बीड


बीड (किंवा भीर) भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. हे शहर बीड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. बीड हे मराठवाड्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. चंपावतीराणीच्या नावावरून देण्यात आलेले चंपावतीनगर हे या शहराचे दुसरे नाव आहे. येथे खंडेश्वरी मंदिर, पाण्यात उभारलेले कंकालेश्वर मंदिर‍ अशी अनेक मंदिरे आहेत. मराठीतील आद्य कवी मुकुंदराज येथीलच आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले परळी वैजनाथ हे देखील बीड जिल्ह्यातीलच. बीड शहरातून बिंदुसरा नदी वाहते नदीच्या पूर्व काठावर सर्वांगसुंदर कंकालेश्वर मंदिर आहे. मुर्तुजा शाह निजामच्या काळात बांधली गेलेली बीडची खजाना बावड़ी प्रसिद्ध आहे.

बीडमध्ये सध्या कॉपीमुक्ती चळवळ चालू आहे. कॉपीमुक्ती चळवळीसाठी बीडमध्ये शैक्षणिक गुणवत्ता विकास परिषदेची स्थापना करण्यात आली होती. या परिषदेने बीड जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबवले. त्यामुळे कॉपीमुक्ती चळवळीला यश आले असावे.

बीड हा महाराष्ट्रातील ऊसतोड़ कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर ऊसतोडीसाठी बहुधा बीडचा कामगार असतो. बीड जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ असून उरलेल्या भागातली जमीन सुपीक आहे.

इतिहास

बीड जिल्ह्याचे पांडवकालीन नाव दुर्गावतीनगर होते. हा भाग पुढे चालुक्य राजा ६व्या विक्रमादित्याची बहीण चंपावती हिने जिंकून घेतल्याने चंपावतीनगर म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे मुहम्मद बिन तुघलकाची देवगिरीवर सत्ता आल्यावर त्याने सन १३२६ मधे चंपावातीनगर हे नाव बदलून ’ भीर’ हे नाव दिले, भीर म्हणजे पाण्याचा प्रचंड साठा पुढे भीरचाच अपभ्रंश होऊन हे शहर बीड या नावाने ओळखले जाऊ लागले. पूर्वी राणी चंपावतीने या भागावर राज्य केल्याचा उल्लेख काही पुराणांमध्ये आहे. शहरात चंपावतीचा किल्ला असल्याच्या खुणाही आहेत. शहराच्या आजूबाजूला तटबंदी आहेत.


बीड जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासाविषयी पुराणांमधून उल्लेख येत असले अथवा बीड शहरातील जटाशंकर मंदिराचा संबंध थेट रामायणाशी जोडणाऱ्या दंतकथा प्रचलित असल्या तरी ज्याला थोडाफार सुसंगत म्हणता येईल अशा स्वरूपाचा बीड जिल्हयाचा इतिहास मात्र इसवी सनाच्या चौथ्या शतकापासूनच उपलब्ध आहे. सातवाहन, चालुक्य, कलचूरी, वाकाटक, कदंब, इत्यादी घराण्यांचे बीडवर राज्य होते.

उपरोक्त चंपावतीनगर व त्या सभोवतालचा परिसर पुढे यादवांच्या व तदनंतर खिलजीच्या अमलाखाली होता. अल्लाउद्दीन खिलजीने हा प्रदेश यादवांकडून जिंकून घेतल्याचा उल्लेख मिळतो. पूढे महंमद तुघलकाच्या कारकिर्दीतचत या नगराचे नाव ’ भीर’ असे पडले. बहामनी साम्राज्याच्या उदयानंतर या प्रदेशावर बहामनी सत्ता प्रस्थापित झाली. त्या राजवटीच्या विघटनानंतर हा प्रदेश निजामशाहीचा एक भाग बनला. पेशवाईच्या कालखंडात निजाम व मराठे यांच्यामध्ये राक्षसभुवन व खर्डा येथे झालेल्या लढाया इतिहासात प्रसिद्ध आहेत. मराठ्यांनी निजामाकडून हा प्रदेश जिंकून घेतला होता. तथापि, मराठेशाहीच्या अस्तानंतर या प्रदेशावर पुन्हा निजामाची राजवट प्रस्थापित झाली, ती थेट १८ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने हैदराबाद संस्थानाच्या भारतातील विलीनीकरणास मान्यता देईपर्यत.

