बहुपीक पद्धत गरजेचीः

2016-06-10 10:25:11
     1229 Views


शेतकरी बंधु-भगिनींनो सादर नमस्कारः

गेल्या अनेक वर्षाच्या अनुभवानुसार चालू वर्षी चांगल्या पावसाचे योग आहेत हे निश्चित. हवामान शास्त्रज्ञांचे अंदाजसुद्धा असेच आहेत. शेती मशागत अंतिम टप्प्यात असून प्रत्येकाने पुढील हंगामाची तयारी सुरू केलेली असेल मागील २-३ वर्षातील हंगामाचा आढावा घेता, गेल्या १०-१२ वर्षापासून आपल्याकडे बऱ्यापैकी उत्पन्न देणाऱ्या सोयाबिन पिकाची स्थिती चिंता करण्यासारखी आहे हे निश्चित.

सोयाबिन हे विदर्भासाठी तसे नवीन पीक गेल्या दोन दशकात झपाट्याने पुढे आले. सोयाबिन पूर्वीच्या पीक पद्धतीचा विचार केल्यास या भागातील प्रत्येक शेतकरी १/३ भागात कपाशी, १/३ ज्वारी व १/३ मुग, उडीद, भुईमूग, तिळ यासारखी पिके घ्यायचा, त्यामुळे बहुपीक पद्धतीचा संतुलीत वापर अनायसेच व्हायचा व एखादे पीक जरी हातचे गेले तरी इतर पिकातून ती तूट भरून निघण्याची शक्यता जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी फारशी विस्कळित होत नव्हती. मात्र हळूहळू शेतीमध्ये समाजामध्ये अनेक स्थित्यंतरे होत गेली.

एकेकाळी एकमेकांना सहजिवी पद्धतीने सहकार्य करीत सुखात नांदणारे शेतकरी व शेतमजूर संबंधावर अनेक बाबींचा परिणाम होऊन शेतीमध्ये काम करण्यास इच्छूक मनुष्यबळाची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत गेली. मनुष्यबळाला पर्याय म्हणून शेतीत यंत्राचा राबता वाढला. जनावरांच्या संख्येवर त्याचा विपरित परिणाम झाला. निंदनी-खुरपणीची कामे जी पूर्वी मजुरांकरवी केली जायची ती मजुरांच्या कमतरतेमुळे करणे शक्य होत नसल्याने त्यावरही पर्याय म्हणून रसायनाद्वारे तणांचा बंदोबस्त करण्याकडे कल वाढला. परस्युट (इमॅझीथायपर) या तणनाशकाने तर संपूर्ण विदर्भामध्ये पीक पद्धतीत क्रांतीकारी बदल घडवून आणला. पेरणी, तणनाशकाची फवारणी केली तर एखादी डवरणी व किटकनाशकाची फवारणी आणि शेवटी सरळ कापणी व मळणी असे अगदी कमी श्रमाचे व बऱ्यापैकी फायदा देणारे पीक म्हणून सोयाबिनचा पेरा वाढला व इतर पिके गैरसोईची, कमी फायद्याची व जास्त कटकटीची म्हणून आपसुखच कमी होत गेली.

अर्थात गेल्या १०-१५ वर्षाच्या काळात शेतकऱ्यांना खरा हात दिला तो सोयाबिन याच एकमेव पिकाने. परंतु ह्या पिकाची सतत लागवड केली गेल्याने, पिकांची फेरपालट न झाल्यामुळे व्हायचे ते दुष्परिणाम २-३ वर्षापासून दिसायला लागलेत. अनेक नवनवीन किड रोगांचा प्रादुर्भाव या पिकावर दिवसेंदिवस वाढतांना आढळतोय. खोडमाशी, चक्रीभूंगा, पांढरीमाशी या सारख्या किडी व पिवळा मोझाक सारख्या रोगांचा वाढता प्रादुर्भाव पाहता हमखास उत्पन्न देणाऱ्या या पिकाचे भविष्य धोक्यात येण्याची शक्यता बळावत आहे.

