतली पाहिजे.
comments
Leave a reply

आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.

Your E-mail ID not be published. Required *. मराठी/इंग्रजी साठी [CTRL + G] बटन वापरा

anti spam
(Maximum characters: 500)
characters left.

Required fields are marked (*)