१ नोव्हेंबर १९५६ राजी द्वैभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आल्यांनतर बीड जिल्हा या द्वैभाषिक मुंबई राज्याचा एक भाग बनला. तदनंतर १ मे १९६० रोजी सध्याचे महाराष्ट्र् राज्य अस्तित्वात आल्यानंतर हा जिल्हा महाराष्ट्रा राज्यात समाविष्ट झाला.

हवामान

जिल्ह्यातील हवामान सर्वसाधारणत: कोरडे व आल्हाददायक आहे.स्थळपरत्वे जिल्ह्यातील हवामानात थोडाफार फरक आढळतो. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील उंचावरील डोंगराळ प्रदेशातील हवामान काहीसे थंड आहे. तर सखल भागात ते उबंदार व थोडेसे दमट आहे. जिल्ह्यातील एकूण हवामानाचा विचार केला असता. अंबेजोगाई तालुक्यातील हवामान अधिकच आल्हाददायक असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधील पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण अतिशय कमी असून पाऊस अनियमित स्वरूपाचा आहे. त्यामुळे जिल्ह्याचा बराचसा भाग अवर्षणग्रस्त आहे. जो पाऊस पडतो त्याचे जिल्ह्यातील वितरणही असमान आहे. जिल्ह्याच्या पूर्वेकडील अंबेजोगाई, केज, माजलगाव आदी तालुक्यात तो तुलनात्मकदृष्टया अधिक पडतो. तर गेवराई, आष्टी, पाटोदा यांसारख्या तालुक्यात तो खूपच कमी पडतो. पावसाचे प्रमाण पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होत गेलेले आढळून येते. जिल्ह्यातील गेवराई, पाटोदा, बीड, माजलगाव, केज, आष्टी, या तालुक्यांचा केंद्र शासनाने निश्चित केलेल्या अवर्षणप्रवण क्षेत्रात समावेश होतो.

नद्या

गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते काही अंतरापर्यत तिने औरंगाबाद बीड, जालना, बीड व परभणी बीड अशा जिल्ह्य सीमा निश्चित केल्या आहेत. गोदावरीची वाहण्याची दिशा साधारणपणे वायव्येकडून आग्नेयेकडे आहे. जिल्ह्यातील सिंधफणा, वाण, सरस्वती, या गोदावरीच्या उपनद्या आहेत.

मांजरा ही जिल्ह्यातील दुसरी महत्त्वाची नदी आहे. पाटोदा तालुक्यातील बालाघाटच्या डोंगराळ भागात उगम पावणारी ही नदी सुरुवातीस उत्तर - दक्षिण - असा प्रवास करून नंतर जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहत जाऊन पुढे लातूर जिल्ह्यात प्रवेशते. तिचा बराचसा प्रवास गोदावरीला काहीसा समांतर असा होतो. बऱ्याच ठिकाणी या नदीने अहमदनगर-बीड, उस्मानाबाद -बीड व लातूर - बीड या जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमेचे कार्य केले आहे. उगमापासून सुमारे ६१६ किलोमीटर प्रवास करून ही नदी पुढे नांदेड जिल्ह्यात कुंडलवाडी गावाजवळ गोदावरीस मिळते. जिल्ह्यातील केज, रेना, लिंबा, व चौसाळा या मांजरा नदीच्या उपनद्या असून त्या बालाघाटच्या डोंगराळ प्रदेशात उगम पावून जिल्ह्यातच मांजरा नदीस मिळतात.

सिधंफणा नदी पाटोदा तालुक्यात चिंचोली टेकडयात उगम पावते. प्रथम उत्तरेकडे, नंतर पूर्वेकडे व तदनंदर पुन्हा उत्तरेकडे, किंबहुना ईशान्येकडे प्रवास करीत माजलगाव तालुक्यात मंजरथजवळ गोदावरीस मिळते.

बीड तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावणारी बिंदुसरा नदी बीड शहरातून वाहत जाऊन पुढे सिंधफणेस मिळते कुंडलिका ही सिंधफणेची आणखी एक उपनदी जिल्ह्यातच उगम पावून जिल्ह्यातच सिंधफणेस मिळते.

सीना नदी जिल्ह्याच्या व आष्टी तालुक्याच्याही नैऋत्य सीमेवरून वाहते. काही अंतरापर्यत तिने अहमदनगर व बीड जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमा म्हणून काम केले. आहे. त्याच वेळी तिने अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुका व बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका यांची सीमारेषाही स्पष्ट केली आहे.