एक पीक पद्धतीचे दुष्परिणाम टाकून कोरडवाहू शेतीमध्ये टिकून राहण्यासाठी शेतीतील जोखीम कमीत कमी ठेवणे अत्यंत गरजेचे ठरते आणि त्यासाठी निश्चितपणे मदत होऊ शकते. बहुपीक पद्धतीची. सोयाबिनने जो काही १०-१२ वर्षे शेतकऱ्यांना हात दिला त्याचे धन्यवाद मानून आता मात्र या पिकांचे क्षेत्र हळूहळू कमी करण्याची व इतर पारंपारिक पिकांकडे वळते करण्याची नितांत आवश्यकता आहे. सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅक असून त्याचा प्रादुर्भाव मूग, चवळी या सारख्या शेंगवर्गीय पिकांना सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे या पिकाची फेरपालट ज्वारी, कापूस या सारख्या पिकांद्वारे केली पाहिजे.

ज्वारी हे तसे या भागातील पारंपारिक पीक. परंतू सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीतून स्वस्तात मिळणाऱ्या गहू, तांदळामुळे ग्रामीण आहारातून हे पीक पुरते हद्दपार झाले आहे. शहरी भागात मात्र या धान्याचा वापर आहारात वाढत असल्यामुळे हल्ली भावसुद्धा चांगले मिळतांना दिसतात. अर्थात जंगली जनावरांचा विशेषत: रानडुकरांचा त्रास हा या पिकाच्या क्षेत्रवाढीवर मर्यादा आणणारा भाग जरी असला तरी प्रत्येकाने जर थोड्या क्षेत्रावर या पिकाची लागवड केली तर रानडुकरांचा उपद्रवसुद्धा विभागला गेल्यामुळे त्याची तिव्रता कमी होऊ शकते. तसेच पाऊस कमी झाल्यानंतर काही स्थानिक उपायांद्वारे सुद्धा रानडुकरांचा उपद्रव कमी करता येऊ शकेल. संकरित ज्वारी प्रमाणेच दाण्यावरील बुरशीला प्रतिकारक, अनेक चांगले सरळ वाण विकसित झाले आहेत. त्यामध्ये धान्यासोबतच कडब्याचे उत्पादन चांगले होत असल्यामुळे व सरळ वाणाच्या धान्यालासुद्धा जास्त भाव मिळत असल्यामुळे या पिकापासून शेतकऱ्यांना बऱ्यांपैकी फायदा मिळू शकतो. ज्वारी पिकांमध्ये मूग, उडीद या सारख्या कडधान्याचे आंतरपिक सुद्धा घेता येण्यासारखे आहे. त्यातूनही अधिक लाभ पदरात पाडून घेता येईल. त्यामुळे सोयाबीन ऐवजी थोड्यातरी क्षेत्रावर प्रत्येकाने ज्वारी+उडीद/मूग लागवड करावी.

सोयाबीनला दुसरे पर्यायी पीक म्हणजे कपाशी. अर्थात कमी कालावधीच्या संकरित बि टी वाणांचा विशेषत: रसशोषण किडींना बळी न पडणाऱ्या वाणांचा (ज्याच्या पानावर लव/केस असतील असे वाण) वापर करून मूग, उडीद, चवळी यासारख्या कमी कालावधीच्या पिकांचा त्यामध्ये आंतरपिक म्हणून वापर केल्यास कपाशीचे काहीसे कटकटीचे पीक सुद्धा चांगला फायदा मिळून देऊ शकेल. अर्थात या पिकावर अनावश्यक खर्च टाळण्यासाठी प्रत्येकाने डोळसपणे रसायनांची निवड करण्याची नितांत आवश्यकता आहे. अन्यथा फुले वाढण्यासाठी, पांढरी मुळे येण्यासाठी म्हणून टॉनिक वा जैविक उत्पादने शेतकऱ्यांच्या माथी मारतात, ज्यांचा फायदा काही होत नाही, खर्च मात्र विनाकारण वाढतो.

कडधान्यांचे वाढते भाव लक्षात घेता काही क्षेत्रावर तूर + मूग आंतरिक पद्धतीचा किंवा माळ्या/कोऱ्या तुरीची लागवड करण्यास सुद्धा हरकत नाही. एकंदरित येत्या हंगामात एकच पीक (सोयाबीन) लावण्याऐवजी शक्य तेवढ्या क्षेत्रावर ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, तूर, कापूस, तिळ या पिकांचा फेरपालटासाठी वापर करून बहुपीक पद्धतीचा अवलंब करावा व कोरडवाहू शेतीतील जोखीम कमी करून उत्पन्नात स्थैर्य मिळविण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा, असे नम्र आवाहन विजय विश्वनाथ चवाळे, अधिक्षक कृषी अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती यांनी केले आहे.
comments