पाण्याचे काटेकोर नियोजन आवश्यकच

2016-08-04 16:57:36
     932 Views

गेल्या तीन वर्षात पावसाने दांडी मारल्याने राज्यावर भीषण दुष्काळाचे चटके सहन करावे लागले आहेत. त्यामुळे मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याबरोबरच तर जनावरांच्या चा-याचा, जनतेसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता; परंतु चालु वर्षी राज्यात सुरू असलेल्या धुवांधार पावसाने हे प्रश्न निकाली काढले आहेत. राज्यासाठी हा पाऊस वरदान ठरला आहे. मात्र दुष्काळाचे चटके सहन केल्याल्या अनुभवि प्रत्येक व्यक्तीने पाण्याचे नियोजन काटेकोरपणे करणे आवश्यक आहे.
राज्यात पडत असलेला दमदार पावसाच्या जलधारांनी तळ गाठलेल्या धरणांना दुथडी भरून वाहायला लावले. भीषण दुष्काळाच्या चिंतेत ग्रासलेल्या, धीर सोडलेल्या जनतेचा चेहराही आनंदात न्हाऊन निघाल्याचे चित्र आपण पाहत आहोत. ते कमालीचे दिलासादायक आहे. निसर्गामध्ये नव्हत्याचे होते करण्याची ताकद असते, हे पुन्हा एकदा राज्यात कोसळत असलेल्या पावसाने आपल्याला दाखवून दिले. यावर्षी मोसमी पावसाने दगा दिल्याने राज्यावर भीषण दुष्काळाचे संकट ओढवले होते. अगोदरच मराठवाडा, पश्चिम विदर्भ-खानदेशातील काही जिल्हे हे दरवर्षी पाणीटंचाईने तहानलेले असतात. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा आदी जिल्ह्यांमध्येही पावसाचे प्रमाण नेहमीच कमी असते; परंतु गेल्या तीन वर्षात पावसाने दडी मारल्याने राज्यातील अनेक कुटुंबांवर रोजीरोटीसाठी आपले गाव, प्रदेश सोडण्याची वेळ आली होती. जनावरांसमोर तर जायचे कुठे हा प्रश्न असल्याने टाचा घासून मरण्याशिवाय पर्याय नव्हता. सगळीकडे पाणी, पाणी’ असाच आक्रोश सुरू असल्याचे चित्र दिसत होते. १९७२ नंतरच्या इतक्या मोठ्या दुष्काळाशी कसा सामना करायचा याबाबत राज्य सरकारही चिंतातुर झाले होते. राजकारण्यांशी संबंधित काही तालुक्यांचा अपवाद सोडला तर राज्य सरकारने दुष्काळी म्हणून घोषित केलेल्या बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात स्थिती तर अत्यंत गंभीर होती. दुष्काळाच्या प्रश्नावर राज्य सरकारने दिल्ली दरबारात धाव घेऊनही दुष्काळ निवारणासाठी चिरी-मिरी रक्कम घेवून परत यावे लागले होते; परंतु राज्यात पडणा-या पावसाने सगळ्यांच्याच चिंता दूर केल्या आहेत. राज्यातल्या जनतेचा पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चा-याचा प्रश्न सुटला असल्याने आता राज्य सरकारने सुटकेचा नि:श्वास टाकायला हरकत नाही. राज्यातील बहुतांशी धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने पश्चिम महाराष्ट्रातील चांदोली, राधानगरी, नांदेडच्या विष्णुपुरी धरणासह काही धरणे पूर्ण भरली आहेत. लघू, मध्यम पाटबंधारे प्रकल्पही दुथडी भरून वाहू लागले आहेत. ठाणे जिल्ह्यात कोसळलेल्या पावसाने बारवीबरोबरच अन्य धरणामधला पाणीसाठा ८३ टक्क्यांवर गेला आहे. उजनी, माजलगाव, जायकवाडी या धरणांमध्ये तुलनात्मकदृष्ट्या कमी पाणी असले तरी राज्यातील धरणांमध्ये सरासरी जलसाठा आणखीन वाढलेला नाही. उजनी, जायकवाडी या धरणातील पाणीसाठाही मृतसाठ्याच्या वर आल्याने या क्षेत्रातील जनतेचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. जालना, बीड, लातुर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा पर्जन्यवृष्टी कमी झाली असली तरी त्यांचीही चिंता या पावसाने जवळ जवळ दूर केली आहे. मुंबई, ठाणे परिसरात कोसळत असलेल्या धुवांधार पावसाने मुंबईकरांसमोरचे पाणीसंकटही दूर केले आहे. तानसा, तुळशी ही धरणे भरून वाहू लागली आहेत. मुंबईबरोबर राज्यातील अन्य शहरांना पाणीपुरवठा करणा-या धरणांमध्येही चांगला पाणीसाठा झाला आहे. राज्यातील प्रमुख नद्या दुथडी भरुन वाहु लागल्या आहेत. राज्यात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातुन नदी, नाले, ओढ्यांच्या सरळीकरण आणि खोलीकरणामुळे हजारो टिएमसी पाणी आढविण्यात आले आहे. राज्यात सतत सुर असलेल्या पावसाने खरीप पिकांसाठी जीवदान ठरला आहे. कपाशी, तूर, सोयाबीन, सूर्यफूल या पिकांची वाढ होत असतानाच पाऊस कोसळल्याने या पिकांतून चांगल्या प्रमाणात उत्पादन होईल. तरीही कोणत्याही चांगल्या बाबीला एखादे गालबोटही लागतेच. राज्यात काही भागात झालेल्या धुवांधार जलप्रलयाने जनतेला त्याचे तडाखेही दिलेच. पण प्रश्न जेव्हा जगण्याशी निगडित असतो तेव्हा अशी संकटेही सुसह्य होतात. राज्यात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असतानाच कोकणात अतिवृष्टीने हाहा:कार माजवला. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. भंडारा, गडचिरोली जिल्ह्यातही अतिवृष्टी, पुराच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात पडणा-या पावसामुळे नाशिक, सांगली, कोल्हापूर, कोकणातील जिल्हे या ठिकाणी मोठा तडाखा बसला आहे. तर मराठवाड्यातील बीड, लातुर, उस्मानाबाद या जिल्ह्यत दमदार मोठ्या पावसाची आवश्यकता कायम आहे. सध्याच्या पावसाने जनावरांच्या चा-यांचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी ग्राणिम भागात आजही पाण्यासाठी वनवन भटकंती थांबलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात एका भागात नदीला आलेले महापूर तर दुस-या बाजुला पाण्यासाठीची भटकंती असे विदारक चित्र पावसाळा दोन महिने झाले सुरु होऊन देखिल थांबलेली नाही. त्यामुळे राज्य शासनाने आणि केंद्र सरकारणे आगामी काळात केवळ घोषणांचा पाऊस पाडण्यापेक्षा नदीजोडप्रकल्प राबवून मराठवाड्याला दिलासा देणे आवश्यक आहे. तर मराठवाड्यातील जनेतने केवळ शासनाकडे डोळे लावून आत्ता तरी काय करतील अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपल्या गावात, परिसरात प्रडलेला प्रत्येक पावसाच्या थेंबाचे काटेकोरपणे नियोजन करुन आडवणे गरजेच आहे. तेव्हाच ख-या अर्थाने मराठवाडा दुष्काळमुक्त होईल.


प्राचार्य विठ्ठल एडके
७४२०९०४०५५
comments