तीर्थक्षेत्रे

परळी वैद्यनाथ किंवा परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. येथील मंदिर प्रशस्त असून ते जागृत देवस्थान आहे, असे मानले जाते. मंदिर लहानशा टेकडीवर असून ते चिरेबंदी आहे. मंदिराला लांबच लांब भरपूर पायऱ्या आहेत. मंदिराचे प्रवेशद्वार अतिशय भव्य आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. मंदिराच्या सभोवताली तीन कुंडे आहेत.


भगवानगड: श्रीक्षेत्र भगवानगड हे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यातील एक तीर्थक्षेत्र आहे. श्रीक्षेत्र भगवानगड हिंदू वंजारी समाजाचे भाविकांमध्ये हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. बीड जिल्ह्यातील खरवंडीच्या बाजूलाच धौम्य ऋषीचा धौम्यगड होता. धौम्य ऋषी पांडवांचे पुरोहित होते. याच ठिकाणी भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड उभा राहिला.
कपिलधार : श्रीक्षेत्र कपिलधार हे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यातील एक निसर्गरम्य तीर्थक्षेत्र आहे. बीड शहराच्या दक्षिणेस१९ किमी मांजरसुंभा, व तेथून दीड किलोमीटरवर छोट्या टेकड्यांच्या दरीत दहा मीटर उंचीवरून पडणाऱ्या जलप्रपाताच्या पायथ्याशी हे स्थान आहे. गर्द वनश्रीच्या सान्निध्यात येथे नन्नाथस्वामी या लिंगायतांच्या सत्पुरुषाची टुमदार समाधी आहे. तुलसीविवाहाच्या वेळी येथे पाच दिवस यात्रा भरते.

बीड :- जिल्ह्याचे मुख्य ठिकाण बिंदुसरा नदीकाठी वसले आहे. जिल्हयातील सर्वात मोठे शहर . शहरात कंकालेश्र्वराचे जलमंदिर आहे. सुरेख व कलात्मक बांधणीमुळे हे जलमंदिर प्रेक्षणीय ठरले आहे. शहराजवळच्या टेकडीवर खंडेश्र्वराचे प्राचीन मंदिर, आहे. शहरात पीर बालाशहा व मन्सूरशाह यांचे दर्गे आहेत. शहरापासून जवळच खजाना ही प्रसिद्ध विहिर आहे. या विहिरीस कायम पाणी असते. अलीकडील काळात बीड औद्योगिक व शैक्षणिक शहर म्हणूनही विकसित होत आहे.

अंबेजोगाई :- अंबेजोगाई तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. निजामी अमलात हे गाव मोमिनाबाद नावाने ओळखले जात असे गावात जोगाई व खोलेश्र्वर यांची प्राचीन मंदिरे आहेत. जोगाईच्या मंदिरामुळे हे गाव अंबेजोगाई म्हणून ओळखले जाते. आद्यकवी मुकुंदराज व संतकती दासोपंत यांच्या समाधी येथे आहेत. ज्ञानेश्र्वरांनी येथील मुकुंदराजाच्या समाधीला भेट दिल्याचा उल्लेख सापडतो. दासोपंतांनी लिहिलेली बारा मीटर लांब व एक मीटर रुंदीची पासोडी येथे पाहावयास मिळते. येथील क्षयरोग रुग्णालय विख्यात आहे. क्षयरोग लवकर बरा होण्यासाठी येथील कोरडे हवामान उपयुक्त ठरते. अंबेजोगाई हे ठिकाण देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक मानले जाते.

मांजरसुभा :- हे गाव बीड तालुक्यात आहे. बीड, अहमदनगर उस्मानाबाद व अंबेजोगाईस जाणारे रस्ते या ठिकाणी एकत्र येतात येथे मन्मथस्वामींचे मंदिर आहे. लिंगायतपंथीयां ते एक श्रध्दास्थान आहे. जवळच कपिलधार नावाचा धबधबा आहे.

राक्षसभुवन :- गोदावरीकाठी गेवराई तालुक्यात वसले आहे. १७६३ मध्ये येथे झालेल्या लढाईत थोरल्या माधवराव पेशव्यांनी निजामाचा दारुण पराभव केला ही लढाई राक्षसभुवनची लढाई म्हणून इतिहासाच्या पानांवर कोरली गेली आहे. येथील शनिमंदिर प्रसिद्धद आहे.

आष्टी :- आष्टी तालुक्याचे मुख्य ठिकाण. येथील हजरतशाह बुखारी यांचा दर्गा अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

सौताडा :- हे स्थळ पाटोदा तालुक्यात असून येथील विंचरणा नदीवरील धबधबा प्रसिद्ध आहे. विंचरणेचा प्रवाह येथे सुमारे सत्तर मीटर उंचीवरून दरीत कोसळतो.

याशिवाय धारूर (धारूर तालुक्याचे मुख्य ठिकाण) हे एक . ऐतिहासिक स्थळ आहे. येथे फतेहबाद नावाचा डोंगरी किल्ला आहे. अमळनेर (पाटोदा तालुक्यात . तांब्या पितळेच्या भांडयासाठी प्रसिद्ध), धर्मपुरी (अंबेजोगाई तालुकयात केदारेश्र्वराचे हेमाडपंती मंदिर), पांचाळेश्र्वर ( गोदावरीकाठी, महानुभावपंथीयांचे दत्त मंदिर), चिंचोली ( पाटोदा तालुक्यात थंड हवेचे ठिकाण, गहिनीनाथाचे मंदिर ), नवगण -राजूरी ( बीड तालुक्यात नऊ गणेशमूर्ती असलेले मंदिर) ही जिल्ह्यातील अन्य महत्वाची स्थळे आहेत. र्८िें

परळी :- तालुक्याचे मुख्य ठिकाण जिल्ह्यातील एकमेव रेल्वे जंक्शन येथील वैजनाथ मंदिर प्रसिद्ध असून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक गणले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. परळी येथील औष्णिक विद्युतकेंद्र राष्ट्रीय पातळीवरही महत्वाचे गणले जाते. येथे औद्योगिक वसाहत असून औद्योगिकदृष्ट्या परळी झपाटयाने विकसित होत आहे.

परळी वैजनाथ

भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते.. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायऱ्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैजनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत.

मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे. जवळच अंबाजोगाईचे योगेश्वरी देवीचे मंदिर आहे. अंबाजोगाईपासून परळी वैजनाथ ५५ कि. मी. अंतरावर आहे. तर परभणीपासून ६१ कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणापासून वाहनाची सतत सोय आहे. परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यात असून येथून जवळच औष्णिक विद्युत केंद्र आहे.
बीडचा रथ हाकणाऱ्या नेत्यांपुढे व अधिकाऱ्यांपुढे ‘व्हिजन’ बाबत चिंता आहे. या ‘व्हिजन डॉक्युमेंट’ मध्ये जिल्ह्याच्या उद्योग, पर्यटन, तीर्थक्षेत्र विकास, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, शिक्षण, कृषी, सिंचन, रोजगार, रस्ते, वीज अशा पायाभूत सुविधा, रेल्वेचे जाळे, विमानतळाचे प्रस्ताव, विविध शासकीय योजनांच्या गरजा, नवीन प्रकल्पाच्या गरजांचा अपेक्षित आराखडा आणि सद्यस्थिती याचा महत्त्वपूर्ण उल्लेख असतो. सद्यस्थितीतील उणिवांवरील चर्चेसह दहा वर्षात गाठावयाच्या उद्दिष्टांची चर्चा, दर दोन ते पाच वर्षांनी विकासाचे योग्य रीतीने सिंहावलोकन व त्या अनुषंगाने राज्य सरकारकडून जिल्ह्याला अपेक्षित असणारा निधींची मागणी आदी बाबींचा समावेश असतो. हा आराखडा प्रत्येक जिल्ह्याने तयार करून ठरावीक मुदतीमध्ये राज्य शासनाकडे सादर करावयाचा असतो. दहा वर्षात वाढती लोकसंख्या अपेक्षित धरून त्यांना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा आणि त्यांच्या रोजगारांसाठी आवश्यक असणाऱ्या विकासाची सांगड घालणारी उद्योगवृद्धी या बाबींचा आराखडा केला जातो. परंतु जिल्ह्यात याकडेच दुर्लक्ष केले गेल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
comments
Leave a reply

आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.

Your E-mail ID not be published. Required *. मराठी/इंग्रजी साठी [CTRL + G] बटन वापरा

anti spam
(Maximum characters: 500)
characters left.

Required fields are marked (*)